-
The Testament
गाभा अंधाराचा अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतातल्या, अत्याधुनिक, नावीन्यपूर्ण सजावटीच्या आपल्या छानदार ऑफिसमध्ये अमेरिकेतला एक मान्यवर, अतिश्रीमंत, पण अतिशय रागीट असा वृद्ध उद्योगपती, ट्रॉय फेलन, आपलं मृत्युपत्र लिहीत होता. त्याचा मृत्यू पुढे काही तासांवरच होता. त्याला त्याच्या मुलांना, त्याच्या सोडचिठ्ठ्या दिलेल्या बायकांना आणि जवळपासच्या बगलबच्च्यांना एक संदेश द्यायचा होता, की ज्यामुळे एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला न्यायालयात उभा राहणार होता. कित्येकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार होती. कारण ट्रॉय फेलनच्या नवीन मृत्युपत्रात तो आपली अकरा बिलियन डॉलर्सची मिळकत ब्राझीलच्या अति दुर्गम अशा निबिड जंगलात राहून आदिवासींची सेवा आणि धर्मप्रसाराचे काम करणा-या अज्ञात अशा रॅचेल लेन नावाच्या एका वारसाला देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार होता. व्यसनमुक्तीकेंद्रातून नेट ओ रायले नुकताच बाहेर पडला होता. वैद्यकीय क्षेत्रात उपचारासंबंधी डॉक्टरांनी दाखवलेल्या निष्काळजीपणाबद्दल खटले चालवण्यात नेटने चांगलं नाव मिळवलं होतं. पण व्यसनापायी त्याला ब-याच वेळा बदनामीला सामोरं जावं लागलं होतं. अशा या नेटवर रॅचेल लेनला शोधून काढण्याचं काम सोपवलं होतं. ट्रॉय फेलनचे वारसदार त्याच्या मिळकतीवर गिधाडासारखे घिरट्या मारत होते. ब्राझीलच्या जंगलात जिथे पैशांना काही किंमत नव्हती तिथे नेट, रॅचेलच्या शोधासाठी धडपडत होता. जिथे किंचितशा चुकीमुळे मृत्युशीच गाठ पडायची अशा परिस्थितीत या महिला धर्मोपदेशक डॉक्टर रॅचेलला मित्र आणि शत्रू या दोन्ही पक्षातल्या लोकांनी भरपूर मनस्ताप दिलेला होता. ती स्वत:सुद्धा इतरांना एक आश्चर्याचा धक्का देणार होती.
-
Countegen
कन्टेजन' ही डॉ. रॉबिन कुक यांची वौद्यकीय पाश्र्वभूमीवरील एक यशस्वी रहस्यमय कादंबरी. विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित 'इंटेलिजंट' गुन्हेगारांची टोळी, त्यांची असाधारण गुन्हेगारी व एका बुद्धिमान, निष्ठावंत व्यक्तीनं ती हाणून पाडण्यासाठी जिवाच्या करारानं घेतलेला त्याचा शोध, या पद्धतीनं गुंफलेलं हे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक मांडणीमुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. न्यूयॉर्कच्या मॅनहटन जनरल हॉस्पिटलमध्ये कोणत्यातरी अज्ञात संसर्गजन्य रोगानं एकापाठोपाठ एक माणसं मरू लागतात. मुख्य वैद्यकीय तपासनीस ऑफिसातील गुन्हाअन्वेषण विभागातील निष्णात डॉक्टर जॅक स्टेपलटन शवविच्छेदन केल्यावर चक्रावून जातो.. ! हा घातक संसर्गजन्य रोग कोणता ? इन्फ्ल्युएंझा ?.. प्लेग ?.. टुलरेमिया ?.. रॉकी माउंटन स्पोटेड फिव्हर ?... 70-75 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या या रोगांचे विषाणू पुन्हा कसे आले ? या काळात आणि तेही न्यूयॉर्कमधल्या इतक्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये ? हे विषाणू नैसर्गिकपणे उद्भवले ? की कोणा माथेफिरूदहशतवाद्याचं हे कृत्य ? हॉस्पिटलमधले लोक तरी बचावात्मक का वागतात ? जॅक हात धुवून या प्रकरणाच्या मागे लागतो. सोबत असते त्याची सहाय्यक लॉरी माँटगोमेरी व प्रेयसी होऊ पाहणारी टेरेसा. नॅशनल बायॉलॉजिकल्स्, प्रेझर लॅब, अलास्कातील गोठलेले एस्किमो... शेवटी काय असतं याच्या मुळाशी ? अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडींनी श्वास रोखायला लावणारी ही कादंबरी. या वैज्ञानिक शक्यता कोणत्याही देशात, कोणत्याही काळात प्रत्यक्षात येऊ शकतील, या जाणिवेनं मनाचा थरकाप होतो, हेच डॉ. रॉबिन कुक यांचं यश आहे.
