-
Vyakti Ani Valli (व्यक्ती आणि वल्ली)
१९४३ साली ’अभिरुची’ च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार? ’ अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या मानकर्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले. ते कसब तेथेच न थबकता, अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले, एकेकसुद्धा भान हरवील असा; ‘किमु यत्र समुच्चयम्’? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही! अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाचं! देशपाड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्हातर्हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्या-वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात! आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ति आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्या-वाईटाचे अंतर्नाटय देशपांडयांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्या आमच्यांत आहे आणि लेखकातही! अशा या व्यक्ती अणि वल्ली!
-
Maitra (मैत्र )
लेखन, अभिनय, संगीतादी कला, वक्तृत्व अशा अनेक प्रांतात स्वच्छंद संचार करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्याकडे मैत्रीची श्रीमंतीही भरपूर होती. या समृद्धीलाच त्यांनी या पुस्तकात शब्दबध्द केले आहे. केसरबाई केरकर, नानासाहेब गोरे, पंडित विष्णू दिगंबर, खानोलकर, गौरकिशोर घोष, शाहूमहाराज, माटे मास्तर, दादा धर्माधिकारी, ज्योत्स्ना भोळे, तसेच मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, वसंत सबनीस, अशा अनेक थोरांशी जुळलेल्या स्नेहातून, आपुलकीतून हे सुंदर शब्द उमटले आहेत. या भावबंधामधून व्यक्तीमत्व उभी राहिली आहेत. या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये, गुण, त्यांच्या कलेची महती, कामावरील- साहित्य-कलेवरील श्रद्धा यांचा वेधही पुलंनी घेतला आहे. पु.लं. च्या पूर्वप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह म्हणजेच ‘मैत्र’.... ‘मैत्र’ पुस्तक भाई म्हणजेच पु.ल. यांनी विषयाचा अनुसरुन त्याचे मित्र ‘नंदू नारळकर’, ‘मनू गर्दे’, ‘दत्तू गर्दे’ यांच्या मैत्रीला अर्पण केले आहे. सदर पुस्तकात समाविष्ट लेख : * केसरबाई : एका तेज:पुंज स्वराचा अस्त (महाराष्ट्र टाईम्स, २५ सप्टेंबर १९७७) * नानासाहेब गोरे : प्रफुल्ल होवोनि सुपुष्प ठेलें (महाराष्ट्र टाइम्स, १३ जून १९८२) * पंडित विष्णु दिगंबर (सत्यकथा, सप्टेंबर १९७२) * खानोलकरचे देणे (सत्यकथा, ऑगस्ट १९७६) * गौरकिशोर घोष (सुगंध, १९७७) * शाहूमहाराज : एक धिप्पाड माणूस (राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग १९७६) * माटे मास्तर (महाराष्ट्र टाइम्स, ३१ ऑगस्ट १९८६) * हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार (महाराष्ट्र टाइम्स, १५ मे १९७७) * जीवन त्यांना कळलें हो (महाराष्ट्र टाइम्स, २५ नोव्हेंबर १९८४) * दादा धमार्धिकारी (साधना, १७ जून १९७८) * शरदाचे चांदणे (महाराष्ट्र टाइम्स, २७ एप्रिल १९८६) * ज्योत्स्ना भोळे नावाची माझी एक बालमैत्रीण (संगीत-कला-विहार, एप्रिल १९७५) * रामकिंकरदा (महाराष्ट्र टाइम्स, वार्षिक १९८०) * सखे-सोबती गेले पुढती (हंस, मार्च १९७८) * मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (सत्यकथा, जुलै १९६३) * स्नेहधर्मी वसंत सबनीस (महाराष्ट्र टाइम्स, २७ डिसेंबर १९८७) * स्थानबध्द वुडहाऊस (सुगंध, १९७६) * जाने क्यूं आज तेरे नाम पे रोना आया (मौज, दिवाळी १९७९)
-
-
Jeevan Tyana Kalale Ho! (जीवन त्यांना कळले हो !)
पुलंच्या सहवासातील काही मान्यवर व्यक्तींनी लिहिलेल्या काही भावपूर्ण आणि रंजक प्रसंगांच्या आठवणी "जीवन त्यांना कळले हो' या पुस्तकात समाविष्ट आहेत.
