Pariman (परिमाण)
विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या सानिया यांच्या कथांचा `परिमाण’ हा नवा कथासंग्रह. मध्यम किंवा उच्चमध्यमवर्गीयांचे जीवन, त्यातले भोगोपभोग, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांच्या कौटुंबिक किंवा वैवाहिक जीवनातले ताण आणि तणाव यांची सूक्ष्मचित्रणे सानिया यांच्या या कथांमधून येतात. प्रौढ स्त्री-पुरुषांमधले अनुबंध हा विषय त्यांच्या कथांमधून येतो. मात्र व्यक्ती, परिसर व त्यांचे व्यवसाय भिन्न भिन्न राखल्याने कथा रोचक व सुरस होतात. खूप काही चांगले, अर्थवाही, पृथगात्म वाचल्याचा प्रत्यय या कथा देतात. रूढार्थाने कथानक नसलेल्या या कथा एक प्रकारच्या आंतरिक उसळीतून, उमाळ्यातून आलेल्या असतात. कथा आकर्षक होण्यासाठी घ्यायचे विषय, लेखनात चलाखी किंवा दिखाऊ कारागिरी या कथांमध्ये दिसत नाही. व्यक्तींमधील मानसिक, भावनिक संबंधांना त्यांच्या कथांमध्ये महत्त्व असते. समकालीन तरुण पिढीचं चित्रण त्यांच्या या कथांमधून आढळतं.