-
The Last Frontier
इंग्लंडच्या एका शास्त्रज्ञाला हुकूमशाही राष्ट्रातून सोडवून परत आणायचे होते. एक हेर त्यासाठी हंगेरीत गेला. तिथल्या सरकारविरोधी संघटनेशी त्याने हातमिळवणी केली; पण काहीतरी बिनसले. सरकारी यंत्रणा सावध झाली. आता संघर्ष सुरूझाला. त्यातून हेराची कारवाई म्हटली, की पिस्तुले, कार्बाईन, गोळीबार, पाठलाग, मोटारी, रेल्वेगाड्या, नद्या, पूल, विध्वंस हे सारे आलेच. पण तरीही संघटनेचा प्रमुख कोणालाच जबाबदार धरत नव्हता. त्याचे विश्लेषण हे पटणारे होते. "भयापोटी सारे घडते आहे' असे तो म्हणे. जुलमी कम्युनिस्ट राजवटीमागच्या प्रेरणा व लोकशाहीवादी पाश्चात्त्य राष्ट्रांमागच्या प्रेरणा यांचा मुळापासून तो वेध घेत होता व त्याच वेळी सरकारशी लढत होता. सबंध देश तुरुंग बनलेल्या भूमीवरती या संघर्षातही एक अस्फुट प्रेम जन्माला आले होते. अॅलिस्टर मॅक्लिनची अगदी वेगळ्या पाश्र्वभूमीवरची आगळी थरारकथा!
-
The Dark Crusedar
इंग्लंडने एक अभिनव क्षेपणास्त्र तयार करायला घेतले. कारण एका नव्या इंधनाचा शोध लागला होता..... पण त्यांचे शास्त्रज्ञ एकामागोमाग एक गायब होऊ लागले, आपापल्या पत्नींसह !.... कुठेतरी या प्रकल्पाची माहिती झिरपू लागली होती. सारे गुप्तहेरखाते त्रासून गेले..... ती एक मोठी योजना होती. एका शत्रुराष्ट्राची योजना. त्यांना जगावर वर्चस्व हवे होते. ते त्या क्षेपणास्त्रपर्यंत पोहोचू पाहत होते. सर्व काही जमत आले. परंतु क्षेपणास्त्राला फ्यूज घालता येत नव्हता. एक शास्त्रज्ञ त्याचवेळी दूरवरच्या बेटावर पोहोचला. त्याने छडा लावायचा प्रयत्न केला अन् नंतर जो धमाका उडाला तो थरारक भाग वाचताना अंगावर काटे उभे राहतात..... क्षेपणास्त्र, बोटी, हेरगिरी, भावी अणुयुद्धे आणि जगावर सत्ता गाजवण्याची लालसा, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर ऍक्शन व थरारक घटना जन्म घेणारच. या कठोर पार्श्वभूमीवरती एक नाजूक प्रेमप्रकरण फुलत होते... ऍलिस्टर मॅक्लीनच्या या कादंबरीचा तेवढाच सरस अनुवाद आपल्यासाठी सादरक रीत आहोत.
