-
Rajmata Jijau (राजमाता जिजाऊ)
राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर... जिजाऊंची जडणघडण कशी झाली? त्यांनी शिवरायांना कसे घडवले? जिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता? जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले? हे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते. सर्वसमावेशक, सकलजनवादी परंपरेच्या पाईक जिजाऊ. महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी.
-
Pankh Sakaratmakateche (पंख सकारात्मकतेचे)
लेखक डॉ. ओस्तवाल हे जरी डॉक्टर असले तरी हे लेख म्हणजे निव्वळ आरोग्यावरचे कथन नाही. ते स्वत: या सगळ्या अनुभवांतून गेलेले आहेत. या सर्व प्रसंगात त्यांनी सकारात्मकता कृतीत उतरवली आहे. अत्यंत अवघड प्रसंगांमध्ये परिस्थितीवर फक्त आणि फक्त सकारात्मकतेने कशी यशस्वी मात करता येते, याचे वस्तुनिष्ठ अनुभव या पुस्तकात सर्व वाचकांना वाचायला मिळतील. या पुस्तकातील प्रत्येक कथा ओघवत्या शैलीमध्ये लिहिली आहे. या कथा वाचकांसाठी अत्यंत बोधप्रद ठरतील आणि त्यातून त्यांना जीवनभरासाठी सकारात्मकतेची ऊर्जा मिळेल.
-
Kali Kala (काली काला)
काली आणि काला अर्थात कृष्ण हे दोन्ही अवतार दुष्टांचे निर्दालन करून पृथ्वीवर सुशासन प्रस्थापित करण्यासाठी अवतरले. अहिंसेची, शांततेची पुनर्स्थापना आणि सौख्यदायी नवसर्जनासाठी अपवादात्मक परिस्थितीत हिंसा गरजेची आहे, असा संदेश महाकाली व काला म्हणजेच कृष्ण या अवतारांनी दिला आहे. काली कालाच्या उत्पत्तीपासून त्यांनी जनमानसावर पिढ्यान् पिढ्या उमटवलेल्या अमिट ठशाची विविधांगी कारणमीमांसा शोधणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक.
-
Rashtrachya Shodhat Bharat (राष्ट्राच्या शोधात भार
'सगळ्या विविधता, भेदाभेद यांच्यापलीकडे जाऊन 'एकमय भारतीय' होण्यासाठी राज्यघटनेने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे अनुसरणे अपरिहार्य आहे. या अनुशासनातूनच भारत एकसंघ, बलशाली राष्ट्र बनू शकेल, हा विचार प्रभावीपणे मांडणारे चिंतनपर पुस्तक. आपण खरोखर एक 'राष्ट्र' आहोत का? कसे बनते एक राष्ट्र? राष्ट्र म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य चळवळीत निर्माण झालेली राष्ट्रवादाची भावना राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण करू शकलो नाही का? विविध धर्म-वंश-जाती-भाषा-संस्कृती असणारा हा खंडप्राय भूभाग खरंच एक राष्ट्र बनू शकेल का? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. विद्यार्थ्यांसाठी, राजकीय नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी... प्रत्येक सजग भारतीय नागरिकासाठी संग्राह्य, वाचनीय पुस्तक राष्ट्राच्या शोधात भारत
-
Santashreshtha Dnyanadev-Jeevan Ani Karya (संतश्रे
भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक संदर्भ-साधनांचे ज्येष्ठ संकलक वा. ल. मंजूळ यांनी चितारलेल्या ‘संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य’ या चरित्राने संतसाहित्याच्या अभ्यासामध्ये नव्याने भर पडली आहे. संत ज्ञानदेवांच्या आयुष्यातील चमत्कारिक घटना-प्रसंग यांचा सश्रद्ध चिकित्सेद्वारे अभ्यास करण्याची गरज लेखकाने यातून सूचित केली आहे. ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘हरिपाठ’ आणि संकीर्ण अभंग या ज्ञानदेवांच्या सर्वपरिचित साहित्यसंपदेबरोबर ‘ज्ञानदेव’ अशी नाममुद्रा असलेल्या अन्य ४५ रचनांचा तपशील यामध्ये सादर केला आहे. ज्ञानदेवांच्या चरित्रावरील सोळा इंग्रजी ग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्या साहित्याचा काही विदेशी अभ्यासकांनी अभ्यास केला आहे. त्यांचा परिचय स्वतंत्र प्रकरणाद्वारे पुस्तकात दिला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी शैव-वैष्णव संप्रदायाचा संगम जुळवून आणला. त्यातून कोणती स्थित्यंतरे झाली, याचे आणि पालखी सोहळ्याचे यथार्थ वर्णन यामध्ये आहे. ज्ञानदेवांच्या चरित्रविषयक प्रकाशित-अप्रकाशित, तसेच मराठी, संस्कृतबरोबरच देशी-विदेशी भाषांतील संदर्भसाहित्याचे दालन वा. ल. मंजूळ यांनी याद्वारे आपल्या पुढे खुले केले आहे.
