-
THRILLS (थ्रिल्स)
महादेव मोरे लिखित ‘थ्रिल्स’ या कथासंग्रहातील ‘चिंधी’, ‘पुतळी’,‘दाऊ’, ‘वासना’,‘माधोसिंह’,‘एक हास्य आणि एक खून’ या कथांतील पात्रे मानवतेला हरताळ फासतात आणि मग समाजातील माणसेच पेटून उठतात. त्यांतील काही दु:ख-अन्याय सहन करतात, तर काही स्वत: हत्यारं उचलतात.‘पुतळी’ ही गरीब नर्तकी हाती बंदूक घेऊन खून-लूटमार करत संघर्षमय आयुष्य जगते. ‘रहस्य मधील वकिलाला त्याची अशिल-मिसेस नीला देशपांडे अजब कोड्यातच टाकते. तिचा गुंता सोडवण्याऐवजी वकीलमहाशय स्वत:च त्यात गुरफटत जाऊन फसतात. ‘सूड’मधील लाखनसिंह, रघुवीरसिंह, सुबासिंह यांच्यातल्या आपापसांतील वितुष्टांमुळे-सूड भावनेने त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात. ‘नियती आणि न्याय’ मधून पंजाबी कुटुंबातील जसपालसिंहचा मृत्यू होतो. जसपालच्या पत्नीचा चुलतभाऊ-महेंद्रसिंग,हा खून करतो का,की- पलविंदरकौर? हे गूढ सतावत राहते. ‘आणीबाणीतील गोष्ट’ ही तोतया प्रेमशंकरची.
-
Zangat (झंगाट)
गजबरवाडी या छोट्याशा गावातील बाळूमास्तर आणि भरमूअण्णा या धनदांडग्याच्या वैराची ही कहाणी. मास्तरचा मुलगा श्रीपतीचे रुक्की नावाच्या विवाहित मुलीशी संबंध असतात. रुक्कीच्या लग्नाच्या आधीपासूनच हे संबंध असतात आणि रुक्कीच्या पहिल्या लग्नानंतरही ते चालू राहतात. रुक्कीचा पहिला नवरा त्यामुळे तिला सोडून देतो. तिचं दुसरं लग्न होतं, तरी श्रीपतीचे आणि तिचे संबंध सुरू राहतातच. याचा फायदा घेऊन भरमूअण्णा रुक्कीला मास्तरच्या घरात घुसवण्यासाठी अनेक उपाय योजतो; पण मास्तर श्रीपतीला लपवून ठेवतो आणि भरमूअण्णाला पुरून उरतो; मात्र रुक्कीला माहेरीच राहणं भरमूअण्णाने भाग पाडलेलं असतं. शेवटी भरमूअण्णा एके दिवशी गुंडांकरवी मास्तरला बेशुद्ध होईस्तोवर मारहाण करवतो आणि ते प्रकरण पद्धशीरपणे दाबतो. मास्तरला गाव सोडणं भाग पडतं. या सगळ्या प्रकरणात रुक्कीची मन:स्थिती काय असते? ती सासरी जाते का? श्रीपती समोर येतो का? काय होतं शेवटी या ‘झंगाटा’चं?
-
Tingad (तिंगाड)
‘तिंगाड’ कथेत गावातली पूरस्थिती बघायला येतात पालकमंत्री...अन् तेच पडतात पाण्यात...तर ‘वैकुंठ’ कथेतील निगवणी गावात होते नवीन स्मशानभूमी आणि वाहून जाते पाण्यात...नगरपालिकेत तेव्हा रंगलेली असते हाणामारी... ‘जाळं’ या कथेत ब्ल्यू फिल्म चाललेली असताना पोलीस छापा टाकतात आणि स्वत:च ब्ल्यू फिल्म बघत बसतात...‘हुमान’ कथेत आहे काळ्या बाप्या आणि लंबू तुक्या या इरसाल जोडीचा ‘खास’ भाषेतील हंगामा... ‘गस्त’मध्ये गावात सुरू होतं चोर्यांचं सत्र, रामा थोरवतसह गावकरी घालायला लागतात गस्त...गस्तीदरम्यान दारू पितात...चोरांना मिळतं मोकळं रान...‘इलेक्शन’मधील तथाकथित वार्ताहर हणमंत देशमुख आणि गुंडू न्हाव्याची निवडणुकीच्या प्रचारादरम्यानची ‘मज्जा’ आणि त्यांच्या पारवाळांची झालेली चांदी...‘शिकार’मधील धोंडबा ड्रायव्हरचा मालक जातो शिकारीला अन् घाबरतो वाघाला, धोंडबाच मग वाघाला अर्धमेला करतो, मग मालक वाघावर गोळी चालवतो...अन् नंतर कळतं की तो वाघ सर्कशीतला असतो... अस्सल गावरान पार्श्वभूमी आणि इरसाल बेनी...विनोदाची अनोखी मेजवानी
-
Pravah (प्रवाह)
