Bandookdweep (बंदूकद्वीप)
बंदूक. तसं म्हटलं तर एक साधासा शब्द पण ह्याच शब्दामुळे डीन दत्ताच्या दुनियेत उलथापालथ घडून येते. दुर्मिळ पुस्तकं विकणारा आणि चार भिंतीतल्या शांत आयुष्याची सवय झालेला डीन. मात्र त्याच्या ठाम समजुतींना धक्के बसायला लागतात आणि सुरू होते एक विलक्षण यात्रा! वाटेत भेटणाऱ्या माणसांच्या आठवणींच्या आणि अनुभवाच्या गुंत्यातून वाट काढत ही यात्रा त्याला भारतातून लॉस एंजेलिस आणि तिथून व्हेनिसला घेऊन जाते. वाटेत त्याला ह्या प्रवासाची चक्रं फिरवणारी त्याच्यासारखीच बंगाली-अमेरिकन पिया भेटते; टिपू नावाचा एक धडपड्या तरुण पोरगा आजकालच्या जगण्यातलं वास्तव डीनच्या डोळ्यासमोर उलगडून दाखवतो; कोणा गरजवंताला मदत करायचा आटोकाट प्रयत्न करणारा रफी भेटतो; आणि ह्या सर्वांना गुंफणाऱ्या कथेचा दुवा सांधणारी एक जुनी मैत्रीण चीन्ता भेटते. स्वतःविषयीच्या, लहानपणापासून ऐकलेल्या बंगाली लोककथांबद्दलच्या आणि आजूबाजूच्या जगाविषयीच्या त्याच्या समजुती पार उलट्या-पालट्या करून टाकणारा हा प्रवास आहे. अमिताव घोष ह्यांची बंदूकद्वीप ही काळ आणि अवकाशाच्या विस्तारात संचार करणारी एक उत्कृष्टरित्या साकार झालेली कादंबरी आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगाची, वाढत्या स्थलांतराची आणि अनिरुद्ध परिवर्तनाची ती कहाणी आहे. मात्र ही कहाणी आशादायकही आहे. ज्या माणसाची जगावरची आणि भविष्यावरची श्रद्धा दोन असामान्य स्त्रियांमुळे दृढ होत जाते त्याची ही कथा आहे.