Vimukta (विमुक्त)
संत्या फारच अस्वस्थ झाला होता. जातपंचायतीचा धमन्याने घोर अपमान केला आहे, असेच त्याला वाटत होते. तेथील सर्वच माणसांत कुजबूज सुरूहोती. एखाद्या हडळिणीकडे बघावे, तसे बायका, मुलं लच्छीकडे बघत होती. लच्छीच्या चेह-यावर मात्र समाधान दिसत होते. संत्या नीट सावरून बसला. खाकरून त्याने घसा साफ केला आणि निर्णय देऊ लागला, "धमन्या व लच्छीनं जातीला काळं फासाचं काम केलंय... जातपंच्यातीचा आवमान केलाय... गुलब्याचं पयसं घेतलं ती घेतलं... आणिक बायकूबी घरात ठिवून घितली... उंद्याच्याला आपल्या जातीत आसच व्हुया लागलं तर... येकमेकांच्या सबदावर कोण सुदीक इस्वास ठिवणार न्हाय.. परत्येक घरातील बाया, माणसं... मनाला यील तसं वागत्याली... ही जातीच्या हिताचं न्हाय... तवा धमन्यानं... आपलं पाल... आशील त्या... सामानसुमानासकट... गुलब्याच्या ताब्यात देवावं... आणिक आंगावरच्या कापडासकट आपल्या बायकु-पोरांस्नी घिवून कुटंबी जावावं... त्येचा आणिक त्येच्या बायकु-पोरांचा जातीशी आता कसलाच संबंध न्हाय." संत्याचा हा निर्णय ऐकताच तेथील सर्व माणसं उठली. लच्छी व धमन्या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन, तेथून शहराच्या दिशेने निघाले. तेथील बायका, पुरुष, मुलं त्या दोघांकडे आवाक होऊन पाहात होती. लच्छी व धमन्याच्या चेह-यावर मात्र वेगळेच तेज चमकत होते. त्यांची मुलं त्यांना बिलगून चालत होती. लच्छी व धमन्या दोघांनीही पालांकडे वा तेथील माणसांकडे ढुंकूनही पाहिले नाही. ते आपल्या जातीच्या आदिम परंपरापासून, दुष्ट रूढींपासून मुक्त झाले होते. जातीच्या, जमातीच्या बंधनांनाच नव्हे तर जाती-जमातीच्या चौकटींना कायमचा रामराम ठोकून, माणूस म्हणून जगण्यासाठी जात होते. त्याच वेळी सूर्य उगवत होता.