-
Shunya (शून्य)
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी 'शून्य' ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता, तसेच वास्तव आणि भ्रम गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते. सखोल ज्ञानावर आधारित अतिशय संयत असे हे कथाकथन आपल्याला 'शून्या' च्या प्रांतात घेऊन जाते. शून्यतेच्या अशा एका विश्वात जेथे गहिरी आणि चिरस्थायी शांतता सदैव नांदत असते; ही असीम शांतताच सर्व गोष्टींचे उगमस्थान आणि शेवट आहे. केरळमधील एका छोट्या, शांत उपनगरात तो अचानक कुठूनतरी अवतरला. तो स्वतःला 'शून्य' म्हणवतो, झिरो. परंतु तो नक्की आहे तरी कोण? एक वेडसर मनुष्य? काळी जादू करणारा मांत्रिक? कोणी एक लुच्चा? की एक अवधूत, एक साक्षात्कारी महापुरुष? सामी नावाने ओळखली जाणारी ही व्यक्ती एका स्थानिक ताडी विक्री केंद्राच्या पाठीमागच्या अंगणातील छोट्या झोपडीमध्ये राहू लागते. तिथे ती व्यक्ती बोधकथा सांगते, आशीर्वाद देते, शिव्याशाप देते, काळ्या चहाचे असंख्य पेले रिचवते आणि सर्वार्थाने मुक्त असे आयुष्य जगते. क्वचित प्रसंगी आपल्या बांबूच्या जुन्या बासरीतून मन मोहून टाकणारी संगीतनिर्मिती करते. कालांतराने, ज्या गूढ प्रकारे तो अवतरला तशाच पद्धतीने एका नवीन कालखंडाची मुहूर्तमेढ रचून एक नवा साहसी मार्ग निर्माण करून 'शून्य' एकाएकी नाहीसा होतो.
-
Abhinayankit (अभिनयांकित)
आपण अनेक वेळा एखादी कलाकृती पाहतो आणि त्यातलं अभिनेत्याचं काम चांगलं का वाईट असा शिका मारून मोकळे होतो, परंतु अभिनेत्याने एखाद्या पात्रासाठी काय आणि कशी मेहनत घेतली असेल याचा आपल्याला अंदाज असतोच असं नाही. पण काहीअभिनेते आणि अभिनेत्री मात्र आपल्या सहज अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत आले आहेत. या कसदार कलाकारांनी आपलं एक स्थान निश्चित केलं आहे. · लेखिका आणि ज्येष्ठ सिने-नाट्य अभ्यासक जयश्री दानवे यांनी या पुस्तकात अशाच १६ अभिनेत्यांचा एक माणूस आणि एक कलाकार म्हणून झालेला प्रवास उलगडून दाखवला आहे. यातील काही कलावंताना नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. · निळू फुले, डॉ. श्रीराम लागू ते भरत जाधव, सुबोध भावे आणि सचिन खेडेकर अशा अजून काही निवडक ज्येष्ठ आणि गुणी अभिनेत्यांचा प्रवास या पुस्तकात लेखिकेने उलगडून दाखविला आहे. जयश्री जयशंकर दानवे या ज्येष्ठ सिने नाट्य अभ्यासक आहेत. ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर येथे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ संगीत शिक्षिका म्हणून काम केलं आहे. आजवर त्यांची जवळपास ३१ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना त्यांच्या कार्यासाठी आणि लेखनासाठी असंख्य पुरस्कार लाभले आहेत. आघाडीच्या वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमध्ये त्यांचे लेखन वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे. लेखनाबरोबरच त्या पार्श्वगायनही करतात. साहित्य अभिवाचनाचे कार्यक्रमही त्या करतात.