-
Fear Is The Key (फिअर इज द की)
प्रथम ते नाट्य हजारो फूट उंच हवेत सुरू झाले. नंतर हा हवेतला रंगमंच जमिनीवर आला, समुद्रावर गेला व अखेर समुद्रतळावर पोचला. त्या समुद्रतळावरील रंगमंचावरती शेवटी रोमहर्षक नाट्याने कळस गाठला. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती, गुन्हेगार व एक झपाटलेला माणूस. यात घडणारे हे नाट्य आजवर मराठी माणसाने कधी कल्पनेतही आणले नसेल.'गन्स ऑफ नॅव्हरॉन्स’चा कादंबरीकार ऍलिस्टर मॅक्लीन याच्या 'फिअर इज द की’ या जगभर गाजलेल्या कादंबरीचा अनुवाद मराठीत प्रथमच श्री. अशोक पाध्ये यांनी त्यांच्या खिळवून टाकणार्या शैलीत केला आहे. एकदा हे पुस्तक हातात पडले की, वाचून संपेपर्यंत कोणताही वाचक ते दुसर्या कोणाला देत नाही. अतिशय उत्कंठावर्धक, थरारक आणि अजोड मानवी बुद्धिकौशल्य दाखविणारी ही कादंबरी आहे.
-
Not A Penny More Not A Penny Less
सिद्धहस्त कथालेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या वाचकांना खिळवून ठेवणार्या कादंबर्यांपैकी ही एक अत्युत्तम कादंबरी. फसवेगिरीच्या आणि बदनामी होऊ शकेल, अशा गुंतागुंतीच्या घटना घडतात आणि मग त्यांचा व्यवस्थित बदला घेतला जातो, तो कसा; ह्याची अत्यंत कौशल्यपूर्ण गुंफण. ऑक्सफर्डचा एक प्रोफेसर, लंडनमधील एक प्रतिष्ठित उच्चभ्रू डॉक्टर, एक फॅशनेबल फ्रेंच आर्ट - डीलर आणि मोहक व्यक्तिमत्त्व असलेला एक इंग्लिश लॉर्ड - ह्या सगळ्यांमध्ये समान धागा तो काय असणार ? तसं पाहिलं, तर कुठलाच नाही ! पण ह्या सगळ्यांना हार्वे मेट्काफ नावाच्या, आंतरराष्ट्रीय शेअरबाजारात अफाट उलाढाल्याकरणार्या लफंग्यानं संपूर्णपणे लुंगवलेलं असतं! आणि त्यांचे पैसे परत मिळण्याची त्यांना थोडीही आशा नसते ! की असते ? आणखी नुकसान होणं शक्यच नसतं, म्हणून ही चार अगदी आगळीवेगळी माणसं एकत्र येतात, आणि काही अफाट, भन्नाट योजना आखतात. त्या योजना पार पाडतापाडता, ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या विख्यात इमारती, जुगाराचे जगप्रसिद्ध अड्डे असलेलं मॉंटे कार्लो, पॅरिसमधल्या एका हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर, लंडनच्या उच्चभ्रू आर्ट गॅलर्या, ऍस्कॉटच्या घोड्यांचं रेसकोर्स, तसंच, विम्बल्डनच्या टेनिस कोर्टावरही जाऊन पोचतात! हे सगळं कशासाठी ? हार्वे मेट्काफनं चोरलेले त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी ! अगदी एक न् एक पैसा !
-
From Russia With Love
उजव्या गालावर आणि डाव्या खांद्यावर ओरखड्याचे व्रण, तालीमबाज, पिस्तुलबाजीमध्ये निष्णात, उत्तम मुष्टीयोद्धा, सुरे फेकण्यात तरबेज, वेषांतर करत नाही, फ्रेंच आणि जर्मन भाषा येतात, धूम्रपानाचं जबरदस्त व्यसन (तीन सोनेरी रिंगांच्या खास सिगरेटस् ओढतो) दुर्गुण : मद्यपान करतो पण अति मद्य घेत नाही, स्त्रियांचा मोह. जगामधल्या प्रत्येक मोठ्या देशातल्या गुप्तचरखात्यामध्ये ब्रिटिश सीक्रेट एजंट जेम्स बॉंड याची संपूर्ण माहिती असलेली फाईल मौजूद आहे. स्मर्श या रशियन गुप्तचर संघटनेनं जेम्स बॉंडला लक्ष्य बनवलं, त्याचा वध करण्यासाठी. जेम्स बॉंडला मोहिनी घालण्यासाठी त्यांनी तातिआना रोमानोवा या रूपसुंदर तरुणीची निवड केली. जेम्स बॉंडला इंग्लंडहून इस्तंबूलपर्यंत खेचून आणणं आणि त्याला आपल्या मोहजालात अडकवणं हे तिचं काम होतं. पुढला सगळा पाताळयंत्री कट तिचे वरिष्ठ घडवून आणणार होते. स्मर्शनं लावलेल्या या सापळ्यात जेम्स बॉंडनं आपण होऊन प्रवेश केला. या घातकी खेळामध्ये भुरळ पाडणारी तातिआना आणि रशियनांचं स्पेक्टर यंत्र ही दोन प्रमुख आमिषं होती. आणि, आणि या भयंकर खेळाचा शेवट अगदी निश्चित होता. तो म्हणजे जेम्स बॉंडचा मृत्यु... ! फ्रॉम रशिया विथ् लव्ह. डेली मेल, संडे टाईम्स या वृत्तपत्रांनी गौरवलेल्या इयान फ्लेमिंगच्या या जबरदस्त कादंबरीचा हा उत्कंठावर्धक मराठी अनुवाद.