-
Bhavgandh (भावगंध)
"पुलं'नी 1945 च्या सुमारास सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या काही कथा लिहिल्या. मात्र, त्या पुस्तकरूपाने आजवर प्रकाशित झाल्या नाहीत. पुलंच्या स्मृतिदिनानिमित्ताने परचुरे प्रकाशनाच्या "भावगंध' या पुस्तकातून त्या प्रकाशित केल्या आहेत. कथांबरोबरच पुलंनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा आणि श्रद्धांजलीपर लेखाचाही त्यात समावेश आहे. "पुलप्रेमी' भाऊ मराठे यांनी त्याचे संकलन केले आहे. "सात-आठ वर्षे "पुलं'वर संशोधन करत आहे. त्यादरम्यान मला त्यांचे अप्रकाशित साहित्य सापडले. विनोदी लिहिणारे पुलं किती गंभीर लिहू शकतात, हे "भावगंध'मध्ये दिसेल. ते वाचताना अक्षरशः वाचकाला रडू येते.'' - भाऊ मराठे "या पुस्तकातील कथांच्या माध्यमातून "रडवणारे पुलं' वाचकांसमोर येतील. रोहिणी भाटे, जितेंद्र अभिषेकी, माडगूळकर, भाऊसाहेब बांदोडकर अशा अनेक दिग्गजांवरील त्यांची व्यक्तिचित्रेही यात आहेत.''- प्रकाशक अप्पा परचुरे
-
Gandhiji (गांधीजी )
१९७० साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीतील मनोगत: महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातच नव्हे, तर सार्या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळ राजकारणी पुढारीच नव्हेत; तर गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय ह्यांतून आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हे लेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाची पाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठी वाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे. भारतातले सुप्रसिद्ध चित्रकार मुरलीधरपंत आचरेकर यांच्या कुंचल्याचा जादूचा स्पर्श ह्या पुस्तकाला झाला. आता हे पुस्तक पाहताना मला असे वाटते की, आचरेकरांची चित्रेच इतकी बोलकी आहेत की, माझा मजकूर त्या चित्रांच्या बोलण्याच्या उगीचच मध्येमध्ये येऊ लागला आहे. त्यांनी श्रद्धायुक्त अंत:करणातून केलेले हे कार्य असल्यामुळे त्यांच्याबद्दल आभाराची भाषा वापरणे औचित्याला सोडून होईल. हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनी लिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या ह्या लेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल. हे चरित्र लिहिताना श्री. फ्रान्सिस फ्रेटस् ह्यांनी मला केलेल्या साहाय्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. ~ पु. ल. देशपांडे
-
Rasikho! (रसिकहो! )
आपल्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातले एक चैतन्यशील, समृद्ध व्यक्तिमत्व, विनोद, नाट्य, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, सामाजिक चिंतन अशा अनेक अंगांनी पु. लं. चे लेखन गेले अर्धशतक मराठी मनाचे रंजन आणि उद्बोधन करीत आले आहे. त्याबरोबरच रंगमंच आणि रजतपट यांवरील अभिनय आणि संगीताच्या क्षेत्रातले विविध अविष्कार यांच्या योगानेही त्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला आहे. आपल्या विविध आणि विपुल लेखनातून पु. लं. नी वाचकांशी दृढ नाते जोडले. रंगभूमीवरील नाटके आणि ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असामी’ सारखे एकपात्री प्रयोग व ‘वार्यावरची वरात’ सारख्या बहुरंगी कार्यक्रमांतून त्यांनी प्रेक्षकांशी परोक्ष संवाद साधला; त्याबरोबरच वेळोवेळी साहित्य, संगीत, नाट्य, अभिनय, सामाजिक संदर्भ घेऊन आलेले विषय यांवरील आपल्या अनेक भाषणांनी ते श्रोत्यांशी प्रत्यक्ष बोलत राहिले. वक्तृत्व हा पु. लं. च्या वाङ्मयीन आणि कलाप्रेमी व्यक्तिमत्वाचाच एक रसरशीत, संपन्न, सुंदर अविष्कार. प्रदीर्घ, व्यासंग, संदर्भसंपन्नता, प्रसन्न विनोद आणि गंभीर चिंतनशीलता यामुळे पु.लं. चे कोणतेही भाषण हा श्रोत्यांच्या दृष्टीने एक मनोज्ञ अनुभव असतो. निखळ प्रांजळपणा हा या भाषणांचा प्राण आहे आणि पु. लं. च्या अंगभूत अभिनयगुणांनी त्यांना एक वेगळे समर्थ परिमाण दिले आहे. आजपर्यंत केवळ स्थानिक लोकांनीच ऐकलेली, किंवा वृत्तपत्रांतून त्या त्या वेळी छापून आलेली पु. लं. ची भाषणे आता प्रथमच ग्रंथरुपाने प्रसिद्ध होत आहेत. वाचकांना ही एक आनंदपर्वणी वाटेल यात शंका नाही.
