-
Savadh Aaika (सावध ऐका)
कितीही वाटले, तरी आपले शेजारी बदलता येत नाहीत. पाकिस्तान आणि चीन... हे आपले दोन सख्खे शेजारी देश. अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाण्यात पाहणारे, आपल्याशी लढून हरवायची खुमखुमी बाळगणारे आणि भल्याबुऱ्या मार्गांनी सतत आपल्या कुरापती काढणारेदेखील! जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर वेगाने झेपावणारा चीन आणि भारतद्वेषापायी कोणत्याही थराला जाऊ शकणारा पाकिस्तान हे दोन देश संगनमताने आपल्याला आव्हान देऊ पाहात आहेत. त्या दोघांच्या व्यूहरचनेचा दीर्घकालीन आढावा घेणारे हे पुस्तक प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला सावधानतेचा अगदी समयोचित इशाराही देत आहे...
-
Chitrabhaskar ...(चित्रभास्कर)
भारतीय चित्रपट-संगीताचा केवळ संगीताच्या अंगाने नव्हे; तर परंपरा, इतिहास, सामाजिक स्थित्यंतरे, आर्थिक बाबी अशा कितीतरी पैलूंचा वेध घेणारा बहुआयामी ग्रंथ.
-
Danshakal (दंशकाल)
विहिरीत अंधार आहे. डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार. अंधारात काहीही असू शकतं; काहीहीम्हणजे काहीही. पण ते काहीही म्हणजे नेमकं काय? हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही. आजवर आयुष्यातल्या अप्रिय, असह्य, नको असणाऱ्या गोष्टी मी विहिरीत टाकल्या. अगदी अडगळीत टाकाव्या तश्या टाकल्या. पण विहीर म्हणजे अडगळ नाही. विहिरीत आई आहे, अण्णा आहेत. विहिरीत काकूचं बाळ आहे, नंदाकाका आहे. विहिरीत दमी, तायडी आणि सुपडीही आहे. विहिरीत अनेक उत्तरं आहेत. अशा प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत; किंवा जे प्रश्न मी स्वत:ला कधीच पाडून घेतले नाहीत; किंवा असे प्रश्न ज्यांची उत्तरं मी कधी शोधलीच नाहीत. विहीर माझ्या आयुष्याचा रहस्यभेद आहे, जो अनेकदा शक्य असूनही मी आजवर कधीही केलेला नाही. विहिरीत उतरणं हे माझं प्राक्तन नाही. विहिरीत उतरणं हा मी राजीखुशी निवडलेला एक पर्याय आहे. बाहेरच्या वास्तवाला तोंड देण्यापेक्षा विहिरीत लपून बसणं कधीही सोपंच.
-
Katha Aklechya kaydyachi (कथा अकलेच्या कांद्याची)
चोर चोरी करू शकत नाही, शासक कर लावू शकत नाही, भाऊबंदांमध्ये वाटणी होत नाही आणि तिचे ओझेही वहावे लागत नाही. अशी संपत्ती म्हणजे बौद्धिक संपदा. तरीसुद्धा तिचेही रक्षण करावेच लागते. अगदी व्यक्तिगत पातळीपासून सामूहिक अन् राष्ट्रीय स्तरापर्यंत ही सृजन संपत्ती जपावी लागते, वाढवावी लागते. ही बौद्धिक संपदा तुम्हाला देत असते विशिष्ट हक्क. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगौलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन - अशा अनेक प्रकारांनी हे हक्क तुम्हाला मिळतात. कसे मिळवायचे हे हक्क? कसे राखायचे हे हक्क? कुणी या हक्कांचा भंग केल्यास तो रोखायचा कसा? राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय कायद्यांची यात काय भूमिका असते? अशा अनेक मुद्द्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे - संशोधक-उद्योजकांपासून लेखक-प्रकाशकांपर्यंत, गीतकार-संगीतकारांपासून नाट्य-चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत, चित्रकार-छायाचित्रकारांपासून इंजिनीअर-तंत्रज्ञांपर्यंत, साऱ्या सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या अनमोल निर्मितीचे भान करून देणारे - कथा अकलेच्या कायद्याची.