-
The Golden Gate
अमेरिका, जगातील बलाढ्य देश. तेथे काहीही घडू शकते- चांगले, वाईट, पलीकडेच ११ सप्टेंबरला येथे घडलेले नाट्य अजून वातेच आहे, न् गूढही आहे. हे जर प्रखर सत्य घडलेले आहे तर ऍलिस्टर मॅक्लीनने ह्या कादंबरीत जे चित्र रेखाटलेले आहे तसे काही तेथे घडलेले नसणार वा घडणार नाही असे नाही असे वाटले असे सत्याकडे झुकलेले हे नाट्य आहे. व्यक्ती विरूद्ध महाकाय यंत्रणा आणि हा गुंता सोडवण्यासाठी तशीच चातुर्यपूर्ण व्यूहरचना हे ह्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याबरोबर असलेले तेलसम्राट, अरब राष्ट्रप्रमुख, जागतिक वृत्तसंस्थांच्या वार्ताहरांचा तांडा, तत्पर सुरक्षा व्यवस्था या सार्याला आपले ईच्छित साध्य करून घेण्यासाठी कसे 'खेळविले’ जाते ह्याची ही वाचकाला 'खिळवून’ ठेवणारी कहाणी.
-
The Client ( द क्लायंट )
जॉन ग्रिशॅम मुख्यत: न्याययंत्रणेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कादंबर्या लिहितात. 'अ टाईम टू किल’, 'द फर्म’, 'द पेलिकन ब्रीफ’ इत्यादी त्यांच्या कादंबर्या जगभरच्या वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. सामाजिक दृष्टीकोनातून खिळवून ठेवणारी कथानकं शैलीदार पद्धतीनं मांडणं, हे ग्रिशॅम ह्यांचं मुख्य वैशिष्ट आहे आणि त्यामुळेच ग्रिशॅम ह्यांच्या कादंबर्या लोकप्रिय ठरल्या आहेत. प्रस्तुत 'द क्लायंट’ कादंबरीत मार्क नावाचा एक अकरा वर्षांचा मुलगा कथानकाच्या केंद्रभागी आहे. मार्क त्याच्या भावाबरोबर-रिकीबरोबर-घराजवळच्याच जंगलात रमतगमत असताना एक चमत्कारिक घटना घडते. एक वकील आत्महत्या करताना ही मुलं बघतात. आत्महत्येआधी हा वकील मार्कपाशी काही रहस्यं उघड करतो. काही वेळानं मार्क ते रहस्य वगळून फक्त ह्या घटनेची बातमी पोलिसांना कळवतो. दरम्यान रिकीला मानसिक धक्का बसतो. कुतुहलापोटी मार्क त्या घटनेच्या ठिकाणी पुन्हा गेलेला असताना पोलिस त्याला गाठतात. तिथूनच मार्कवर ह्या कथानकाचा रोख केंद्रित होतो. न्याययंत्रणेच्या दृष्टीनं मार्क महत्त्वाचा साक्षीदार ठरतो. एकीकडे गुन्हेगारी वर्तुळही मार्कचा माग घेत फिरू लागतं. ह्याचं कारण म्हणजे ह्या घटनेचा संबंध एका राजकारणाच्या हत्येशी असतो. मार्क ह्या परिस्थितीत, विशेष म्हणजे स्वत:च एका स्त्री वकिलाची मदत घेतो. तिचं नाव रेगी लव्ह. हे दोघं एकीकडे न्याययंत्रणा तर दुसरीकडे गुन्हेगारी वर्तुळाला हुलकावणी देत मुख्य पुरावा शोधून काढताना आणि मार्कवरचं सावट दूर होतं. ग्रिशॅम ह्यांचा समाजाच्या वेगवेगळ्या थरातल्या व्यक्तिरेखा जिवंतपणे रेखाटण्यात हातखंडा असल्यानं हे कथानक जिवंत, प्रभावी होतं. न्यायंत्रणा, गुन्हेगारी वर्तुळ आणि राजकारण ह्यांचे धागेदोरे असलेल्या 'द क्लायंट’ मध्ये अखेरपर्यंत गुन्हेगारी जगताची दहशत जाणवते, त्यामुळे मार्कची ही लढत खिळवून ठेवते, अंतर्मुख करते.
