-
Haravaleli Trophy Aani Itar Katha (हरवलेली ट्रॉफी आणि इतर कथा)
'शारदा सहनिवास' म्हणजे सतत काही ना काही उलथापालथ चालू असणारं जग. त्यात सगळ्यात भाव खाणार्या गोष्टी म्हणजे बॅडमिंटनचा खेळ अन् गणेशोत्सवाचं नाटक. ‘आंतर सहनिवास बॅडमिंटन करंडक' शारदा सहनिवासने कसा जिंकला ? तो करंडक हरवला कसा ? अन् त्याचा शोध कसा लागला ? या सार्याचा गणेशोत्सवाच्या नाटकाशी काय संबंध ? दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या खुसखुशीत, खमंग शैलीत उलगडलेल्या धमाल अन् कमाल आठवणी !
-
Mazya Dhammal Goshti (माझ्या धम्माल गोष्टी)
तो मुलगा धडपड्या आहे. चौकस आहे, पण भोचक नाही. त्याचं घर, त्याचं कुटुंब, शेजारीपाजारी, त्याची शाळा, त्याचे शिक्षक-शिक्षिका, त्याचे वर्गातले अन् सोसायटीतले मित्रमैत्रिणी या सगळ्यांनी भरलेलं त्याचं जग. त्याच्या या छोट्याशा जगात घडणाऱ्या अफलातून घटना. सुप्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक दिलीप प्रभावळकरांनी खास त्यांच्या मिष्कील शैलीत उलगडलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणी...
-
Yuddha Nakaranare Jag (युद्ध नाकारणारे जग)
युद्धाला द्यायला हवा ठाम नकार... जगाला संघर्षांनी वेढलेले असताना युद्ध आणि शांतता यांचा सम्यक विचार करणार्या या पुस्तकाचे महत्त्व अजोड आहे. संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, ऑक्सफर्डचे स्कॉलर आणि ‘एका दिशेचा शोध' या १३ वर्षांत २५ आवृत्त्या निघालेल्या राजहंसी पुस्तकाचे लेखक आहेत. युद्धांमागील राजकारण, प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या शर्यती, अतिरेकी राष्ट्रवादाचे दुष्परिणाम यांचा उदाहरणांसह परखड उहापोह या पुस्तकात वाचायला मिळेल. मानवी संस्कृती व सभ्यता यांच्या विनाशाची शक्यता संहारक युद्धांमुळे वाढत चालली आहे, हे सत्य सुस्पष्टपणे मांडले आहे. सर्वनाश टाळायचा तर मानवी समाजाने एकत्र येऊन आणि राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून ठामपणे युद्धांना नकार दिला पाहिजे, असा लेखकांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा योग्य परामर्श घेतला आहे. युद्ध हा मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नाही. शांतता व युद्ध यातून शांततेची निवड करण्याची मुभा आपल्याला आहे, असे हे पुस्तक ठामपणे बजावते. एकीकडे धोक्याचा इशारा आणि दुसरीकडे विचारांना चालना हे त्याचे वैशिष्ट्य.
-
Patrapatri (पत्रापत्री)
आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उद्योग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं ...
-
Udyog Yashogatha (उद्योग यशोगाथा)
एखादी कल्पना उद्योगात रूपांतरित करायला एक वेगळी जिद्द, अर्थशास्त्राची थोडी जाणीव वगैरे अनेक गोष्टी लागतात. त्या अनुभवाने शिकता येतात, पण त्याला अनेक वेळा कालमर्यादा मोठी लागते. यातून या नव्या उद्योजकाची दमछाक होते. अनेकदा कल्पना चांगली असूनही तो अयशस्वी ठरतो. यामुळे सरदेशमुखांनी अगदी लहानांपासून मध्यमवर्गीयांमधील काही व्यक्ती आंतरराष्ट्रीय दर्जावर कशा पोहोचू शकल्या, अशी अनेक वेगवेगळी उदाहरणे संवादात्मक शैलीत समजावून सांगितलेली आहेत. यामुळे नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळायला निश्चित मदत होईल. आपण आपापल्या परीने जमेल तशी हळूहळू व्यवसायवृद्धी करत राहावी, असाही संदेश या पुस्तकातून मिळतो. भविष्यकाळामध्ये हे आवश्यक आहे, असाही संदेश यातून मिळतो
-
Ghumakkadi (घुमक्कडी)
सरधोपटता वजा केली, की तुम्हाला थोडं अधिक चांगलं लिहिता येऊ शकतं, हे नोरा एफ्रॉन या विदुषीचं तत्त्वज्ञान कविता महाजन यांनी त्यांच्या कथात्म लेखनकाळातच ओळखलं होतं. अकथनात्मक लेखन, अनुवादासाठी देशाच्या कानाकोपर्यातील लेखक-लेखिकांचं वाचन, संपादन या सर्व बाबींमुळे त्यांच्या लेखणीला धार आलेली दिसते. रा. भि. जोशींच्या प्रवासलेखनकुळाशी बरंचसं जवळचं नातं सांगणार्या ‘घुमक्कडी' या पुस्तकामध्येही आहे प्रवासाच्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास. तो किती खोलवर आहे, याचा अंदाज यातील कोणताही लेख वाचल्यानंतर उमजून येईल. पृथ्वीची उत्पत्ती, सूर्याची, अग्नीची, पावसाची इतकंच नाही, तर मिठाची उत्पत्ती याबद्दलच्या लोककथांचा प्रवास कविता महाजनांच्या प्रवासाशी एकरूप होऊन रूढार्थानं प्रवासवर्णन नसलेलं एक अचंबित करणारं पुस्तक तयार झालंय. ब्लॉगसाठी लिहिल्या गेलेल्या या प्रवासनोंदी, पण अत्यंत गंभीर आणि अनंत तपशिलांना कवेत घेणार्या.
