-
Attar Aani Gulabpani (अत्तर आणि गुलाब पाणी)
ललितलेखक रवींद्र पिंगे हे हरहुन्नरी लेखणीचे धनी आहेत. व्यक्तिचित्रं रेखाटणं हा त्यांचा हातखंडा. जयवंत दळवी, प्रभाकर माचवे, हमीद दलवाई, सुमती पायगावकर, सेतु माधवराव पगडी अशा भिन्न पिंडांच्या साहित्यसेवकांची ही जिवंत दर्शनं. आस्वादक दृष्टिकोन, माहितीचे बारीकसारीक कण आणि स्वयंभू बाजाची आकर्षक भाषाशैली हे पिंगे ह्यांचे व्यक्तिरेखाटनाचे विशेष आहेत.
-
Ravindrayan
रवींद्र पिंगे यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनाला चाहता वर्गही मोठा आहे. त्यामुळेच पुस्तक, दिवाळी अंक, मासिके, वृत्तपत्र अशा विविध माध्यमांतून त्यांनी लेखन केले. आणि त्याला वाचकांनीही दाद दिली. त्यांचे अनेक लेख गाजले. त्यातील काही लेख रविंद्रायन या लेखसंग्रहात वाचायला मिळतात. व्यक्तिचित्र, निसर्ग, साहित्य अहसा विविध विषयांवरील त्यांचे लेख यात आहे. यातून पिंगे यांचे खास लेखनवैशिष्ट्य दिसून येते.
-
Sarvottam Ravindra Pinge
ललित लेखन हा साहित्यातील बहुधा सर्वात सोपा आणि तितकाच अवघड प्रकार असावा. कोणीही उठावं आणि कोणत्याही विषयावर लिहावं आणि त्यास ललित लेखन असं लेबल चिकटवावं, असं गेली अनेक वर्ष सुरू आहे. तरीही कसदार ललित लेखकांची परंपरा मराठीत मोठी आहे. याच परंपरेतील एक भारदस्त नाव रवींद्र पिंगे असं आहे. पिंग्यांचं गेल्याच वर्षी निधन झालं. त्यापूर्वीची सलग तीन-चार दशकं ते लिहीत होते. हे काम सोपं नाही. इतका प्रदीर्घ काळ सातत्यानं वाचकांना मोहून टाकणारं लिखाण करणं, ही एक तपश्चर्याच आहे. त्याचं कारण म्हणजे कथा-कविता-कादंबरी अशा कोणत्याही राजमान्य साहित्यप्रकाराऐवजी पिंगे हे केवळ ललित लेखनच करत राहिले आणि त्यातून त्यांनी स्वत:चा असा विशिष्ट वाचकवर्ग तयार केला. पण पिंगे हे केवळ लेखकच नव्हते. तर ते एक साहित्यकर्मी होते. अनेक साहित्यिक उपक्रमांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि अनेकांना लिहितं करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. पिंग्यांनी नोकरी केली ती आकाशवाणीत. त्यानिमित्तानं त्यांचा अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांशी संबंध आला. शिवाय, पिंग्यांना प्रवासाची आवड होती आणि चांगलंचुंगलं खाण्याचीही. वाचन हा तर त्यांचा केवळ छंद नव्हे, तर त्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य घटक होता. त्यातून त्यांचं आयुष्य कमालीचं समृद्ध होत गेलं. हेच अनुभव पिंगे शब्दबद्ध करत गेले आणि त्यातून एक मोठा लेखक निर्माण झाला.