-
You Are The Best Wife (यू आर द बेस्ट वाइफ)
ही गोष्ट त्या दोघांची ज्यांचे विचार आणि आदर्शवादी तत्त्व परस्परविरोधी असतात; पण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोघेही बदलतात, जास्त छान बनतात. जगाकडे बघायची त्यांची दृष्टी एकमेकांमुळे बदलून जाते. दोघे सुखात, आनंदात असतात ; पण दैवाची योजना काही वेगळीच असते. लेखकाची ही स्वत:ची आत्मकथा आहे. संसाराच्या सुखी प्रवासात प्रिय पत्नीचा हातातला हात अर्ध्यावरच सुटून गेल्यावर एकटं जगताना त्याने आयुष्याशी केलेला संघर्ष यात आहे. सोबत असतात केवळ जाताना तिने तू सर्वोत्तम पती आहेस, हे काढलेले उद्गार. तिचे हे शब्द त्याला बळ पुरवतात. आपलं 'प्रेम करण्याचं' वचन ती गेल्यावरही पूर्ण करायला. अत्यंत प्रामाणिकपणे, विनोदाचा प्रसन्न शिडकावा करत सांगितलेली ही एका उबदार प्रेमाची गोष्ट आहे. तो आणि ती, प्रेमात आलेले सगळे अडथळे कसे पार करतात, एकमेकांच्या साथीने कडू-गोड अनुभवांना कसे सामोरे जातात, अजय आपलं प्रेम कसं निभावतो हे वाचताना आपलाही प्रेमावरचा विश्वास पुन्हा एकदा पक्का होतो.
-
Four Seasons (फोर सीझन्स)
कामायनी ही व्यक्तिरेखाच आपल्या आयुष्याचा पट आपल्यासमोर उलगडत आहे. निर्णय एकटीनं घेऊन तो परिणामांसकट जबाबदारीनं निभावण्याची हिंमत तिच्यात यावी ही तिच्या बाबाची अपेक्षा तिनं कधीच पूर्ण केली नाही. तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेल्या पुरुषांनी त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली तिचे निर्णय झाकोळून टाकले. आणि मग त्यांचे टेकू घेतले म्हणूनच तिचं आयुष्य आQस्थर राहिलं. आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या विचारांच्या पायावरच भक्कम आणि ठाम स्थिरावू शकतं, हे शिकायला तिला माळरानावरच्या या कणखर कातळावर यावं लागलं. इथल्या चार ऋतूंमध्ये ती जे शिकली ते आजवर मिळालेल्या धड्यांपेक्षा कितीतरी अधिक, जास्त सकारात्मक आहे. सगळं संपल्यानंतरही नव्याने जीवन सुरू करण्याची उमेद, जीवनचक्रातली लय, ठामपणा, चिवटपणा.. आयुष्याने जे दान दिलं ते स्वीकारून, अन्यायाने कुढत न बसता नव्या वाटा शोधत पुढे जाण्याची जीवनेच्छा, विस्थापनानंतरचं स्थलांतर, नवजीवन.. या कातळावर, इथल्या ओसाडीत तिच्यात बरंच काही नव्यानं रुजलं. निसर्गाचं- ऋतूंचं एक जीवनचक्र माळरानानं आश्वासकतेनं पूर्ण करून दिलं, अशीच भावना घेऊन ती या माळरानावरून पुढच्या प्रवासाकरता निघते.