-
Garibiche Arthakaran (गरिबीचे अर्थकारण)
आपल्याकडे काही अब्ज डॉलर्स आहेत आणि आपण ते गरीब लोकांच्या भल्यासाठी खर्चू इच्छित असल्याची कल्पना करा. आपण ही रक्कम नक्की कशी खर्चू? सरकारांचे अब्जावधी डॉलर्स, हजारो स्वयंसेवी संस्था आणि विनानफा तत्त्वांवर काम करणार्या संस्था हे सगळे गरीब लोकांचं भलं करण्यासाठी काम करतात. त्यांचं काम मात्र गरीब लोक आणि एकंदर आपलं जग यांच्याविषयीच्या काल्पनिक संकल्पनांच्या आधारेच नव्हे तर चुकीच्या गृहितकांवर सुरू असतं.अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो यांनी आपल्या पुरस्कारप्राप्त ‘पॉव्हर्टी ‘अॅक्शन लॅब’च्या माध्यमातून विकासनीतीशी संबंधित असलेल्या अर्थशास्त्रामध्ये ‘रँडमाइझ्ड कंट्रोल ट्रायल्स (आरसीटी)’ ही संकल्पना रुजवली. आरसीटीच्या वापरामुळे आणि उपलब्ध असलेल्या पुराव्याकडे बारकाईनं लक्ष दिल्यामुळे गरीब लोकांसाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना प्रभावशाली ठरतात याची अचूकच नव्हे तर आपल्याला धक्का देणारी माहिती मिळू शकते असं त्यांचं प्रतिपादन आहे. गरिबीच्या खऱ्या कारणांविषयी आणि ती संपवण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी खरंखुरं भान देणारं पुअर इकॉनॉमिक्स हे अपूर्व म्हणता येईल असं पुस्तक आहे. वैश्विक दारिद्य्राविषयी कळकळा असलेल्या प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं पुस्तक - स्टीव्हन डी. लेव्हिट, ‘फ्रीकॉनॉमिक्स’ या पुस्तकाचे सहलेखक वाचलंच पाहिजे असं पुस्तक - नंदन निलेकणी गुंतवून टाकणारं आणि महत्त्वाचं - फोर्ब्ज मी रंगून गेलो आणि मला हे पटलं - रॉबर्ट सॉलो, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ. आस्वादपूर्णरीत्या लिहिलेलं आणि मानवतावाद तसंच खरीखुरी जाण यांनी भरलेलं - प्रताप भानू मेहता, आऊटलुक इंडिया.
-
IIT BIT-Eka iitianchi Anbhavgatha (आयआयटी बीआयटी-ए
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात आयआयटी या संस्थेबद्दल अनेकांना कुतूहल वाटतं, आकर्षण वाटतं. आपल्याला या संस्थेत शिकायला मिळावं किंवा आपला पाल्य या संस्थेत शिकून उच्चस्थानी जावा, असं अनेक विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना वाटतं. याचं कारण तंत्रशिक्षण देणार्या जगभरातल्या नामवंत संस्थांमध्ये आपल्या देशातील आयआयटीजचा समावेश होतो. अर्थात प्रत्येक इच्छुकाला या संस्थेत प्रवेश मिळणं आणि तिथल्या शैक्षणिक वातावरणाचा अनुभव प्रत्यक्षात घेता येणं शक्य नाही. मात्र सुकन्या पाटील या एका आयआयटीअनने लिहिलेलं ‘आयआयटी-बीआयटी’ हे पुस्तक तुम्हाला हा अनुभव नक्कीच देईल. इतकंच नाही, तर आयआयटीत प्रवेश का घ्यायचा? तो मिळवण्यासाठी काय तयारी करायची? अशा प्रश्नांच्या उत्तरांपासून तिथलं शैक्षणिक वातावरण, शिक्षण देण्याची आणि घेण्याची पद्धत, त्या पद्धतीचा भाग म्हणून राबवले जाणारे विविध उपक्रम, त्या उपक्रमातून व्यापक होत जाणारा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आणि त्यातून पुढे सरकणारी इंजिनिअर होण्याची आणि माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया या साऱ्या बाबीचं समग्र दर्शन आपल्याला या पुस्तकातून घडेल. आयआयटी बॉम्बेमधील उत्साह वाढवणारे मूड इंडिगो, टेक फेस्टसारखे विविध उपक्रम, होस्टेल लाईफ, शिक्षक-विद्यार्थी यांच्यामधील खेळीमेळीचं वातावरण यांच्या बारीक-सारीक नोंदी घेत सुकन्याने हे पुस्तक अत्यंत रंजक पद्धतीनं लिहिलं आहे. त्यामुळे आयआयटीत जाऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि इतरांनीही हे पुस्तक आवर्जून वाचावं असं आहे. मनोविकास प्रकाशनाने असं पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन. -अच्युत गोडबोले
