Undaravlokan (उंदरावलोकन)
2004 साली दर रविवारी `रविवार सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांतून - `सण्डे का फण्डा’ हे सदर प्रसिद्ध होत होतं. त्या सदरातील निवडक लेखांचा हा संग्रह - `उंदरावलोकन’. `सदर’हू काळात `शायनिंग इंडिया’ ही कॅम्पेन जोरात होती. `रालोआ’ सणकून आपटली आणि सोनिया गांधी यांना `तुम्ही पंतप्रधान व्हा’ असं कॉंग्रेसजन म्हणू लागले, तोच हा काळ. सुषमा स्वराज रागानं बेभान होऊन मुंडण करायला निघाल्या होत्या आणि पंतप्रधानपद न स्वीकारून सोनिया गांधींनी भाजपच्या मुखंडांना धोबीपछाड घातली, तोच हा काळ. मोठा मजेचा काळ होता तो. या हलकांड्या काळातल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक घडामोडींचा हलक्याफुलक्या शैलीत घेतलेला हा समाचार. या काळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल, मॉल, मिडिआ, मल्टिप्लेक्स, मल्टीनॅशनल अशा अनेक `म’कारांची या काळात एकदमच चलती झाली. त्याच बरोबर शेतकर्यांच्या आत्महत्यांनाही याच काळात मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. मॉलची उंची वाढत गेली आणि सामान्य माणूस छोटा छोटा होत गेला – अगदी उंदराएवढा – तो याच काळात. सामान्य माणसाच्या दृष्टीतून त्या काळाचं केलेलं हे अवलोकन – म्हणूनही `उंदरावलोकन’ !