Ek Ulat Ek Sulat Bhag 2 (एक उलट एक सुलट भाग २)
हे एका शहाण्या मुलीचं मर्मस्पर्शी लिखाण आहे. तिच्यासाठी तिचं लेखन ही एक शोधाची वाट आहे. तिच्यामध्ये एक अतिशय उत्कट अशी शिकणारी मुलगी आहे. ती तिच्या लिखाणामधून स्वत:ला वाढवायला बघते. इतकी वाढण्याची धडपड मला फार कमी माणसांमध्ये दिसते. तिच्यात सतत एक ऊर्मी आहे, सतत एक उत्साह आहे. मोठ्ठा हात पसरून एखाद्या मुलीनी यावं ना, ‘हे सगळं मला हवंय!’ असं म्हणत, तशी मला अमृता तिच्या लिखाणातून दिसते. एकूणच जीवन समजून घेण्याची या मुलीला फार असोशी आहे. शिवाय विचारपूर्वक जगण्याचं भान आहे आणि अशा जातीच्या माणसांना कायम अतृप्त, अस्वस्थ राहण्याचा एक शाप किंवा वर असतो. तोही तिला मिळालेला आहे, असं मला वाटतं. तिच्याभोवती घरीदारी नाटक, सिनेमा, चित्रं, संगीत, गाणं, नाचणं या सगळ्यांनी झणकारणारं वातावरण आहे आणि या झणकारणार्या वातावरणामध्ये ती स्वत:चा आवाज लावू पाहतीये. अतिशय प्रामाणिक आणि उत्कट अशा मुलीचा तो आवाज आहे आणि अमृता, तुझा आवाज आम्हाला छान ऐकू येतोय. डॉ. अरुणा ढेरे