-
To kill A Mockingbird (टु किल अ मॉकिंगबर्ड)
हार्पर ली या अमेरिकन लेखिकेची मुख्य ओळख एकाच रचनेमुळे जगप्रसिद्ध झालेली लेखिका अशी आहे. टु किल अ मॉकिंगबर्ड हीच ती अजरामर कलाकृती होय. ली यांच्या या कादंबरीचा विद्यागौरी खरे यांनी केलेला प्रस्तूत अनुवाद प्रकाशित करून मनोविकास प्रकाशनाने मराठी साहित्यविश्वाच्या समृद्धीत मोलाची भर घातली आहे. वसाहतवादावर पोसलेल्या सर्व युरोपियन राष्ट्रांना मागे टाकून अमेरिकेने विसाव्या शतकात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली यात वाद नाही. परंतु या घोडदौडीत अफ्रिकन कृष्णवर्णीय गुलामांचे फार मोठ्या प्रमाणावर शोषण झाले ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी, अमेरिकेतीलच एक समूह निग्रोंच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत राहिला आणि त्याने त्यासाठी गृहयुद्धाचाही धोका पत्करला. ही एक प्रकारची रुपेरी कडा होय. महात्मा जोतीराव फुले यांनी आपली ‘गुलामगिरी’ ही कृती या समूहातील न्यायप्रिय योद्ध्यांना अर्पण केली. ...तरीही वंशश्रेष्ठत्त्वाचा हा गंड अमेरिकन मानसिकतेचा जणू हिस्सा बनला. गेल्या शतकातील साठच्या दशकात हा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला होता. मार्टिन ल्यूथर किंगसारखे नेते यातूनच पुढे आले. याच रणधुमाळीत केनेडी बंधूंची कसोटी लागली. हार्पर ली यांची ही कादंबरी याच वातावरणात प्रसिद्ध झाली आणि गाजली. ऑटिकस फिंच या वकिलाच्या कुटुंबाला केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेली ही कादंबरी ऑटिकसच्या स्काऊट या निरागस पण स्मार्ट मुलीच्या निवेदनातून ती आकाराला येते. यातील वंशवाद तसा खास अमेरिकन असला, तरी विद्यागौरी खरे यांनी म्हटल्याप्रमाणे आपला समाज, आपले शेजारी ह्यांचा विचार करायला शिकवणारे हे पुस्तक एकमेकांपासून तुटत चाललेल्या आत्मकेंद्री आणि स्वार्थी वृत्तीने पछाडलेल्या आपल्या समाजाकरता फार आवश्यक आहे. आपल्याच भाऊबंदांनी चालवलेल्या कृष्णवर्णीयांच्या शोषणाविरूद्ध उभ्या ठाकलेल्या वकिलाची ही कहाणी असली तरी हा वकील एक आदर्श पालक आहे. आपल्या कृत्यांचे नैतिक परिणाम विशेषत: आपल्या मुलांवर काय होतील याचा विचार करूनच पुढे पाऊल टाकणारा तो एक जबाबदार व प्रगल्भ नागरिक आहे. कादंबरीतील किशोरवयीन व प्रौढ पात्रांचा समतोल लेखिकेने खूप कौशल्याने सांभाळला आहे. अलीकडे मूल्यशिक्षणाची चर्चा नेहमी ऐकू येत असते. या दृष्टीने पाहिले तर ही कृती मूल्यशिक्षणासाठी एक उत्कृष्ट पाठ्यपुस्तक ठरावी. - सदानंद मोरे 1961 मध्ये पुलित्झर पुरस्कार प्राप्त कादंबरी आणि त्यानंतर या पुस्तकावर आधारित चित्रपटाला अकॅडमी अवॉर्डने गौरविण्यात आले. हा चित्रपट पुस्तकाप्रमाणेच देखील अभिजात कलाकृती म्हणून गणला जातो.