Sarvottam Ravindra Pinge
ललित लेखन हा साहित्यातील बहुधा सर्वात सोपा आणि तितकाच अवघड प्रकार असावा. कोणीही उठावं आणि कोणत्याही विषयावर लिहावं आणि त्यास ललित लेखन असं लेबल चिकटवावं, असं गेली अनेक वर्ष सुरू आहे. तरीही कसदार ललित लेखकांची परंपरा मराठीत मोठी आहे. याच परंपरेतील एक भारदस्त नाव रवींद्र पिंगे असं आहे. पिंग्यांचं गेल्याच वर्षी निधन झालं. त्यापूर्वीची सलग तीन-चार दशकं ते लिहीत होते. हे काम सोपं नाही. इतका प्रदीर्घ काळ सातत्यानं वाचकांना मोहून टाकणारं लिखाण करणं, ही एक तपश्चर्याच आहे. त्याचं कारण म्हणजे कथा-कविता-कादंबरी अशा कोणत्याही राजमान्य साहित्यप्रकाराऐवजी पिंगे हे केवळ ललित लेखनच करत राहिले आणि त्यातून त्यांनी स्वत:चा असा विशिष्ट वाचकवर्ग तयार केला. पण पिंगे हे केवळ लेखकच नव्हते. तर ते एक साहित्यकर्मी होते. अनेक साहित्यिक उपक्रमांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि अनेकांना लिहितं करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. पिंग्यांनी नोकरी केली ती आकाशवाणीत. त्यानिमित्तानं त्यांचा अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांशी संबंध आला. शिवाय, पिंग्यांना प्रवासाची आवड होती आणि चांगलंचुंगलं खाण्याचीही. वाचन हा तर त्यांचा केवळ छंद नव्हे, तर त्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य घटक होता. त्यातून त्यांचं आयुष्य कमालीचं समृद्ध होत गेलं. हेच अनुभव पिंगे शब्दबद्ध करत गेले आणि त्यातून एक मोठा लेखक निर्माण झाला.