-
Gautam Buddhanche Charitra (गौतम बुद्धांचे चरित्र)
गौतम बुद्ध आपल्या आनंदा नावाच्या सत्शिष्याला शेवटचे सांगणे सांगताना म्हणतात की, ‘तू सन्मार्गानुवर्तनाचा प्रयत्न सर्वदा उत्साहपूर्वक व खऱ्या आस्थेने चालू ठेव. असे करशील, तर तू विपत्तींपासून मुक्त होशील. दुर्वर्तन, आत्मपरताभ्रम व अज्ञान यांपासून तुझे मोचन होईल. मी इहलोक सोडून गेल्याबद्दल तुम्हास वाईट वाटण्याचे कारण नाही. माझा देह येथून नाहीसा झाला, तरी माझ्या सत्यधर्मरूपाने मी सर्वदा तुम्हास सन्निध राहीन. माझे देहावसान झाले, तरी मी उपदेशिलेले सत्य अमर राहील. ह्या लोकी मी जे सत्याचे राज्य स्थापिले आहे, ते जगाच्या अंतापर्यंत अढळ राहावयाचे. आता ह्या सत्याच्या यथार्थ स्वरूपाविषयी जनाची चित्ते वेळोवेळी भ्रांत होतील; परंतु माझ्यासारखे सत्यबोध करणारे पुरुष पुढे निर्माण होऊन जन पुन्हा सन्मार्गवर्ती होतील.’ गौतम बुद्ध या नावातील ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी असा होतो. बुद्ध ही उपाधी त्यांनी अत्यंत प्रयत्नांनी मिळविली होती. शाक्यमुनी गौतम बुद्धांना संमासंबुद्ध मानतात. संबुद्ध म्हणजे स्वतःवर विजय मिळविलेला आणि स्वतःचा उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध; तर संमासंबुद्ध म्हणजे ज्ञान प्राप्त झालेला, स्वतःसोबतच संपूर्ण जगाचा उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.