-
Mitraho! (मित्रहो! )
आपल्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातले एक चैतन्यशील, समृद्ध व्यक्तिमत्व, विनोद, नाट्य, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, सामाजिक चिंतन अशा अनेक अंगांनी पु. लं. चे लेखन गेले अर्धशतक मराठी मनाचे रंजन आणि उद्बोधन करीत आले आहे. त्याबरोबरच रंगमंच आणि रजतपट यांवरील अभिनय आणि संगीताच्या क्षेत्रातले विविध अविष्कार यांच्या योगानेही त्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला आहे. आपल्या विविध आणि विपुल लेखनातून पु. लं. नी वाचकांशी दृढ नाते जोडले. रंगभूमीवरील नाटके आणि ‘बटाट्याची चाळ’, ‘असा मी असामी’ सारखे एकपात्री प्रयोग व ‘वार्यावरची वरात’ सारख्या बहुरंगी कार्यक्रमांतून त्यांनी प्रेक्षकांशी परोक्ष संवाद साधला; त्याबरोबरच वेळोवेळी साहित्य, संगीत, नाट्य, अभिनय, सामाजिक संदर्भ घेऊन आलेले विषय यांवरील आपल्या अनेक भाषणांनी ते श्रोत्यांशी प्रत्यक्ष बोलत राहिले. वक्तृत्व हा पु. लं. च्या वाङ्मयीन आणि कलाप्रेमी व्यक्तिमत्वाचाच एक रसरशीत, संपन्न, सुंदर अविष्कार. प्रदीर्घ, व्यासंग, संदर्भसंपन्नता, प्रसन्न विनोद आणि गंभीर चिंतनशीलता यामुळे पु.लं. चे कोणतेही भाषण हा श्रोत्यांच्या दृष्टीने एक मनोज्ञ अनुभव असतो. निखळ प्रांजळपणा हा या भाषणांचा प्राण आहे आणि पु. लं. च्या अंगभूत अभिनयगुणांनी त्यांना एक वेगळे समर्थ परिमाण दिले आहे. आजपर्यंत केवळ स्थानिक लोकांनीच ऐकलेली, किंवा वृत्तपत्रांतून त्या त्या वेळी छापून आलेली पु. लं. ची भाषणे आता प्रथमच ग्रंथरुपाने प्रसिद्ध होत आहेत. वाचकांना ही एक आनंदपर्वणी वाटेल यात शंका नाही.
-
Sujanho! (सुजनहो! )
"संगीताचा जो उपासक तो माझा आप्तच. तो माझा नातलगचं. मग कोणी वयानं वडील, कोणी वयानं धाकटा, कोणी मित्र. एखादा माणूस गातो, एवढं मला कळलं म्हणजे आनंदच होतो. या जगामध्ये इतकी माणसं आचरट उद्योग करीत असतात की, त्यांत कोणालातरी आपण गावं असं वाटणं हा दुर्मिळ योगच आहे. जीवन सुरेल ठेवण्यापेक्षा बेसूर करण्याकडेच प्रवृत्ती असल्याचं आपल्याला दिसतं. या जगामध्ये कोणीतरी सुरांच्या शोधामध्ये निघालेलं आहे असं दिसलं की तोच माझं सगळं काही. विचार करायला लागलं की असं वाटतं, आपलं जीवन अशा रितीनं श्रीमंत करण्यामध्ये हजारो लोकांनी मदत केलेली आहे, हजारो गीतांनी मदत केलेली आहे. रस्त्यावरून चाललो असताना नकळत एखाद्या वेळेला रेडिओवरून लता मंगेशकरांची एखादी लकेर येते आणि आपल्या श्रीमंतीत भर टाकून जाते. अलंकार केवढा मोठा आहे याला काही किंमत द्यावी असं मला वाटत नाही. तो किती सुंदर आहे, किती आल्हादक आहे, यालाच किंमत द्यायला पाहिजे."
-
Gathoda (गाठोडं )
कालनिर्णय दिनदर्शिकेतील लेख, पत्रलेखन, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले विविध लेख, तत्काली पोलीस आयुक्त वसंत सराफ यांना लिहिलेले पत्र, श्रीकान्त ठाकरे-बाळासाहेब ठाकरे बंधूंना लिहिलेले पत्र, काही कविता असे पुलंचे विविधांगी लेखन यात आहे. - डॉ. श्रद्धानंद ठाकूर ‘गाठोडं’ वाचताना एकसारखं हसू यायला लागलं. पुलंचे शब्द वाचताना ते शब्द आपल्याला ऐकू येतात आणि पुलं स्वत:च समोर बसून गप्पा मारतात, असा भास होतो. एका अर्थाने पुस्तक वाचताना माझ्या स्मृतींचं गाठोडं उलगडलं. ‘पीएल’सोबत गप्पा, गाणं ऐकणं हा आमच्यासाठी जणू उत्सवच असायचा. पुलं म्हणायचे ‘माझ्या भोवती रसिकतेचा महापूर असावा आणि मी त्यातील पूरग्रस्त’. ‘गाठोडं’ वाचतानाही आपली अशीच स्थिती होते, पुलं पर्वातील मी प्रवासी आहे