-
Ice Station Zebra (आइस स्टेशन झेब्रा)
ही एक रहस्यकथा/थरारकथा आहे. आइस स्टेशन झेब्रा या बर्फावर उभारलेल्या तळावर एक मोठी आग लागून तिथे राहून काम करणारे अनेक जण मरण पावले किंवा भयंकर जखमी झाल्याची खबर येते. त्यांना वाचवण्याची कामगिरी अमेरिकन नौदलाची अत्याधुनिक अणुपाणबुडी `यूएसएस डॉल्फिन`वर सोपवली जाते. डॉक्टर कार्पेंटर हा ब्रिटिश गुप्तहेर अनेक खटपटी करून तिच्यावर दाखल होतो. त्याला संशय असतो की आग मुद्दाम लावली गेली आहे. काही संकटांवर मात करून, बर्फाखालून प्रवास करत पाणबुडी आइस स्टेशन झेब्रा शोधून काढून तिथून सर्वांत जवळच्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी होते. ब्रिटनमधले रशियाला फितूर असलेले काही लोक आइस स्टेशन झेब्रावर काम करणार्या लोकांमध्ये सामील होऊन तिथे पोहोचलेले असतात. याचा संशय डॉक्टर कार्पेंटर या ब्रिटिश गुप्तहेराला असल्यामुळे तो आइस स्टेशन झेब्रावर पोहोचलेला असतो. फितुरांमुळे या पाणबुडीवर अनेक जीवघेणी संकटंही येतात. कार्पेंटर या फितुरांना उघडं पाडण्यात यशस्वी होतो का?
-
Cure ( क्युअर)
सातोशी माचिता या जपानमधील जैवतंत्रज्ञान विषयामधील शास्त्रज्ञाची न्यू यॉर्कमधल्या एका सब वे प्लॅटफॉर्मवर बेमालूमपणे हत्या केली जाते. त्याने स्टेम सेल्सच्यासंबंधी लावलेला एक महत्त्वाचा शोध... जपानच्या क्योटो युनिव्हर्सिटीत मिळालेली वाईट वागणूक... बेन कोरी या अमेरिकेतल्या एका कंपनीच्या सीईओने जपानमधील माफियांच्या मदतीने सातोशीला त्याच्या कुटुंबासकट अमेरिकेत आणून करार करणे... अशी सगळी पार्श्वभूमी आहे सातोशीच्या हत्येमागे...न्यू यॉर्कमधल्या ‘ओसीएमई’ या फॉरेन्सिक विभागात काम करत असलेली लॉरी माँटगोमेरी या हत्येचा तपास करायला लागते आणि सुरू होतो जीवघेणा संघर्ष. या संघर्षाचं थरारक चित्रण करणारी उत्कंठावर्धक कादंबरी आहे-क्युअर.
-
HMS Ulysses (एच एम एस युलिसिस)
ही कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. रशियाचे जर्मनीशी युद्ध सुरू असते, आणि एफआर ७७ या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्यामार्फत रशियाला जर्मनीशी लढण्यासाठी अत्यंत निकड असलेले युद्धसाहित्य पोचवण्याची योजना असते. एचएमएस युलिसिस ही ब्रिटिश आरमारातील एक क्रूझर जातीची युद्धनौका या ताफ्याची फ्लॅगशिप असते. तिच्या साथीला आणखी छत्तीRस जहाजे या ताफ्यात असतात. भयंकर थंडी, बर्फवृष्टी, प्रचंड वादळे, चिडलेले व निराश झालेले नौसैनिक, त्यांची झालेली प्रचंड उपासमार, थकवा, झोपेचा अभाव, आणि ताफ्याने रशियापर्यंत पोचता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी जर्मन बॉम्बर विमाने, युद्धनौका आणि यू-बोटी, अशा पार्श्वभूमीवरील या ताफ्याच्या– आणि पर्यायाने युलिसिसच्या– प्रवासाची ही कहाणी आहे. या सगळ्या विपरीत परिस्थितीला युलिसिसवरील सगळे अधिकारी आणि नौसैनिक ज्या असीम धैर्याने आणि शौर्याने तोंड देतात त्याचे भेदक वर्णन ‘एचएमएस युलिसिस’ या कादंबरीत आहे.