मधुकर कदम हा नवलेखक तरुण कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडतो आणि त्याचं गाव सोडून मोठ्या भावाकडे राहायला जातो. तिथे एका पेढीवर नोकरी करत असताना त्या पेढीच्या शेटजीच्या मुलीच्या, सविताच्या वासनेच्या जाळ्यात मधुकर सापडतो आणि त्याला स्त्री-देहाची चटक लागते. नंतर सविता आत्महत्या करते आणि मधुकर गावी परततो. काही दिवसांनी मेहता नावाचा माणूस त्याला शब्दकोडे स्पर्धेसंबंधित नोकरी देतो. मेहतांच्या ऑफिसमधील जोशी, मधुकरला वेश्यागमनाची दीक्षा देतो. त्याच ऑफिसमधील सुलोचनाशी मधुकरचा शरीरसंबंध येतो. मेहतांची नोकरी सोडून मधुकर, अक्कोळकरांच्या ‘जनता’ नावाच्या साप्ताहिकात नोकरीला लागतो. तिथे अक्कोळकरांची बायको मधुकरशी लगट करायचा प्रयत्न करते; पण गुप्तरोग झाल्याचं सांगून तो तिला टाळतो. त्यानंतर एका दुर्गम गावात त्याला मास्तरची नोकरी मिळते. तिथे शिरमव्वा नावाची एक बेरड मुलगी मधुकरमध्ये मनाने गुंतते; पण तिच्या पवित्रतेमुळे मधुकर तिच्यापासून दूर राहतो. तो गाव सोडायचं ठरवतो आणि शिरमव्वा त्याला भरल्या डोळ्यांनी-मनानी निरोप देते.
-
Bali (बळी)
रामू या तरुणाचं गॅरेज आहे... त्याच्या गॅरेजजवळ राहणार्या रतन या शाळकरी मुलीचं त्याच्यावर प्रेम आहे...पण रामू आणि रतन लग्न करू शकत नाहीत...मात्र त्यांच्यात चिठ्ठ्यांची देवाण-घेवाण सुरू असते...रतनचा मोठा मामा तुक्या तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असतो...त्यामुळे रतन नेहमी आत्महत्येची भाषा करत असते...जेव्हा रामूला ही गोष्ट समजते तेव्हा तो संतापतो आणि तुक्याला बदडून काढतो...तिच्या अन्य कुटुंबीयांना हे माहीत असूनही ते तिकडे दुर्लक्ष करत असतात...त्यांनाही रामू दम भरतो...त्यामुळे तुक्याला काही प्रमाणात पायबंद बसतो...मग रतनचं लग्न ठरतं...पण रामू आणि रतन परस्परांमध्ये मनाने गुंतलेले असतात... रतनचं लग्न होतं का? या जगावेगळ्या प्रेमकहाणीचा अंत काय होतो?
-
Pavhna (पाव्हणा)
भिमू हा मामाच्या गावी म्हाईसाठी आलेला तरुण...इनामदारांचा शहरात शिकणारा मुलगा जैसिंगही म्हाईसाठी गावात आलेला... बाजीराव भोसल्या, सिरपा आत्याळ्या, येश्या शेवाळ्या आणि जानु उपाळ्या ही गावातली चांडाळ चौकडी... गावठी दारू तयार करणे, गावातील लोकांच्या शेळ्या-मेंढ्या पळवणे, गावातल्या पोरीबाळींवर नजर ठेवून, संधी साधून त्यांच्यावर बळजबरी करणे, त्याबाबत जर कुणी विचारायला आलं तर त्याला बेदम मारणे, प्रसंगी जीव घेणे, असले त्यांचे उद्योग...त्यांना विरोध करू पाहणार्या जैसिंगला एकदा ही चांडाळ चौकडी बेदम मारून बेशुद्ध करते...भिमूचा ज्या मुलीवर जीव जडलेला असतो तिची अब्रू हे चौघं लुटतात...जैसिंग आणि भिमू म्हाईच्या दुसर्या दिवशी या चौघांना गाठतात...हे दोघं आणि ते चौघं, अशी जोरदार मारामारी होते...त्या चौघांना गंभीर जखमी करून जैसिंग आणि भिमू सटकतात...भिमू रात्रीच्या अंधारात एस. टी. स्टॅन्डच्या दिशेन धावत सुटतो...अस्सल ग्रामीण वातावरणातील कादंबरी
-
Tuzi Katha-Maze Shabda (तुझी कथा-माझे शब्द)
