-
Sankhyadarshan (संख्यादर्शन)
संख्याशास्त्राचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे. त्याचा शास्त्र म्हणून विकास झाला तो गेल्या दीड-दोन शतकांत. शेती, व्यापार, जगनणना वगैरे क्षेत्रांत संख्याशास्त्र वापरले जातेच, पण कोणत्याही विज्ञान क्षेत्रातील प्रयोगांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी संख्याशास्त्र हे एकमेव साधन आहे. संगणकामुळे संख्याशास्त्रातील आकडेोड गतीने होऊ लागली आणि संगणकही या शास्त्राचा अविभाज्य घटक बनला. ही रोचक आणि अभ्यासपूर्ण माहिती देणारे हे पुस्तक.
-
Tai Mi Collector Vhayanu ! (ताई, मी कलेक्टर व्हयनू
प्रतीक्षा करणार्या आम्हा सर्वांना गेटच्या बाहेर काढण्यात आले. निकाल चार-पाच नोटीस बोर्डांवर लावल्यानंतर गेट उडण्यात आले. मोठा कोलाहल झाला व निकालासाठी ताटकळत बसलेले सर्वजण नोटीस बोर्डांवर मधमाशांसारखे जाऊन चीपकले. मी बोर्डासमोर उभ्या असलेल्या मुलांच्या कंबरांमधून जागा करून माझे मुंडके मध्ये घुसवले आणि मान वर करून तालिकेकडे बघू लागलो. तालिकेत माझे नाव बघितले तेव्हा माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. माझ्या हृदयाचे ठोके काही सेकंदांसाठी बंद झाले! तालिकेत दिसणाऱ्या माझ्या रँककवरून मला आय.ए.एस. मिळणार हे निश्चित झाले होते. जे मी अनुभवत होतो त्यावर माझा विश्वास बसत नव्हता.मी घरी आतुरतेने वाट बघत असलेल्या स्मिताला आणि नंतर माझ्या माऊलीला-ताईला-आनंदाची बातमी कळवण्यासाठी उतावीळ झाले होतो. त्यांना फोन करतोपर्यंत माझा कंठ दाटून आला होता व डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ताईने फोन उचलताच मी जोराने ओरडलो, "ताई, मी कलेक्टर व्हयनू!"
-
Lock Griffin (लॉक ग्रिफिन )
ही गोष्ट आहे एका मराठी कुटुंबाची. गोष्ट आहे तीन पिढ्यांची ,ह्याला पार्श्वभूमी आहे गेल्या बासष्ठ वर्षांतील इतिहासाची, संस्कारांची आणि घटनांची. ह्या काळात अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतरे येऊन गेली. एका साधारण मध्यमवर्गीय घरात घडणारी ही गोष्ट. नेहमीच्या धडपडीतही सुखानं नांदणारं हे घर. आजूबाजूच्या स्थित्यंतरांचे, कधी पुसट तर कधी गडद, पडसाद उमटत गेले. जीवनमान बदलत गेलं, आर्थिक परिस्थिती सुधारत गेली, त्याचबरोबर आजूबाजूचा गोंधळ, अस्थिरता आणि अस्वस्थता वाढतच गेली. येणार्या वादळातही, शिक्षण, संस्कार, मूल्यं यांची ओंजळ जपत इतर अनेकांसारखं हे घरही उभं होतं. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सत्ताकरणाची गुंतागुंतीची समीकरणं अनाकलनीय असली, तरी भयप्रद आहेत. एक अस्वस्थ खळबळ आहे, सारं काही हरवत चालल्याची भिती वाटते. जगभर उद्रेकाचे पडघम वाजायला लागले आहेत. एकीकडे क्रयशक्तीची भरमसाठ वाढ आहे, तर दुसरीकडे मंदीचा भस्मासूर वाकुल्या दाखवतो आहे. वादळात सापडलेल्या गलबताला दिशाहीनतेचं सावट ग्रासून टाकत आहे. १९२४ साली रत्नागिरीजवळच्या छोट्या गावात जन्माला आलेले विश्वनाथ मोरेश्वर हे पहिल्या पिढीतले, त्यांची दोन मुलं, मोठा रघुनाथ बँकेत नोकरीला, तर धाकटा धनंजय सिक्युरिटी सॉफ्टवेअर आणि एनक्रिप्शन क्षेत्रातील तज्ज्ञ. रघुनाथचा एकुलता एक मुलगा सौभद्र आणि त्याची अमेरिकन मैत्रिण ज्युलिया ही तिसरी पिढी. ६२ वर्षांचा कालखंड, अमेरिका, ब्रिटन, दिल्ली, डोंबिवली असा विस्तृत रंगमंच. एका उत्कंठावर्धक जिगसॉचे तुकडे जुळवत चित्र उभं करणारी ही कहाणी. सामान्य माणसांच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं. हे नाट्य उलगडून दाखवणारी ही गोष्ट.