-
The Feast Of God ( द फिस्ट ऑफ गॉड)
प्रत्येक युद्धातून आपल्याला काही ना काही बोध घेण्यासारखा असतो. पण तसा तो घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे हे खरे महत्त्वाचे असते. नाहीतर युद्धात जे सैनिक किंवा नागरिक प्राणास मुकले असतील, त्यांचे बलिदान व्यर्थच ठरते. इराक-कुवेत. युद्धानेही एक धडा जगाला शिकवला आहे. फ्रेडरिक फोरसीथ यांच्या बहुतेक कादंबर्या या एखाद्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या असतात. प्रस्तुत मूळ कादंबरीचे स्वरूपही असेच आहे. इराक-कुवेत युद्धाच्या आणि त्या वेळी जगभरात देशोदशी घडलेल्या राजकीय घटनांच्या प्रचंड पार्श्वभूमीवर एका प्रत्यक्ष घडलेल्या युद्धाच्या इतिहासामध्ये कौशल्यपूर्ण रीतीने गुंफलेली काल्पनिक पात्रांची कथानके, असे या मूळ पुस्तकाचे दोन पदर आहेत. त्यामुळे या पुस्तकाची भाषाशैलीही त्यांनी अपरिहार्यपणे दोन वेगळ्या प्रकारची वापरलेली आहे. मूळ पुस्तकात जेव्हा इतिहासात घडलेले प्रसंग किंवा राजकीय घडामोडी वर्णन केल्या आहेत, तेव्हा फोरसीथ यांची भाषा स्वाभाविकपणे काहीशी कोरडी, एखाद्या वृत्तनिवेदकाच्या शैलीची, त्रयस्थपणे घटनेचे वर्णन करणारी आहे. पण काल्पनिक किंवा खर्या पात्रांमध्ये, काल्पनिक किंवा प्रत्यक्ष घडलेले प्रसंग जेव्हा ते वर्णन करतात, तेव्हा मात्र त्यांची भाषा आपोआपच प्रसंगानुरूप त्या त्या भावना दर्शवणारी, त्या पात्रांच्या क्रिया-प्रतिक्रियांचे अचूक वर्णन करणारी, त्यांचे परस्परसंबंध रंगवणारी अशी झालेली आहे.
-
The Last Don ( द लास्ट डॉन)
कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही, खरं तर, जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजांत, पार इतिहासपूर्व काळापासून कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे. हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची -- फार कशाला, सार्या जगाची -- डोकेदुखी बनते आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडं समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्यायसंस्थेशी, राजकीय नेत्यांशी किंवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपान्तर अत्यंत झपाट्यानं कॅन्सरमध्ये होतं. सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली 'माणसं’, तिचे विविध पैलू, पदर, अंतर्प्रवाह, अंतर्गत कलह, त्या 'माणसां’चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढं उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं. प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बर्याचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता किंवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे. 'द डार्क एरिना’, 'फॉर्च्युनेट पिल्ग्रिम’, 'गॉडफादर’, 'फूल्स डाय’, 'द सिसिलियन’, 'ओमेर्ता’, 'द फोर्थ के’ या त्याच्या याआधीच्या सर्व जगभरात गाजलेल्या कादंबर्या आहेत. 'द लास्ट डॉन’ ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.
-
The Rainmaker (द रेनमेकर)