-
Toxin
नुकताच घटस्फोट घेतलेला डॉ. किम रेग्गीस आपल्या एकुलत्या एक मुलीला बेकीला घेऊन एका संध्याकाळी फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये गेला. तिथे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खाताना ह्या शोकांतिकेची सुरवात झाली. 'इ. कोलाय' जीवाणूच्या विषामुळे-टॉक्सिनमुळे बेकीचा भीषण अंत झाला. अन्न नीट प्रकारे न हाताळल्यामुळे बेकीला संसर्ग झाला हे उघड दिसत असते. पण ते कोण मानणार ? लाडक्या लेकीच्या मृत्यूमुळे सैरभैर झालेला किम संसर्गाचे कारण शोधण्यासाठी जीवाचे रान करतो. त्याची माजी बायको त्याला या कामात मदत करू लागते. या कामामध्ये त्यांना काय अनुभव येतो ? आपले हितसंबंध जपण्यासाठी कुठल्याही थराला जाणारे, बीफ उद्योगातले प्रचंड ताकद असणारे बेबंद भांडवलदार आणि त्यांची नफा कमावण्यासाठी काहीही करायला मागेपुढे न पाहण्याची हिडीसवृत्ती.
-
Swami
रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. 1946 साली "भैरव’ या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. 1952मध्ये "रुपमहाल’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. "स्वामी’ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन,कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही. कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत,माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव,स्वार्थी,भोळसट,राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी.
-
Ladies Kupe
ही आहे कथा स्वत:चंच आयुष्य विंचरून पाहणार्या एका स्त्रीची, अखिलनंदेश्वरी ऊर्फ अखिला. वय वर्ष पंचेचाळीस, अविवाहित, सरकारी खात्यात कारकून, जगता जगता इतकी ओझी येत गेली खांद्यावर की, तिचं स्वत:साठी जगणं... स्वत:च्या मर्जीनं जगणं राहूनच गेलं. मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आत्या आणि मावशी म्हणून ती उष्ट्या संसारांच्या खरकट्यात फक्त पिचत राहिली. हे रहाटगाडगं खरं तर असंच चालू राहायचं; पण एके दिवशी कशी कोण जाणे, स्वत:चीच हाक ऐकून अखिला निघाली... कन्याकुमारीच्या प्रवासाला - एकटीच. आयुष्यात पहिल्यांदाच मोकळा श्वास घ्यायला... तमिळ ब्राह्मण कुटुंबाने तिच्या अविवाहितपणाभोवती घातलेली कर्मठ रिंगणं तोडून स्वत:च्या मनासारखं जगायला... स्वत:साठी जगायला... आयुष्याची वेगळी चव चाखायला. रेल्वेच्या प्रवासात तिला भेटतं एक वेगळंच जग. लेडीज कूपेच्या धावत्या आडोशात भेटतात आणखी पाच जणी. बघता बघता परकेपणाची बंधनं गळून पडतात. सहा जणींच्या आयुष्याच्या सहा दिशा पकडून गाडी भरधाव सुटते. जखमा मोकळ्या होतात. गुपितांच्या गाठी सुटतात. सहा वेगळी आयुष्यं सहा जणींत वाटली जातात. जानकी... मार्गारेट शांती... प्रभादेवी... शीला... मारीकोलान्थू. लेडीज कूपेमधून प्रवास करताना तिला भेटलेल्या या पाचही जणींना अखिला विचारतेच, "पुरुषांच्या आधाराशिवाय बाई एकटी राहू शकते ? सुखाने, आनंदाने जगू शकते ? की बाईला पुरुष हवाच असतो शेवटी ?"
