Medhavini (मेधाविनी)
अर्थशास्त्र व राज्यशास्त्रात १९७८ साली बी.ए.ची पदवी प्राप्त केलेले आद. यशवंत बैसाणे यांनी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर राजपत्रित पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांच्याकडे यास्तव शासन सेवेचा प्रदीर्घ अनुभव तर होताच. त्या शिवाय खाजगी छापखान्यापासून पंचतारांकित सेंटॉर हॉटेल, तसेच आयकर विभागामधील सेवेचा अनुभव त्यांनी संपादित केला. त्या अनुभवाचा त्या-त्या क्षेत्रातील सहकारी कर्मचारी वर्गाला फायदा मिळवून देण्यासाठी झटत आलेले आहेत. याच दरम्यान कर्मचारी संघटना बांधण्याचा मूलभूत हक्क नाकारणाऱ्या हिटलरशाही वृत्तीच्या विरोधात न्यायालयीन लढा देताना नऊ वर्षे सेवेतून निलंबित झाले. तरीही शोषित, पिडीत कर्मचारी बंधू-भगिनींना न्याय देण्यासाठी सातत्याने पुढे राहिले. 'मोहाडीचे तात्यासाहेब' या स्मरणिकेचे सहसंपादन, त्याचबरोबर वृत्तपत्र व नियतकालिकांतून कथा, लेख व प्रासंगिक लेखनाबरोबरंच मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक संघटनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. आजवरच्या जीवनप्रवासात सान्निध्यात आलेल्या विविध वृत्ती, व्यक्तिमत्त्वांचा उमटलेला सकारात्मक ठसा 'मेधाविनी' या कथासंग्रहाच्या निमित्ताने त्यांनी शब्दबद्ध केला आहे. यातील कथांना सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेची किनार आहे. प्रत्येक कथेतील क्षणाक्षणाची गूढ उत्कंठा हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. समाजाप्रति असणाऱ्या जाणीवांच्या बाबतीत कृतघ्न होणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू लब्धप्रतिष्ठितांना आपल्या सामाजिक बांधिलकीचे उत्तरदायित्व निभावण्याचे स्मरण करून देणे हाच प्रस्तुत लेखकाचा या 'मेधाविनी' च्या निमित्ताने मूळ उद्देश आहे.