जॉन ग्रिशॅम हा मुळामध्ये अमेरिकेतला एक प्रथितयश असा वकील होता, आणि नंतर तो पूर्ण वेळ लेखनाकडे वळला. त्यामुळे त्याच्या सगळ्या कादंबर्या या कायदा, वकील, गुन्हेगारी यांच्याशीच संबंधित असतात. 'द रेनमेकर' ही त्याची कादंबरीही कायद्याशीच संबंधित आहे. रुडी बेलर हा अगदी पोरसवदा, कायद्याची परीक्षा नुकतीच पास झालेला एक तरूण वकील असतो. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे त्याच्याकडे पैशाची चणचण कायमच असते. अत्यंत हलाखीची परिस्थिती, पाठीमागे कोणाचं आर्थिक पाठबळ नाही, शिक्षणाचा खर्च चालूच आहे, आवक मात्र अत्यंत कमी, अशा परिस्थितीत त्याच्यावरची देणी वाढत असतात. जंग जंग पछाडूनही त्याला नोकरी मिळत नाही. कुठूनशी एक केस मिळते, पण त्याची ती क्लाएंटच इतकी गरीब असते, की तिच्याकडून फी मिळण्याचीही आशा करण्यात अर्थ नसतो. डॉट ब्लॅकनं - रुडी बेलरच्या क्लाएंटनं - एका प्रचंड मोठ्या, श्रीमंत इन्शुअरन्स कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला असतो. डॉनी हा तिचा मुलगा ल्युकेमियामुळे मरणोन्मुख झालेला असतो. त्याच्या ल्युकेमियावर 'बोन-मॅरो ट्रान्स्प्लँट' हा इलाज असतो, पण इन्शुअरन्स कंपनीनं या ऑपरेशनचा खर्च द्यायला नकार दिल्यामुळे त्याला तो इलाज करता आलेला नसतो, आणि आता ती वेळही निघून गेलेली असते. जेमतेम लॉ स्कूल मधून बाहेर पडत असलेल्या रुडी बेलरकडे डॉट ब्लॅक ही केस घेऊन आलेली असते. आणि रुडीनं तर अजूनपर्यंत एकही केस हाताळलेली नसते. इन्शुअरन्स कंपनीच्या अत्यंत प्रसिद्ध वकिलांचा सामना करून, प्रचंड अडचणींना तोंड देऊन रुडी हा खटला चक्क जिंकतो. डॉट ब्लॅकला प्रचंड मोठी रक्कम नुकसान भरपाई मिळणार असते. आता खरं तर रुडी बेलर कोट्याधीश व्हायला हवा. तो आता चुटकीसरशी पाऊस पाडणारा 'रेनमेकर' झालेला असतो,त्यांच्यापुढे उज्ज्वल भवितव्य असतं.पण आणि या 'पण'मुळेच तो शहर सोडून निघून जातो. ते का, हे समजायला मात्र पुस्तकच वाचायला हवं.या पुस्तकामध्ये जॉन ग्रिशॅम या मूळ लेखकानं एका वेगळ्याच पद्धतीच्या भाषेचा वापर केलाय. एक प्रकारची बोचरी, विषादपूर्ण, ज्याला 'ब्लॅक ह्यूमर' म्हणता येईल अशी ही भाषा आहे, आणि अनुवादकानंही ती मराठीत तशीच्या तशी उतरवली आहे. त्याखेरीज, मूळ लेखकानं या कादंबरीत कथाकथनासाठी जी एक खास शैली वापरली आहे, ती इंग्रजीमध्ये क्वचित वाचनात येते, पण मराठीत मात्र विशेषत: कथालेखनामध्ये ती पुष्कळ ठिकाणी आढळते. ही शैलीसुद्धा अनुवादकानं पूर्णपणे तशीच ठेवलेली आहे. त्यामुळे पानांची संख्या मोठी असूनही हे पुस्तक वाचनीय झालं आहे. विशेषत: ज्या वाचकांना 'कोर्टरुम ड्रामा' वाचायला आवडतात, त्यांना तर हे पुस्तक फारच आवडेल.
-
Omerta (ओमेर्ता)
गॉडफादर' या विश्वविख्यात कादंबरीचे लेखक मारिओ पुझो यांची नवी कादंबरी. जन्मभर खास सिसिलियन पद्धतीनं भरपूर गुन्हे केल्यावर वृद्धपणी संघटित गुन्हेगारीतून आपल्या मान, प्रतिष्ठेला कुठेही तडा जाऊ न देता निवृत्त होण्याइतका डॉन एप्रिल निश्चितपणे दूरदर्शी आणि समयसूचक होता. मुलांना त्यानं गुन्हेगारी जगाचा वाराही लागू दिलेला नव्हता. त्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांनं सिसिलीमधून एक पुतण्या दत्तक घेतला. त्याचं नाव 'ऍस्टर व्हायोला'. डॉन रेमंड एप्रिलची गुन्हेगारीतून निवृत्ती म्हणजे इतर माफिया फॅमिलींना आपले हातपाय पसरण्याची संधी होती, पण एफबीआयचा स्पेशल एजंट कुर्ट सिल्की मात्र तिकडे संशयाने पाहत होता. तेवढ्यात एक अतर्क्य घटना घडली...निवृत्त झालेल्या डॉन एप्रिलचा खून झाला ! सिल्की आणि एफबीआयनं माफियाविरुद्ध आणखी एक जोरदार मोहीम उघडली आणि ऍस्टर व्हायोला आणि डॉन एप्रिलची मुलं आणखी एका - शेवटच्या - युद्धात विनाकरण ओढली गेली. पण आता त्यांच्या मनात संभ्रम आहे - कायद्याच्या बाजूला नेमकं कोण आहे ? आणि आपण काय करायचं ?