-
Seizure( सीजर)
पेशींचे क्लोनिंग करून मानवजातीला ग्रासणार्या पार्किन्सन्ससारख्या आनुवंशिक विकारांवर उपचार करण्याचे तंत्र विकसित करणारा विलक्षण बुद्धिमत्तेचा शास्त्रज्ञ डॅनियल लॉवेल आणि लोकांच्या भावनांशी खेळून स्वत:चा राजकीय मतलब साधणारा एक महत्त्वाकांक्षी सिनेटर, एकमेकांच्या समोर उभे ठाकतात. पेचातून सुटका व्हावी म्हणून डॅनियल सिनेटर बटलरचा अनौतिक प्रस्ताव मान्य करून कोणी कधी न केलेले जनुक उपचार करायला तयार होतो. उपचारासाठी लागणारे जनुक थेट ख्रिस्ताच्या रक्तापासून मिळवण्याची विलक्षण अट बटलर घालतो आणि त्यातून सुरूहोते ती पेच-डावपेचांची जीवघेणी मालिका...
-
The Pelican Brief
वॉशिंग्टनमध्ये, एका अंधार्या पोर्नो चित्रपटगृहात एका प्रेक्षकाचा गळा घोटून रहस्यमय खून होतो. सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायाधीश जगातून नाहीसे होतात. आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने डार्वी शॉ या घटनांच्या खोलाशी जाऊन, गुन्ह्यांची संभाव्य उकल आपल्या संशोधनपर निबंधात करते. तिच्या दृष्टीने तो अंधारात मारलेला एक वकिली तीरच- परंतु वॉशिंग्टनच्या राज्यव्यस्थेत त्यामुळे सुरुंग लागण्याचा धोका निर्माण होतो. अनपेक्षितपणे ती एका हत्त्येची साक्षीदार होते. एका निर्भय पत्रकाराच्या मदतीने ती त्या भीषण रहस्याचा शोध घेतो- सत्य जगापुढे आणण्याचा जो जीवघेणा खेळ खेळते त्याबद्दलचे तितकेच जीवघेणे लेखन म्हणजेच ही कादंबरी. ती लिहिणारे जॉन ग्रिशॅम आपली वकिली सोडूनच पूर्ण वेळ लेखनाकडे वळलेली आहेत आणि त्यांच्या पहिल्या चार पुस्तकांची विक्रीच तीन कोटी प्रतींच्यावर गेलेली आहे- ह्यातच ह्या लेखनाच्या सकसतेचे रहस्य दडलेले आहे.
-
The Golden Rondevu (द गोल्डन रॉन्देव्हू )
ते एक मालवाहू जहाज होते. पण त्यातील काही जागा ही श्रीमंत प्रवाशांसाठी राखून ठेवलेली होती. त्यांच्यासाठी आलिशान केबिन्स, उंची मद्यालय, डान्स हॉल, वायरलेसने शेअर्सची खरेदी-विक्री वगैरे सोयी केल्या होत्या. ...अचानक जहाजावरील कर्मचारी गूढरित्या मरण पावू लागले. त्या रहस्याचा उलगडा होईना. कॅप्टन गोंधळून गेला... पण त्याच्या हाताखालचा एक अधिकारी सावध होता. शेवटी ते जहाज दुसर्या एका मालवाहू जहाजाच्या मार्गाला भिडु पाहत होते. त्या जहाजावर खजिना होता... ...एक शास्त्रज्ञ आपणच बनवलेल्या एका अणुबॉम्बसहीत क्षेपणास्त्राला घेऊन पळून गेला... या सर्वांचा एकमेकांशी संबंध येत होता. एक फार मोठा कट राबवला जात होता. फक्त एक अधिकारी तो कट उधळून टाकण्याच्या दिशेने पावले टाकू लागला आणि अचानक... त्या समुद्राच्या पाण्यावर एक नाट्य घडत होते. त्या नाट्यात एक प्रेमप्रकरणही फुलत होते. बोटीवरील जीवनाचे दर्शन घडवणार्या रहस्यमय, उत्कंठावर्धक, कादंबरीचा खिळवून ठेवणारा अनुवाद.
