-
Jahannam - Pratima Joshi Yanchya Nivadak Katha (जहन्नम : प्रतिमा जोशी यांच्या निवडक कथा)
मराठी साहित्याच्या वर्तुळात पत्रकार- साहित्यिक ही काही नवलाची गोष्ट नाही. प्रतिमा जोशी याही आपल्याला पत्रकार म्हणून परिचित आहेत. विशेषतः त्यांच्या वार्तापत्रांत असलेला परिघावर जगणाऱ्या माणसाविषयीचा आपुलकीचा स्वर आपल्याला ओळखीचा आहे. पण हा आपुलकीचा स्वर भावविवश होत नाही, कारण प्रतिमा जोशी यांना व्यवस्था आणि व्यवस्थाबदलाची कणखर वास्तवता परिचित आहे. प्रतिमा जोशींच्या कथेकडे पाहताना जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातल्या निवेदकाचा ननैतिक दृष्टिकोन! त्यांच्या कथेतील निवेदक समाजमान्य नैतिकतेचे मापदंड मानीत नाही पण त्याहीपलीकडची माणसामाणसातील गाभ्याची नैतिकता त्यांच्या निवेदनातून व्यक्त होते. एखाद्या वादाची छत्री मिरवत माणसाच्या वागणुकीचा योग्य-अयोग्य न्याय करण्याची भूमिका या कथांत नाही. तरीही माणूस माणसाला किती विविध तन्हांनी छोटा करतो याविषयीची जाणीव या कथांतून व्यक्त होते. या सर्वच कथांत लेखिकेने वातावरण, पात्रधर्म यांच्याशी भाषेचे रूप मिळतेजुळते राखले आहे. स्त्री कथाकारांच्या आत्ममग्न विमनस्कतेपेक्षा या कथांचे रूप वेगळे आहे.
-
Good Muslim Bad Muslim (गुड मुस्लीम बॅड मुस्लीम)
'चांगला' मुसलमान कोण? 'वाईट' मुसलमान कोण? - हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात 'गुड मुस्लीम', 'बॅड मुस्लीम' या संकल्पनांचा व 'राजकीय ओळखीं'चा उद्भदवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने 'शीत युध्दा'नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या 'गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम' या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद. महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे 'गुड मुस्लीम' आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो 'बॅड मुस्लीम'. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते '९/११'च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्त्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची 'धार्मिक ओळख' आणि 'राजकीय ओळख' यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे. जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक... 'गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!'