-
Jeevan Tyana Kalale Ho ! (जीवन त्यांना कळले हो)
जन्मतःच किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या व्यक्तींच्या अतुलनीय मनोधैर्याच्या कथांचे हे पुस्तक आहे. नियतीने लादलेले अपूर्णत्व झुगारून जीवनाला सकारात्मक भावनेने सामोरे जाण्याची त्यांची वृत्ती अभिमान वाटावी अशीच नव्हे; तर प्रेरणादायक आहे. आपल्याला आपल्या पूर्णत्वाबद्दल विचार करायला लावणारी आहे.
-
Kathepathcha Samudra (काचेपाठचा समुद्र)
काऊन्सेलिंगची गरज हे विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन-तीन दशकांच अपत्य ! ती गरज असणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी 'जाऊ की नको,' ही अवस्था ओलांडण्यात वेळ वाया जातो. तरी बिचकत का होईना, आता लोक काऊन्सेलरकडे जातात. तसे माझ्याकडेही येत. या कादंबरीची नायिका माझ्याकडे आली नव्हती. पण... नायिकेची अस्वस्थ शेजारीण मला भेटायला आली. शेजारी राहणाऱ्या नवविवाहित दांपत्याबद्दल तिनं मला खूप काही सांगितलं. ती निंदा नव्हती. सामाजिक कर्तव्याचं भान असलेली ती शेजारणीला तीन-चार आठवड्यात पाहिलं नाही, वा तिचं बोलणं ऐकलं नाही,असं सांगून अस्वस्थ स्वरात म्हणाली, "नवरा तिला दटावत असल्याचं कानी येतं. तिचे दबले हुंदके ऐकू येतात, म्हणजे ती बाहेरगावी गेलेली नाही. एवढ्या माहितीच्या आधारे मीच त्या 'नायिके' कडे गेले आणि मग... लेखिकेसमोर एका भग्न आयुष्याचा मोठा पट उभा राहिला. लेखीकेमधील काऊन्सेलरने तो उध्वस्त झालेला संसार सावरला. त्याचीच ही कथा...
-
मनातल्या वावटळी
या कथांमधून, निवेदनांमधून लेखिका रोजच्या जगण्यातल्या संगती विसंगती सांगत प्रश्नांची भेंडोळी निर्माण करते. त्या त्या कथेतील व्यक्ती रेखा कधी आपण जगलेली, पाहिलेली असते, त्यांचे प्रश्न परिचयाचेही असतात. वाचकाने उत्तर देण्याचे आवाहन त्यात असते. आपणही त्यावर नकळत विचार करू लागतो, सुन्न होऊन !
-
Hi Aaplich Manas! (ही आपलीच माणसं)
महाराष्ट्रात राहणारा तो मराठी अशी व्याख्या आता पुरेशी नाही. जगाच्या पाठीवर कुठेही राहून महाराष्ट्राबद्दल जिव्हाळा असणारा तो मराठी माणूस ! या दृष्टीनं बर्याच वर्षांपूर्वी अमेरिकेत जाऊन स्थिरावलेली, तेथील नागरिकत्व स्वीकारलेली माणसं ही आपलीच असतात. त्यांचं भावविश्व जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
-
Udai ( उदई )
अशिक्षण, दारू, चोऱ्यामाऱ्या आणि रुढीपरंपरेची उदई म्हणजे वाळवी लागलेला पारधी समाज आजही बहुतांश त्याच मानसिकतेत जगतो आहे. अशा या शापित समाजातील एक बाप आपल्या मुलाच्या शिक्षणाचा ध्यास धरतो. मुलाच्या शिक्षणासाठी सारे कष्ट झेलतो. मुलाला मात्र शिक्षणाचा तिटकारा आहे. रडतखडत मुलगा दहावीपर्यंत पोचतो. दहावी नापास झाल्यावर बाप मुलाचं नाव टाकतो. येता-जाता साऱ्यांसमोर मुलाला बॉल लावतो. बापाचं हेच वागणं मुलात जिद्द निर्माण करतं. मुलगा पदवीधर होतो. शिक्षणाचं महत्व समजतो आणि समाजातील लोकांनाही शिक्षणासाठी प्रवृत्त करू लागतो. अशिक्षित आणि दुर्लक्षित समाजातल्या मुला-बापातला हा संघर्ष. त्यासोबत आहे पारधी जीवनाचं भेदक वास्तव.
-
Pagora (पागोरा)
आत्मकथनपर लेखनाचे सामर्थ्य घेऊन अवतरलेली रमेश अंधारे यांची एक लक्षणीय कादंबरी.
-
Bhatkyacha Bharud (भटक्याचं भारुड )
राज्यपालांचे नामनियुक्त सभासद म्हणून लक्ष्मण माने १९९० ते १९९६ या काळात महाराष्ट्रविधान परिषदेत कार्यरत होते. त्यावेळी निमित्ता-निमित्ताने त्यांनी अनेक भाषणे केली, प्रश्नविचारले, प्रस्ताव मांडले, त्यातील निवडकसाहित्य या पुस्तकात संग्रहित केले आहे. एक संवेदनशील लेखक आणि तळमळीचा व तडफेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या या मतप्रदर्शनाला आगळे मोल आहे. त्यांचा मुख्यरोख भटक्या-विमुक्तांचे प्रश्न, त्यांना राखीव जागा व सवलतीहा आहे आणि त्याचमुळे राज्यशासनातील वर्णव्यवस्था व नोकरशाहीची अनास्था यामुळे ते सतत क्षुब्ध आहेत. त्यांचा हा क्षोभ स्वाभाविकच तेजस्वी भाषेतून व्यक्त होतो तेव्हा...