-
The Namesake
तसं पाहायला गेलं तर त्याचा सारा जीवनप्रवास अपघातांच्या मालिकेनेच भरलेला. सुरुवात झाली बाबांच्या गाडीला अपघात झाला त्या घटनेपासून... गोगोल हे नावही अपघातानेच त्याला मिळालं त्याच्या पणजीने निवडलेलं नाव त्यांना अखेरपर्यंत समजलं नाही. कलकत्ता ते केंब्रिज ह्या प्रवासात तिचं पत्र कायमचंच गहाळ झालं. ह्या एका अपघाताचे परिणाम गोगोलला अनेक वर्षं भोगायला लागले. नाव देताना आयत्या वेळी बाबांना त्यांचा अपघात, त्यातून ज्याच्या पुस्तकामुळे ते जीवानिशी वाचले त्या गोगोलच्या नावाने त्याचं नाम:करण झालं. त्या विचित्र नावाने त्याला खूप छळलं होतं. मोठा झाल्यावर त्याने ती चूक दुरुस्त केली तरीही 'गोगोल' नावाने त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही. त्याचा विवाह हा देखील एक अपघातच ... भविष्यात काय घडणार हे कधीच माहीत नसतं. सारं काही अचानक सामोरं येतं. त्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी करता येणं शक्य नसतं; परंतु तेच अनुभव गाठीशी बांधून त्यामागील कार्यकारणभाव शोधायला पुढचं सारं आयुष्य पडलेलं असतं आणि मग ध्यानात येतं की कधी घडायलाच नको होत्या अशा वा कोणतंही प्रत्यक्ष कारण दिसत नसताना घडलेल्या घटनांनीच आयुष्य भरलेलं आहे.
-
Business Legends (बिझनेस लेजंड्स)
जी. डी. बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, कस्तुरभाई लालभाई व जे. आर्. डी. टाटा या आपल्या आयुष्यातच 'आख्यायिका’ ठरलेल्या भारतातील चार महान उद्योगपतींच्या आयुष्याचा व अफाट कर्तृत्वाचा अत्यंत वेधक व विस्मयचकित करून टाकणारा पट येथे उलगडला आहे. ही या चार उद्योगमहर्षींची व्यक्तिचित्रं आहेत. त्यांचं व्यक्तिगत जीवन - त्यांच्या सवयी, जीवनशैली, त्यांची वैचारिक धारणा, अचूक निर्णयक्षमता, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, भोवतालचे ताणतणाव यांचे मनोज्ञ, दुर्मीळ रंग भरता भरता, त्यांच पायाभूत काम करण्याची जिद्द कशी अफाट होती, ब्रिटिश राजवटीत - प्रतिकूल परिस्थितीत कोणकोणते संघर्ष करीत त्यांनी उद्योग उभारले, अडचणींचे 'संधी’त रूपांतर करण्याचे त्यांचे सामर्ध्य किती प्रचंड होते, वैयक्तिक संपत्ती जमविण्याच्या पार पलीकडची त्यांची देशभक्तीमय उद्योजकता व आर्थिक राष्ट्रवादाची दुर्मीळ दूरदृष्टी किती प्रखर होती, याचे लेखिकेनं चैतन्यमय व गहिरे चित्र येथे रेखाटले आहे. त्यांच्या काळाच्या - देशाच्या राजकीय, आर्थिक, सामजिक ताणाबाणाच्या विस्तृत अवकाशावर हे चित्र उभं केलं आहे. हा या लेखनाचा विशेष आहे. लेखिकेनं आजवर अस्पर्श राहिलेल्या अनेक स्रोतांतून तपशील मिळवून संशोधनपूर्वक केलेलं हे लेखन नव्या उद्योजकांना प्रेरक ठरेल."