-
Aswasthaparv-Vedh Jagatik Ghadamodincha (अस्वस्थपर
एका बाजूला प्रचंड कुतूहल वाटावं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड अस्वस्थता असावी अशा काळातील जागतिक घडामोडींचा वेध प्रस्तुत लेखन घेतं . प्रगतीसाठीची धोरणं राबवताना जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग सर्वांना व्हावंच लागेल ; ही वाटचाल उदारमतवादी लोकशाही बळकट करणारी ठरेल ; लोक जगाच्या व्यवहारात इतके सामावले जातील , की ते जागतिक नागरिक म्हणवणं पसंत करतील ; त्यातून राष्ट्र - राज्य संकल्पनेतील सीमारेषाही धूसर व्हायला लागतील ; या आदर्शवादाला ,त्यातील गृहीतकांच्या फुग्याला तीस वर्षांच्या वाटचालीनंतर टाचणी लावणारं वळण जागतिक व्यवहारात आलं आहे. हे का आणि कसं घडत गेलं ,या प्रश्नाचा शोध हे पुस्तक घेतं . वंश ,धर्म अशा बाबींवर आधारलेला बहुसंख्यांकवाद जगाच्या अनेक भागांत बोकाळतो आहे. अल्गोरिदम ,आर्टिफिशयल इंटेलिजन्स ,रोबोटिक्स ,नॅनो टेक्नॉलॉजी आणि डेटा सायन्स ही वर्चस्वाच्या लढाईची हत्यारं बनताहेत . यातून निर्माण होणारे नवे ताण ,नवी स्पर्धा ,जगाच्या अस्वस्थतेत भर टाकते आहे. या पार्श्वभूमीवर 'क्वाड 'सारखा गट बळकट होतो आहे. त्यातून इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्र हे प्रमुख स्पर्धा होण्याची चिन्हं दिसताहेत .
-
Atmadnyanache Vidnyan (आत्मज्ञानाचे विज्ञान)
या परिवर्तनशाली पुस्तकात आनंदाच्या अमर्याद विश्वाची गुरुकिल्ली सद्गुरू वाचकांचना विविध स्वरुपात देऊ करतात. या पुस्तकात प्रत्येकासाठी काहीतरी अमूल्य आहे. सत्याच्या शोधकांना यांत दैनंदिन जीवनाच्या ताण तणावांनी ओढवलेला क्षीण झटकून त्यांच्या शोधयात्रेचे आनंदयांत्रेत रूपांतर करता येईल. साशंक मनाला अशी काही सोपी साधने मिळतील ज्या द्वारे तर्काच्या मर्यादा उलांडून त्या पलीकडच्या जीवनाच्या उद्दत्तेचे दर्शन होईल. शास्त्रज्ञाला त्याच्या आंतरीक प्रयोगशाळेत स्वतःच नवे नवे प्रयोग करण्यसाठी मार्ग मिळेल. भक्तासाठी गुरूकृपेची जीवनाच्या सध्या आणि दैनंदिन गोष्टींत प्रचीती येऊन जणू पर्मानंदाचे विश्वच खुले होईल. कर्म, विचार, भावना, बुद्धीमत्ता, अन्न, कामवासना, निद्रा, उर्जा, इत्यादी नाना पैलूंवर नव्याने प्रकाश टाकत या पुस्तकात जीवनाच्या अंतिम सत्याकडे आणि अमर्याद आनंदाकडे नेणार्या केवळ कवी कल्पना नसून प्रत्यक्ष आयुष्यात चोखाळण्याजोगा एक मार्ग दाखवला आहे. पुस्तकाचा पहिला भाग या आनंदयात्रेच्या नकाश्याचे विवेचन करतो तर दुसरा भाग त्यावरून प्रयेक्ष चालण्यासाठी साधने आणि मार्ग देतो. या यात्रेवर असताना जीवनाच्या दृष्टीकोनात होणार्या अमुलाग्र बदलांनाच तुमच्या प्रगतीचे द्योतक मानले पाहिजे.