Asa Me Asaami
तुळशीवृंदावनापासून ते कॅक्टसच्या कुंडीपर्यंत कळत न कळत काळाबरोबर वाहत वाहत गेलेल्या एका कारकूनाचे हे आत्मचरित्र आहे. निरनिराळ्या मासिकांतून त्यातला बराचसा भाग यापूर्वीच आला आहे. मुख्यत: ‘दीपावली’च्या दिवाळी अंकांतून ‘असा मी असामी’ व त्यानंतर ‘पुन्हा मी पुन्हा मी’ असे दोन भाग प्रसिद्ध झाले होते. ह्या काल्पनिक आत्मचित्राचा नायक माझ्या मनात अनेक वर्षे घर करून बसला आहे. निरनिराळ्या लेखांतून तो डोकावतो. त्याला मी इथे ह्या पुस्तकात पकडून ठेवला तरी माझ्या मनातले घर सोडायला तो तयार नाही. ह्या अफाट मुंबई शहरातल्या ज्या मध्यमवर्गीय समाजात मी वाढलो त्यातलाच हा एक! कुठल्यातरी हपिसासाठी जगायचे आणि पेन्शनीसाठी किंवा प्राविडंट फंडाकडे डोळे लावून दिवसादिवसाने म्हातारे होत जायचे याहून मोठी महत्त्वाकांक्षा त्याला परवडलीच नाही. लोकलगाडीसाठी धावताना, ट्राम गाठताना किंवा बसच्या रांगेत आमच्या भेटीगाठी झाल्या-आजही होतात; यापुढेही होतील. बटाट्याच्या चाळीतसुद्धा ह्याच्या नात्याची माणसे आहेतच. ह्याचेही बरेचसे आयुष्य तसल्याच खास मुंबई फ्याशनीच्या वास्तूत गेले आहे. त्याच्या ह्या आठवणी आहेत. नव्या जगाशी जुळवून घेताना लागलेल्या धापा आहेत. रक्तातूनच आलेल्या कोकणी खवटपणाला हा काही अगदीच पारखा नाही. आणि म्हणूनच वैतागाच्या क्षणीही तो थोडासा हसतो आणि थोडासा हसवतोही. मात्र कुणी हसल्याबद्दल त्याला मुळीच राग येणार नाही. त्वेषाने चिडून वार करायला जाणे त्याला जमणार नाही. असल्या स्वभावाला कोणी डरपोकपणा म्हणेल; त्यालाही त्याची हरकत नाही. आपले चरित्र सांगण्याचे त्याने धारिष्ट्य दाखवले हेच पुष्कळ झाले. ह्या चरित्रातल्या निरनिरळ्या घटनांच्या संदर्भात आलेल्या माणसांच्या नावांशी कुण्या वाचकाचे नाव जुळून आले तर तो केवळ योगायोग आहे असे त्याने अगर तिने समजण्याची कृपा करावी.