Firata Firata (फिरता फिरता )
शैलेंद्र तनपुरे तीन दशके पत्रकारितेत आहेत. त्यांचे नाव घेतले की ‘राज-का-रण’ हे त्यांचे सदर आठवते.राजकारणातले अंत:स्तर ते या सदरातून निगुतीने उलगडण्यासाठी ते माहीर आहेत.पत्रकाराच्या जडणघडणीत फिरण्याला महत्व आहे.देशाटन आणि पंडित मैत्रीने येणारे शहाणपण पत्रकारितेत उपयोगी पडते.विविध देशांच्या वकिलाती म्हणूनच या मंडळीना आपले देश दाखवून आणतात.क्वचित खाजगी दौ-यातून पत्रकार जग पाहतात.या भटकंतीतून त्यांची व्यावसायिक दृष्टी विस्तारते.पत्रकार असला तरी तो माणूस असतो,त्यालाही नवे काही पहिले की आनंद होतो आणि हा आनंद वाचकाना वाटावा असे त्यालाही वाटते.त्यातून तो प्रवासाचे वर्णन लिहून काढतो.ज्याना प्रत्यक्ष फिरता येत नाही ते या वर्णनातून तोच आनंद घेतात.तनपुरे यांचे हे लेखन प्रामुख्याने दैनिक गावकरीतून झाले. वाचकांनी त्याना त्या त्या वेळी प्रत्ययाची पावतीही दिली यात सारे आले. प्रवासामुळे आपल्यात काय बदल झाले हेही लेखकाने मनोगतात सांगितले आहे.’फिरता फिरता’ला न्या. नरेंद्र चपळगावकर यांची प्रस्तावना लाभली असून ‘जगाचा हा डोळसपणे घेतलेला आस्वाद’ असल्याचे न्या,चपळगावकर यांनी नमूद केले आहे. स्थलवर्णनाच्या बाबतीत नेहमी असे जाणवते की पाहणारा त्याच्या त्याच्या नजरेने पाहतो म्हणून स्थळ एकच असले तरी प्रत्येकाला वेगवेगळे दिसते.विदेशात जाणा-या माणसाला आपल्या मातृभूमीची आठवण येतच असते.मात्र प्रत्येकाची सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय जाणीव कसकशी विकसित झाली आहे यावर तो दोन्हीत तुलना अभावितपणे करतो..पत्रकाराच्या बाबतीत या जाणीवा फारच प्रगल्भ असतात. त्याचा प्रत्यय तनपुरेंचे प्रवासवर्णन वाचताना येतो.