-
Urmila (उर्मिला )
'उर्मिला'त प्रत्येक महत्वाची व्यक्तिरेखा स्पष्ट व पूर्ण स्वरूपात प्रगट झालेली दिसते. विषय सामाजिक स्वरूपाचा आहे म्हणजे तो एखाद्या मोठ्या समूहाचा आहे असे नव्हे, किंबहुना, हेच वाक्य पूर्ण फिरवून म्हणायचे तर तो विषय मानवी समूहाचा, सबंध मनुष्याजातीचा आहे. उर्मिला ही कादंबरी केवळ उर्मिला आणि विश्वास या दोन पात्रांची नाही केवळ या एका जोडप्याची नाही. ही कादंबरी एका अनिवार्य नैसर्गिक नात्याची तर आहेच, पण स्त्रीचा आदिम हक्काची आहे. स्त्रियांच्या हक्काला हळुवार स्पर्श करणारी ही कादंबरी स्त्रीच्या हक्कासंबंधी, म्हणजे व्यक्ती म्हणून पुरुषाइतकेच महत्व असेल्या व्यक्तींसंबंधी आहे. तिला तो हक्क कसा मिळतो, नव्हे तो ती कसा मिळवते हे दाखवणारी ही कादंबरी आहे. -के.ज. पुरोहित
-
Pachat (पाचट)
बलुती संपली आणि नगर-बीड जिल्ह्यांतील मोठा दलित समाज ऊसतोडीच्या कामाला लागला. दैन्य कायम राहिले, परंतु त्या जोडीला अस्थिरता आली. ‘पाचट’मध्ये येते ती अशाच एका कुटुंबाची कथा. १९७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे ती गहिरी बनते. ऊस तोडकरी साखर कारखान्याच्या आश्रयाने राहतात. कामाचे हंगामी स्वरूप आणि असंघटित वर्ग यांमुळे त्यांच्या व्यथावेदनांकडे समाजाचे लक्ष वेधले जात नाही. हे पुस्तक ही या लक्षावधी कामगारांची कैफियतही होते...
-
Udhavast (उद्ध्वस्त )
दारिद्रय, निरक्षरता, बेकारी, बिमारी, बकालपणा यांनी माणसं गंजून; वैभवाच्या शिखरांना सीमा नाही आणि दारिद्र्याच्या तळाला अंत नाही. घर घरात राहिलेलं नाही, माणूस माणसातनं हरपलाय आणि घराघरातील माऊली घराच्या तळाला गाडली जात आहे... हे वर्णन आहे लक्ष्मण माने यांनी केलेल्या आजच्या समाजस्थितीचं. त्यांना जगाविषयी कुतूहल आहे, मनुष्यजीवनाविषयी आस्था व प्रेम आहे; परंतू त्यांचे मान पीडलेले आहे भटक्या- विमुक्तांच्या, आदिवासींच्या, पददलितांच्या दुःख वेदनांनी. त्यांच्यातल्या कार्यकर्ता अशा स्थितीतही परिवर्तनाची लढाई लढू पाहात आहे आणि त्यांच्यातील लेखकाचं मन आक्रोशत आहे. 'या दुःखाला वाचा फोडता आली तर पाहावी' म्हणून त्यांनी मांडलेला हा कथांचा प्रपंच...
-
Palavarach Jag ( पालावरचं जग )
भटक्या आणि विमुक्तांच्या वस्त्या-पालं यांचा शोध घेऊन, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांची स्थितिगती आणि त्यांचे प्रश्न लेखकाने या पुस्तकात भेदकपणे मांडले आहेत.
-
Paanikam
अलिकडच्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक चलनवलनाचा वेध घेणारं, बेगडी, ढोंगी आणि कांगावखोर वृत्तींचा समाचार घेणारं जळजळीत लेखन.
-
Reshepalikadil Lakshman ( रेषेपलीकडील लक्ष्मण )
एक सर्वसामान्य मुलगा स्वत:च्या कर्तबगारीनं लेखक, विचारवंत, कलावंत, गुणवंत, साहित्य अकादमी ते पद्मश्रीसारखे पुरस्कार घेणारा कार्यकर्ता, प्रेमळ-वत्सल पती, पिता आणि एक चांगला माणूस कसा बनतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मण माने. या व्यक्तीला शब्दांत बांधणं तसं कठीणचं, तरी त्यांच्या सहवासात आलेल्या विविध स्तरांवरील व्यक्तीच्या अनुभवातून त्याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
-
Sankalpa ( संकल्प )
संजीव खांडेकर यांच्या पुनर्प्रस्तावनेसह - सामाजिक चळवळीतील तरुणांच्या जाणिवांचा शोध.