-
Mudra (मुद्रा)
पायाने अधू असलेल्या निरांजनीची-निरुची कथा 'मुद्रा' तून उमटत जाते. आपल्यातील अपंगत्वापेक्षा अभिजात सुरांचा मिळालेला वारसा हीच तुझी खरी ओळख-सुरांसह आपल्या गायक वडिलांकडून मिळालेली हीही एक शिकवण. हा वारसा जपताना शारीरिक कमतरतेकडे अधिकाधिक तटस्थपणे पाहत,स्वतःला स्वरांतून वाढवत ओळखत नेणाऱ्या निरूचा हा अनोखा प्रवास-परंपरेचा,संस्कृतीचा,मानवी नातेसंबंधाचा दुसरीकडे शोधही घेणारा. आशा बगे यांच्या लेखनात सातत्याने गुंजणार संगीत...स्वरांचा दरवळ इथे ठळक पार्श्वभूमी होतो. संगीतासारख्या कलेच्या चिरांतानात्वाचा अर्थ मानवी जीवनाबद्दलच्या मुलभूत प्रश्नांच्या तळापर्यंत कसा झिरपत गेला आहे हे मांडत,नव्या परिमाणांसह 'मुद्रा' प्रकटत जाते. आणि उत्कट अशी सर्जनशील अभिजात कलाकृती वाचल्याचा दीर्घकाळ मनात रेंगाळणारा सात्विक आनंद वाचकांनाही बहाल करत राहते.
-
Puja (पूजा)
मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तींचे नातेसंबंध, त्यांचे रितिरिवाज, आणि त्यांचे दैनंदिन जीवन यांचे सुस्पष्ट प्रतिबिंब आशा बगे यांच्या कथांतून नेहमीच प्रत्ययास येते. ह्या कुटुंबातील वृद्ध माणसे, तरुण-तरुणी, कोवळी मुले- कोणी विद्यार्थी, कोणी गायक, कोणी आश्रित, कोणी दृष्टिहीन- या सर्वांच्या दैनंदिन जीवनातल्या छोट्यामोठ्या घटनांचे चित्रीकरण प्रस्तुतच्या ‘पूजा’ या कथासंग्रहातून प्रत्ययकारी रित्या आले आहे. छोट्या शहरांमधले शांत वातावरण, लहान-मोठ्या पात्रांची मानसिक आंदोलने, छोट्या-मोठ्या संवादांमधून आणि अल्पाक्षरी वर्णनांमधून डोळ्यांसमोर उभी राहणारी त्यांची व्यक्तिचित्रे... या प्रस्तुतच्या दीर्घकथा संग्रहातील सर्वच गोष्टी वाचकांना एका वेगळ्या वातावरणात घेऊन जातात.
-
Bhumi (भूमी)
माणसांचा स्वभाव, त्यांचे एकमेकांशी संबंध याला काही प्रमाणात परिस्थिती कारणीभूत ठरते. म्हणूनच कधी कधी रोज भेटणारी, जवळची माणसे यांच्याशी नाळ जुळत नाही, पण दूरच्यांशी स्नेह जुळतो. अशा मानवी स्वभावाचे कंगोरे 'आशा वगे' यांच्या 'भूमी' या कादंबरीतून दिसतात. २००४च्या 'सुनामी'मध्ये सापडलेल्या तामिळनाडूतील 'कडलूर' ह्या गावातील एका मुलीची ही कहाणी. आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून स्वतःचा शोध घेणा-या मैथिलीची ही कहाणी एक वेगळ अनुभव देते.
-
Paulvatevarle Gav (पाऊलवाटेवरले गाव )
एखादीच रिकामी होडी किनार्याला. संथ पाण्यावरून पक्षी या तीरावरून त्या तीराकडे उडतात. दुपार कलते. थोडी थंड हवा सुटते. कदाचित पाऊसच येईलही... हे तिच्या मनात राहून गेलेलं गाव तिलाही आता इतक्या काळानंतर जसंच्या तसं सापडणार नाही हे तिला कळलं, आता हे पाणी संथ होतं. पण अशाही वेळा असतातचनं की जेव्हा हे बेभान होतं, आपले तट सोडून सैरावैरा धावतं. त्या पाण्याला मग कुणीही कळत नाही. त्या वेळी ते पाणी नसतंच... प्रलयच असतो. तो प्रलय केवळ पाण्यातच शिरत नाही. तो मस्तकातच भिनत जातो. या सगळ्यात माणसाच्या इच्छा अनिच्छेचा सन्मान कुठला !
-
Pratidwandi ( प्रतिद्वंद्वी )
त्याला अनूची तीव्र अशी आठवण आली. तो लवकरच पूर्ण बरा होत होता आणि आता तिची तशी गरज राहणार नव्हती. पण तिची ही आठवण त्या गरजेपलीकडचीच होती हे त्याला आतून लख्ख समजले. तिची आठवण तिच्या त्याला वाटणार्या स्पर्शाच्या ओढीचीही नव्हती. त्याही पलीकडली होती. त्याची वरची खोली, छत, भिंती, खिडकी, बाजूची गच्ची, ती बाई, तिचा व्यायाम, ते मूल, ती सळसळणारी झाडे आणि अनू, तिची नि त्याचा घडलेला, न घडलेला संवाद हे सगळे एकच चित्र होते. त्याच्यातल्या कार्तिक नसले या दुसर्या कोणीतरी ते काढले होते. त्याला गरज होती ती या सगळ्यांच्या एकत्रित असण्याची. भले त्या एकमेकांत काही अनुबंध न का असेना !
-
Rutuveglare ( ऋतूवेगळे )
स्त्री म्हणून जगताना येणार्या अनुभवांचे आणि प्रश्नांचे विश्लेषण करणारा, स्वातंत्र्योत्तर काळातील एका प्रतिनिधीक वर्गाचे चित्रण करणारा, गत शतकाअखेरीस विज्ञानाने जगण्याचा अर्थच बदलवून टाकला असला तरी माणसांच्या मनातील सनातन संघर्ष मात्र तसाच आहे हे दाखवणारा कथासंग्रह. हे सारे तात्विक वाटत असले आणि ह्यात कथा भरडली गेली असावी, असे वाटत असले तरी तसे झालेले नाही. तिने आपले एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे न् तिच्या गुंगीतून सावरल्यावर लक्षात येते की लेखिका कळत-नकळत आपल्याला बरेच काही सांगून गेली आहे. ह्या लेखिकेचे शब्द मुळातच नादमधुर असतात, आणि त्यांना संगीताचा साज मिळाल्यावर ते अधिकच लयकारी निर्माण करून जातात ह्याचा प्रत्यय ह्या संग्रहांतील कथा वाचतानाही येतो जसे, "धुवाधार म्हणतात तसला हा पाऊस, मल्हार भराला यावा तसा". शेवटी आपले जीवनतही शिल्पासारखेच, लेखिका म्हणते त्याप्रमाणेच "आपणच आपले सारे संचित, सगळ्या भावना, आनंद, दु:ख या शिल्पात पाहतो आणि त्याला अर्थ देतो".