-
Suranchi Samaradnee : Lata Mangeshkar (सुरांची सम्राज्ञी : लता मंगेशकर)
लताचा आवाज ‘पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने..
-
Navrasancha Jadugar Mohammad Rafi (नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी)
मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...
-
Gosht Reserve Bankechi (गोष्ट रिझर्व्ह बँकेची)
विद्याधर अनास्कर यांच्या 'गोष्ट रिझर्व्ह बँकेची' या पुस्तकातून बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील आकर्षक जगाचा शोध घ्या. हे सर्वसमावेशक मराठी पुस्तक आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकिंग संस्थेच्या रिझर्व्ह बँकेच्या रंजक कथेचा उलगडा करते. आकर्षक कथा आणि तपशीलवार अंतर्दृष्टीद्वारे, लेखक भारताच्या आर्थिक परिदृश्यात आरबीआयची उत्क्रांती, कार्ये आणि महत्त्व यांचा शोध घेतात. हे पुस्तक वाचकांना चलनविषयक धोरणे, बँकिंग नियम आणि आर्थिक स्थिरता राखण्यात रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची भूमिका याबद्दल सखोल समज देते. तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी असाल, बँकिंग व्यावसायिक असाल किंवा भारताच्या वित्तीय व्यवस्थेबद्दल उत्सुक असाल, हे पुस्तक सुलभ मराठी भाषेच्या स्वरूपात मौल्यवान ज्ञान प्रदान करते.
-
Patra Ani Maitra (पत्र आणि मैत्र)
गेली सात दशकं मराठी साहित्यविश्वात डौलदार वाटचाल करणारी प्रकाशनसंस्था ‘राजहंस प्रकाशन’. गेली चाळीस वर्षं ‘राजहंस’चं सुकाणू समर्थपणे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर. अशा दिलीप माजगावकरांचा विविध नामवंतांशी ‘या ह्रदयीचे त्या ह्रदयी’ घातले असा चिंतनशील, भावगर्भ पत्रसंवाद : ‘सप्रेम नमस्कार’. ‘राजहंस’च्या वाटचालीचं विस्तृत सिंहावलोकन करणारी आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रपटाचा गेल्या पाऊण शतकाचा मागोवा घेणारी दिलीप माजगावकरांची प्रदीर्घ मुलाखत : ‘प्रवास श्रेयसाकडे’. ‘दिगमा’ या चतुरस्र अन् लोभस व्यक्तिमत्त्वाला न्याहाळणारे त्यांच्या सुह्रदांचे लेख : ‘असे दिसले दिगमा’. या सा-याचा अंतर्भाव असलेलं – महाराष्ट्राच्या साहित्यिक अन् सांस्कृतिक संचिताच्या इतिहासाचा जणू तुकडा वाटणारं – पत्र आणि मैत्र
-
Skalpel Te Skopee Te Robo (स्काल्पेल ते स्कोपी ते रोबो)
ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्त्र कार्याची . असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, ‘पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.
-
Ek Ulat Ek Sulat Bhag 2 (एक उलट एक सुलट भाग २)
हे एका शहाण्या मुलीचं मर्मस्पर्शी लिखाण आहे. तिच्यासाठी तिचं लेखन ही एक शोधाची वाट आहे. तिच्यामध्ये एक अतिशय उत्कट अशी शिकणारी मुलगी आहे. ती तिच्या लिखाणामधून स्वत:ला वाढवायला बघते. इतकी वाढण्याची धडपड मला फार कमी माणसांमध्ये दिसते. तिच्यात सतत एक ऊर्मी आहे, सतत एक उत्साह आहे. मोठ्ठा हात पसरून एखाद्या मुलीनी यावं ना, ‘हे सगळं मला हवंय!’ असं म्हणत, तशी मला अमृता तिच्या लिखाणातून दिसते. एकूणच जीवन समजून घेण्याची या मुलीला फार असोशी आहे. शिवाय विचारपूर्वक जगण्याचं भान आहे आणि अशा जातीच्या माणसांना कायम अतृप्त, अस्वस्थ राहण्याचा एक शाप किंवा वर असतो. तोही तिला मिळालेला आहे, असं मला वाटतं. तिच्याभोवती घरीदारी नाटक, सिनेमा, चित्रं, संगीत, गाणं, नाचणं या सगळ्यांनी झणकारणारं वातावरण आहे आणि या झणकारणार्या वातावरणामध्ये ती स्वत:चा आवाज लावू पाहतीये. अतिशय प्रामाणिक आणि उत्कट अशा मुलीचा तो आवाज आहे आणि अमृता, तुझा आवाज आम्हाला छान ऐकू येतोय. डॉ. अरुणा ढेरे
-
Manik Moti Manik Varma Ani Parivar (माणिक मोती माणिक वर्मा आणि परिवार)
माणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला. माणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि उर्दूचे ख्यातकीर्त शायर. दोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते सुप्रसिद्ध अभिनेत्री, तर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका. चौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट. संपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये लाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारी अनमोल रत्ने. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार्या स्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट -
-
Lokshahi Aani Hukumshahi (लोकशाही आणि हुकूमशाही)
आदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन करणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते. अनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची आठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व समतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश नसतो. ते कधीही दुसर्यााच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ हा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार्यास विचारांचा अवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात चपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात. लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते विचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार करणार्यांेना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते. न्या. अभय ओक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सशक्त लोकशाहीसाठी अत्यावश्यक असलेले विचारमंथन लोकशाही आणि हुकुमशाही