Cancel (कॅन्सल)
कथाकार आणि कादंबरीकार म्हणून मनोहर तल्हार यांना मराठी वाङ्मयात महत्त्वपूर्ण आणि आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले आहे, ते त्यांच्या ‘माणूस’ या कादंबरीने आणि विपुल कथालेखनाने. त्यांच्या कथेचे परिशीलन करताना ती जीवनाची समग्रता शोधताना दिसते. विविध स्तरांतील जीवनाचा वेध ती सारख्याच मन:पूर्वकतेने घेताना दिसून येते. कथाविषयाकरिता किंवा कथेतील जीवनदर्शनाकरिता ती स्वत:वर कुठलीही बंधने लादून घेत नाही. तशीच ही कथा स्वत:वर कुठलाही तत्त्वविचार, मतप्रणाली लादून घेत नाही. जीवनदर्शनातील ही निकोपता विरळाच म्हणता येईल. मनोहर तल्हार यांच्या कथेतील व्यक्ती सर्वार्थाने जीवनाला सामोर्या जाणार्या आहेत. समृद्ध जीगिषेने त्या जीवनाकडे पाहतात. जीवनसंघर्षात या व्यक्ती अनेकदा पराभूत होतात, हताश होतात; पण तरीही पराभवावर मात करण्याकरिता जटायूप्रमाणे ह्या व्यक्ती संकटांवर तुटून पडतात; रक्तबंबाळ होतात. ह्या संघर्षात मग पराभवाची क्षीणशी जाणीवही त्यांना नको असते. कारण जीवनाच्या सश्रद्ध संघर्षातूनच पुढच्या विजयाच्या पाऊलखुणा त्यांनी ह्या प्रक्रियेतून उमटविलेल्या असतात. स्वत:च्या जीवनेच्छेबरहुकूम नव्या अस्तित्वाच्या पायवाटा निर्माण करणार्या या कथांमधील व्यक्ती मनोहर तल्हारांच्या पृथगात्मतेची आणि असीम जीवनश्रद्धेची निश्चितच प्रतीती देणार्या आहेत. - डॉ. रवीन्द्र शोभणे