-
Gunhyachya Paulkhuna (गुन्ह्याच्या पाऊलखुणा)
प्रत्येक गुन्हेगार काही पुरावे मागे सोडून जातो. कधी ते चटकन सापडतात तर कधी पुरावे सापडायला काही वर्ष ही लागतात. सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यासाठी आणि गुन्हेगाराची ओळख निःसंशय पटवून देण्यासाठी न्यायव्यवस्था ज्या विज्ञानाचं सहाय्य घेते त्याला न्यायसाहाय्यक विज्ञान असं म्हणतात. चित्रपट आणि टी वी सीरियल्स मधून न्यायसाहाय्यक विज्ञानाची तोंड ओळख झाली असेलच. या पुस्तकात न्यायसाहाय्यक विज्ञानाची सखोल माहिती आणि फॉरेंसिक सायन्सच्या उपयोगाने सोडवलेल्या काही थरारक क्रिमिनल केसेस आहेत. विविध शास्त्र जसे की रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र यांचा उपयोग न्याय दानासाठी केला जातो. क्राईम सीन पासून न्यायालयापर्यंतचा पुराव्यांचा प्रवास सोप्या भाषेत वर्णन करण्याचा हा प्रयत्न आहे. विविध टेक्नॉलॉजी आणि उपकरणांची उपयोग गुन्हे तपासासाठी केला जातो. या सगळ्याची नेमकी माहिती या पुस्तकात मिळेल. हस्ताक्षर, स्वाक्षरी, बोटांचे ठसे यांचा अभ्यास कसा केला जातो. लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट डीएनए प्रोफाइलिंग अश्या ऐकीवातल्या तंत्रज्ञानाची माहिती या पुस्तकात आहे. न्यायवैद्यक शास्त्र आणि त्याच्या विविध शाखांची ओळखही तुम्हाला या पुस्तकातून होईल. सायबर गुन्हे आणि त्यांचा तपास करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर/ हार्डवेअर यांची ही थोडक्यात माहिती मिळेल. सत्य हे कल्पनेपेक्षा आश्चर्यकारक असतं या वाक्प्रचाराची अनुभूती देणारे गुन्हे आणि त्यांचा फॉरेंसिक सायन्स च्या मदतीने केलेला उलगडा या पुस्तकात आहे. फॉरेंसिक सायन्स चे विद्यार्थी, तपास कार्य करणारे अधिकारी व एक्सपर्ट्स, न्यायाधीश व वकील, थ्रिलर कथा लिहिणारे लेखक आणि फॉरेंसिक सायन्स व गुन्हे तपास या विषयाचे कुतूहल असलेल्या सर्व वाचकांना हे पुस्तक वाचायला आवडेल.