-
Prematun Premakade (प्रेमातून प्रेमाकडे)
मैत्री, प्रेम यावर जग जगात असते. मैत्रीत वयाचे बंधन नसते; पण मैत्रीलाही काही वेळा समाजबंधन असते. विशेषतः मैत्री स्त्री - पुरूषांमधील असेल तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते. सार्वजनिक क्षेत्रातील थोरामोठ्यांचे अतिशय नाजूक संबधातील मैत्र अरुणा ढेरे यांनी 'प्रेमातून प्रेमाकडे ' मधून वाचकांपुढे उलगडले आहे. मार्गारेट नोबेलने विवेकानंद यांना प्रथम पहिले तेव्हाच त्यांना जीवन समर्पण करण्याच्या निश्चय केला. स्वामींनी समाजकार्यासाठी निवेदिताच्या रुपात तिला शिष्यत्व बहाल केले. निवेदिता व गोपाळ कृष्ण गोखले यांचे सौहार्दाचे मित्रत्व, गोखले व सरोजिनी नायडू यांचे स्नेहसंबंध, 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताला स्वररचना देणाऱ्या व महात्मा गांधी यांची अधार्मिक प्रेरणा बनलेल्या सरलादेवी घोषाल, ब्रिटनमधील मेडेलिन स्लेड उर्फ मीरा बेन हिची गांधीजींवरील उत्कट प्रेमभक्ती, रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतून व्यक्त झालेली अॅना उर्फ नलिनी तसेच त्यांची वहिनी कादंबरी, रवींद्रनाथांसाठी काहीही करण्यास तयार असणारी व्हिक्टोरिया ओकॅम्पो, सुभाषचंद्र बोस व एमिली यांचा विवाह, सेनापती बापट व त्यांची रशियन मैत्रीण अना, डॉ. आंबेडकर व फॅनी यांच्यातील नाते, यावर यात प्रकाश टाकला आहे.
-
Sakshibhavane Baghtana (साक्षीभावाने बघताना)
पोएट टू पोएट' या अभिनव संकल्पनेतून सुप्रसिद्ध प्रतिभावान जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर हिच्या निवडक जर्मन कवितांचं अरुणा ढेरे व जयश्री हरि जोशी यांनी साकारलेलं अनुसर्जन... ... वेगवेगळ्या देशांतले भूप्रदेश तिथल्या सांस्कृतिक संदर्भांसकट उलरिकं यांच्या काव्यात्म अनुभवाचा भाग झालेले आहेत. त्यामुळे मराठी कवयित्रींच्या अनुभवविश्वापेक्षा तिचं अगदी निराळं आणि समृद्ध असं अनुभवाचं जग तिच्या कवितांमधून समोर येतं. सांस्कृतिक संदर्भांपासून पूर्ण मुक्त अशा स्त्रीशरीराच्या अनुभवापासून थेट मानवजातीच्या उत्क्रांतीच्या इतिहासापर्यंत आणि स्त्री पुरुष संबंधातल्या ताण्याबाण्यापासून बर्लिनच्या भूत-वर्तमानापर्यंत तिच्या कवितेचा विस्तृत पैस आहे... - अरुणा ढेरे हि कविता ध्वनीचे बोट धरून दृश्यप्रतिमांची उकल करते. उलरिकंला शब्दांचे खेळ करायला आवडतात. नवीन शब्दांचे सर्जन करण्यात तिचा हातखंडा आहे. दृश्य रूप हे तिच्या कवितेचे विशेष लक्षण आहे. उलरिकंची कविता माणसा-माणसांतील समीकरणं आणि लालसा, त्यांच्या भावनांचे खेळ, आकांक्षाचे ओझे हे जगाच्या पाठीवर सारखेच असते हे दाखवून देणारी. - जयश्री हरि जोशी