-
The Firm (द फर्म)
एक माफिया फॅमिली : सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमधून जमवलेल्या प्रचंड काळा पैसा पांढरा करणारी... त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारी... एका वकिलांची फर्म : माफिया फॅमिलीचा सभ्य धुवट चेहरा असलेली... फॅमिलीच्या काळ्या पैशाचं बेमालूमपणे 'शुद्धिकरण' करणारी... एक वकील : नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडलेला अत्यंत हुशार, चलाख तरुण पोरगा... फर्ममध्ये नोकरी मिळाल्यावर त्याला आणि त्याच्या सुंदर बायकोला वाटतं, आता फक्त सुंदर भविष्यकाळ, भरपूर पैसा, बीएमडब्ल्यू... प्रत्यक्षात मात्र दोघंही फर्मच्या सोनेरी जाळ्यात अडकतात... आणि एकीकडे माफिया फॅमिली, तर दुसरीकडे एफबीआय, अशा कात्रीत सापडतात... आणि जीव वाचवत पळत सुटतात... कायमचे.
-
The Runaway Jury (द रनअवे ज्यूरी)
ज्यूरी... वाटेल ते करून आपल्याच बाजूनं निकाल लावू बघणा-या महागड्या वकिलांनी खास निवडलेली माणसं... कोट्यवधी डॉलर्सच्या नुकसानभरपाईसाठी एका प्रचंड सिगारेट कंपनीविरुद्धच्या वादळी खटल्याच्या मध्यभागी सापडलेली... एक अत्यंत पथदर्शक निकाल देण्याची संधी मिळालेली... पण अगदी निवडक लोकांनाच एक रहस्य माहिती आहे : या ज्यूरींचा निर्णय पडद्याआडून फिरवण्याची क्षमता आहे त्यांच्या नेत्याकडे... फक्त ज्यूरी नंबर दोन म्हणून ओळखल्या जाणा-या या व्यक्तीचा भूतकाळ अत्यंत रहस्यमय आहे, आणि आपल्या सुंदर, तरुण मैत्रिणीच्या सहकार्यानं तो प्रत्येक चाल खेळतोय... संपूर्ण सिगारेट उद्योगाचं भवितय अधांतरी आहे... एक कुटुंब न्यायदानाची वाट बघतंय... वकिलांचं करिअरच बरबाद होण्याची पाळी आली आहे... प्रचंड लाचलुचपत, हाव आणि भ्रष्टाचार होतोय... आणि अशा परिस्थितीत ज्यूरी नंबर दोनबद्दलचं सत्य प्रकाशात येणार असं दिसतंय..
-
For Your Eyes Only
ती टेबलापाशी पोहोचली. बॉंडची नजर तिच्यावरच खिळलेली होती. "काही उपयोग नाही," त्यानं निराशेनं स्वत:शीच म्हटलं. "आपल्याकडे कसली येते ती ? ती नक्कीच तिच्या कुणा दोस्ताला भेटायला येत असणार. असली सुंदर पोरगी नेहमी दुसर्याच कुणाच्या नशिबात असते. हं ! काय पण नशीब आहे !" पण त्यानं स्वत:ला सावरण्याआधीच ती त्याच्या जवळ आलेली होती. एवढंच काय,चक्क त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसलीही होती. "सॉरी मला उशीर झाला. आपल्याला लगेच निघावं लागेल. तुला ताबडतोब ऑफिसमध्ये बोलावलंय." भराभरा ती बोलली आणि मग तिनं हळूच दोन शब्द उच्चारले, "क्रॅश ड्राईव्ह." अचानक आलेल्या अडचणी आणि दिसतात त्यापेक्षा कुणी वेगळ्याच असलेल्या सुंदर पोरी, या दोन्ही गोष्टी जेम्स बॉंडच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनून गेल्या आहेत आणि जेव्हा एखादी कामगिरी त्याच्यावर सोपवलेली असते, तेव्हा ही सगळी कहाणी उत्कंठावर्धक असणार हे नक्की असतं. - एखाद्या क्यूबन गुंडाच्या हत्येची अमेरिकेतली कहाणी असो. हेरॉईनचा व्यापार करणार्या आंतरराष्ट्रीय टोळीचा नायनाट करण्याची कामगिरी असो किंवा सेशेल्समध्ये अचानक झालेला एखादा मृत्यू असो, बॉंड ती कामगिरी त्याच्या खास पद्धतीनंच पार पाडणार...