Chakra Te Chrkha
कृष्ण म्हणजे मूर्तिमंत करुणा आणि गांधीजी म्हणजे साक्षात साकारलेलं अद्भुत प्रेम! गांधीजींचे जीवन म्हणजे सत्य प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. कृष्णाचे जीवन म्हणजे सत्यप्राप्ती- नंतरचे आचरण आहे. धर्माची स्थापना हे कृष्णाचे जीवितध्येय होते; तर सत्याची प्राप्ती हे गांधीजींचे. ह्या दोघां असामान्य व्यक्तींच्या जीवनाचे अवलोकन करून झाल्यावर त्यांच्या कर्मांची मीमांसा केल्यानंतर ह्या दोघांचे उद्देश साध्य झाले, असे आपण म्हणू शकू का? ह्या प्रश्र्नाचे छातीठोकपणे होकारार्थी उत्तर देणे अवघड आहे. … आणि तरीही कृष्णाविना आणि गांधींविना आपल्या देशाचेच काय, सगळ्या जगाचेही; किंबहुना समग्र मानवजातीचेही चालले नाही! चालणार नाही. कृष्ण आणि गांधी ही अशी दोन प्रतीके आहेत की त्यांच्या स्पर्शाविना मानवजातीचा उद्धार होणे शक्य नाही. काळ पुढे जात राहिला आणि मधून मधून अशी प्रतीके मानवजातीला लाभत राहिली हे मानवजातीचे भाग्य होय! ज्या क्षणी मानवजात अशी प्रतीके निर्माण करण्याची क्षमता हरवून बसेल तो क्षण इतिहासाचा अंतिम क्षण असेल!