Jagavegala Lindbergh (जगावेगळा लिंडबर्ग)
'तुमच्या वयांमध्ये अंतर बरंच आहे गं,' आईनं मुलीला विचारलेल्या प्रश्नाला बगल देत तिनं लग्न केलं पण आईची शंकाच खरी ठरली. विसंवादी असलेल्या (लिंडबर्ग) दांपत्याचा मुलगा पुढली अनेक वर्षे एकाकी आयुष्याचा 'भागीदार' ठरला. बालवयात त्यानं आकाशात उडणारं चिमुकलं विमान पाहिलं... काही वर्षांनी विमानांच्या स्पर्धा पाहिल्या. विमानविषयक प्रेमाचं बीज तेव्हाच त्याच्या मनात अंकुरलं... सुरुवातीच्या काळातील वेड्या साहसकृत्यांमुळे तो 'उडता वेडा' (Flying Fool) ठरला. त्याच वेडापायी त्यानं उत्तुंग झेप घेतली आणि तो जगातील सर्वोत्कृष्ट साहसवीर ठरला...सुखसमृद्धीची सोनेरी पहाट उगवली, मनाजोगती सुविद्य, सुसंस्कृत सहचारिणी मिळाली, संसार बहरला आणि एक दिवस वीजप्रपात झाला... आयुष्यानं नवं वळण घेतलं, नवी आव्हानं समोर ठाकली त्यांनाही तो पुरून उरला..पुन्हा नव्यानं जन्मला, पुनःपुन्हा जन्मला, खंडप्राय मातृभूमीच्या राष्ट्राध्यक्षांना आव्हान देत दंड ठोकून तो उभा राहिला. आयुष्याच्या मध्यावर उभा असताना प्रत्यक्ष युद्धाच्या धुमश्चक्रीत त्यानं पुन्हा एकदा 'साहसवीर' हे बिरुद सार्थ ठरवलं. सेनेमधला सर्वोच्च मान- 'ब्रिगेडियर जनरल' - मिळवला. पण ही तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची केवळ एक बाजू... अनेक अंगांनी त्याचं व्यक्तिमत्त्व झळाळून उठलं. विमानक्षेत्रात भरीव कामगिरी करणारा कुशल प्रशासक, एक वैज्ञानिक, एक लेखक, एक पर्यावरणप्रेमी ही त्याची आणखी काही लोभस रूपं... असा हा कोण जगावेगळा पुरुषोत्तम ?