-
Origin Story Characharacha Mahaitihas(ओरिजिन स्टोर
Origin Story Characharacha Mahaitihas काळाचा उदय होण्याच्या आधीपासून ते सुदूर भविष्याच्या दूरवरच्या टोकापर्यंत बहुतेक सगळे इतिहासकार काळाचे सर्वांत लहान-लहान तुकडे अभ्यासत जातात. ते करत असताना त्यांचा भर विशिष्ट तारखा, व्यक्ती आणि दस्तऐवजांवर असतो. मात्र बिग बँगपासून ते आजपर्यंत संपूर्ण इतिहासाचा आणि अगदी सुदूरच्या भविष्याचा अभ्यास करायचा झाला तर तो कसा असेल? काळाच्या सबंध पटाकडे बघितल्याने आपला या विश्वाविषयीचा, पृथ्वीविषयीचा आणि चक्क आपल्या अस्तित्वाविषयीचा दृष्टिकोन कसा बदलेल? या प्रश्नांची उत्तरं शोधायला डेव्हिड ख्रिश्चन “बिग हिस्ट्री" कल्पनेचा माग काढत गेले. आपण कुठे होतो, कुठे आहोत आणि कुठे चाललो आहोत हे समजून घेण्याचा हा सर्वांत रोमांचक असा नवीन मार्ग आहे. आपल्या ओरिजिन स्टोरी या पुस्तकातून डेव्हिड ख्रिश्चन, ज्याला आपण 'इतिहास' म्हणून ओळखतो अशा सबंध १३.८ अब्ज वर्षांच्या विलक्षण प्रवासावर वाचकांना घेऊन जातात. या इतिहासाला आकार देणाऱ्या घटना (टप्पे), महत्त्वाचे कल आणि आपल्या मुळाविषयीचे गहन प्रश्न यांच्यावर लक्ष केंद्रित करून, सर्व चराचराला एकत्र बांधणारे अदृश्य धागे ख्रिश्चन दाखवून देतात. त्यात ग्रहाच्या निर्मितीपासून ते शेतीचं आगमन, अणुयुद्ध आणि त्यापलीकडच्या गोष्टींचा समावेश होतो. विश्वाची उत्पत्ति, जीवसृष्टीची सुरुवात, मानवांचा उदय आणि भविष्यात दडलेल्या शक्यता यांविषयीचं चित्तथरारक अंतर्दर्शन घडवत ही उत्पत्तिकथा' आपली या विश्वातली जागा नवीन चौकटीत धिटाईने दाखवून देते.
-
Bandookdweep (बंदूकद्वीप)
बंदूक. तसं म्हटलं तर एक साधासा शब्द पण ह्याच शब्दामुळे डीन दत्ताच्या दुनियेत उलथापालथ घडून येते. दुर्मिळ पुस्तकं विकणारा आणि चार भिंतीतल्या शांत आयुष्याची सवय झालेला डीन. मात्र त्याच्या ठाम समजुतींना धक्के बसायला लागतात आणि सुरू होते एक विलक्षण यात्रा! वाटेत भेटणाऱ्या माणसांच्या आठवणींच्या आणि अनुभवाच्या गुंत्यातून वाट काढत ही यात्रा त्याला भारतातून लॉस एंजेलिस आणि तिथून व्हेनिसला घेऊन जाते. वाटेत त्याला ह्या प्रवासाची चक्रं फिरवणारी त्याच्यासारखीच बंगाली-अमेरिकन पिया भेटते; टिपू नावाचा एक धडपड्या तरुण पोरगा आजकालच्या जगण्यातलं वास्तव डीनच्या डोळ्यासमोर उलगडून दाखवतो; कोणा गरजवंताला मदत करायचा आटोकाट प्रयत्न करणारा रफी भेटतो; आणि ह्या सर्वांना गुंफणाऱ्या कथेचा दुवा सांधणारी एक जुनी मैत्रीण चीन्ता भेटते. स्वतःविषयीच्या, लहानपणापासून ऐकलेल्या बंगाली लोककथांबद्दलच्या आणि आजूबाजूच्या जगाविषयीच्या त्याच्या समजुती पार उलट्या-पालट्या करून टाकणारा हा प्रवास आहे. अमिताव घोष ह्यांची बंदूकद्वीप ही काळ आणि अवकाशाच्या विस्तारात संचार करणारी एक उत्कृष्टरित्या साकार झालेली कादंबरी आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगाची, वाढत्या स्थलांतराची आणि अनिरुद्ध परिवर्तनाची ती कहाणी आहे. मात्र ही कहाणी आशादायकही आहे. ज्या माणसाची जगावरची आणि भविष्यावरची श्रद्धा दोन असामान्य स्त्रियांमुळे दृढ होत जाते त्याची ही कथा आहे.
-
Police Files ( पोलीस फाइल्स )
पुणे पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीवर आधारित कथांचे संकलन म्हणजे पोलीस फाइल्स. परदेशातील पोलीसकथा चित्तथरारक वाटतात; पण तुमच्या स्वत:च्या शहरातील पोलीसही कर्तबगारीत कुठेही कमी नाहीत. पुणे पोलिसांची कामगिरी वाचताना तुमचीही मान अभिमानाने ताठ होईल आणि ‘पोलीस आपला मित्र’ याची प्रचिती येईल. या पुस्तकातील कथा वाचल्यानंतर तुमच्या मनातील पोलीस कर्मचार्यांविषयी असलेली समजूत निश्चित बदलेल. तो (किंवा ती) सदैव कठोर नसतो, तो (किंवा ती) सदैव ‘चौकशी’च्या मन:स्थितीत नसतो, तो (किंवा ती) पोलीसठाण्यात हजर नसला, तरी तो (किंवा ती) सदैव ड्युटीवर असतो. गुन्हे घडू नयेत आणि माणूस गुन्हेगारीकडे वळू नये म्हणून पोलीस समुपदेशकाची भूमिकाही किती उत्तमरीत्या निभावतात, हेही आपल्याला वाचायला मिळेल. पोलीस सेवेबद्दल तरुण-तरुणींच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील आणि हुशार, सक्षम युक-युवतींना या क्षेत्राचे निश्चितच आकर्षण वाटेल.