Four Seasons (फोर सीझन्स)
कामायनी ही व्यक्तिरेखाच आपल्या आयुष्याचा पट आपल्यासमोर उलगडत आहे. निर्णय एकटीनं घेऊन तो परिणामांसकट जबाबदारीनं निभावण्याची हिंमत तिच्यात यावी ही तिच्या बाबाची अपेक्षा तिनं कधीच पूर्ण केली नाही. तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेल्या पुरुषांनी त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली तिचे निर्णय झाकोळून टाकले. आणि मग त्यांचे टेकू घेतले म्हणूनच तिचं आयुष्य आQस्थर राहिलं. आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या विचारांच्या पायावरच भक्कम आणि ठाम स्थिरावू शकतं, हे शिकायला तिला माळरानावरच्या या कणखर कातळावर यावं लागलं. इथल्या चार ऋतूंमध्ये ती जे शिकली ते आजवर मिळालेल्या धड्यांपेक्षा कितीतरी अधिक, जास्त सकारात्मक आहे. सगळं संपल्यानंतरही नव्याने जीवन सुरू करण्याची उमेद, जीवनचक्रातली लय, ठामपणा, चिवटपणा.. आयुष्याने जे दान दिलं ते स्वीकारून, अन्यायाने कुढत न बसता नव्या वाटा शोधत पुढे जाण्याची जीवनेच्छा, विस्थापनानंतरचं स्थलांतर, नवजीवन.. या कातळावर, इथल्या ओसाडीत तिच्यात बरंच काही नव्यानं रुजलं. निसर्गाचं- ऋतूंचं एक जीवनचक्र माळरानानं आश्वासकतेनं पूर्ण करून दिलं, अशीच भावना घेऊन ती या माळरानावरून पुढच्या प्रवासाकरता निघते.