शेतातील पिकांचं नुकसान करणार्या गायरांनी गावातल्या तरुणांच्या मेहनतीवर फिरवलेला बोळा...गॅरेजमालक वसंत मेस्त्री, त्याच्याच गॅरेजमध्ये काम करणारे शंकर आणि सद्या, मेस्त्रीची ठेवलेली बाई शारी, शारीचा निष्क्रिय नवरा इ. व्यक्तींचं दिशाहीन जीवन...एका विहिरीवर उलगडणारे काही लोकांच्या जीवनाचे तुकडे...त्याच्या आणि तिच्या प्रेमाची रखरखीत, अनिश्चित वाट...नवर्याला सोडून आलेली, दत्तूबरोबर लग्नाशिवाय राहणारी, दत्तूच्या मृत्यूनंतर कुणाचा तरी हात धरून पळून जाणारी काशी...विजूबरोबर प्रेमबंध निर्माण होऊ पाहत असतानाच कमलबरोबरच्या चोरट्या भेटीगाठींचं स्मरण होऊन स्वत:ला सावरणारा तरुण...पाळण्यातच लग्न लागलेलं असल्याने मनाला भावलेल्या तरुणाला नकार देणारी हौसा...दोनदा प्रेमभंग झालेल्या तरुणाला त्याच्या वाग्दत्त वधूच्या संदर्भात एक निनावी पत्र मिळतं...मानवी मन आणि जीवन यांचं वास्तव, तरल चित्रण करणार्या कथांचा भावस्पर्शी संग्रह
-
Gabru (गब्रू)
‘गब्रू’ हा सात विनोदी कथांचा संग्रह आहे. ‘गब्रू’ कथेत एका ग्रामीण नाटककाराच्या नाटकाच्या लेखन-संपादन-प्रकाशनाचा ‘साद्यंत’ वृत्तान्त खेळकर शैलीत कथन केला आहे...तर ‘टिंबकटू’ कथेत एका लेखकाला शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून बोलावतात आणि त्याचा कसा पोपट होतो याची हकिकत येते...‘लावलं क्याळ, आलं रताळ’ कथेत कॉटच्या पैशाची ‘वसुली’ करायला हिराबाईकडे गेलेल्या बोंगार्डेमामाच्या फजितीचं खुसखुसशीत चित्रण आहे...‘दरोडा’ कथेत रात्री गस्त घालणार्या तरुणांचे ‘उद्योग’ आणि चोरांनी त्यांना लावलेल्या वाटाण्याच्या अक्षता याचं खास शैलीतील वर्णन आहे...‘खेळी’ ही चावरेकर मास्तर आणि अन्य मास्तरांना ‘घोळात घेऊन’ ‘लुंगाडणार्या’ अव्वाची कथा आहे...तर ‘आफ्रिकन चुंबन’मध्ये सुंदर पत्नी नवर्याच्या मनसुब्यावर कसं पाणी फिरवते याची हकिकत आहे...‘क्याट’मध्ये एका फसलेल्या साहित्य संमेलनाचं हास्यचित्रात्मक कथन आहे... इरसाल व्यक्तिरेखा असलेल्या, अस्सल ग्रामीण भाषेतील खळखळून हसायला लावणार्या कथा
-
Rait (रैत)
जैसिंग...इनामदारांकडे गडी म्हणून राबणारा एक तरुण...गावातल्या मास्तरांच्या निपाणीजवळच्या गावात असलेल्या मळ्याचा रैत (मळा सांभाळणारा) म्हणून जातो...जैसिंग तसा थोडा रगेल, थोडा रंगेल, पण माणुसकी जपणारा...कधीतरी स्वत:च्या एकटेपणाची जाणीव होणारा...मळ्यातलं काम करता करता गावाशीही त्याचे स्नेहबंध जुळतात...फुली ही बिनधास्त मुलगी आणि अंजी ही गरीब घरातली मुलगी...दोघींबद्दल त्याच्या मनात आकर्षण आहे... गावच्या पाटलाशी त्याची घसट वाढते...पण पाटलाच्या नादाने बाई-बाटली-जुगार याचा त्याला नाद लागतो...पण वेळीच तो त्यातून सावरतो...फुलीचं लग्न होतं, पण काडीमोड होतो...फुली वेड्यासारखी वागायला लागते...अंजीबद्दल जैसिंगाला ओढ आहेच...पण एका प्रसंगाने जैसिंगाच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडतो...अंजीचं लग्न झालंय...पण दादला तिला नांदवत नाही...मात्र एकदा अंजीच्या दादल्याचं पत्र येतं तिला नांदायला येण्याविषयी...हे ऐकल्यावर जैसिंग हादरतो...ग्रामीण पार्श्वभूमीवर फुललेल्या जैसिंगाच्या भावविश्वाचं मन रमवणारं दर्शन
-
Pimpalpan 8 (पिंपळपान -भाग 8)
Manohar Talhar/ Mahadev More/ Laila Mahajan/ Anuradha Vaidya/ Yashwant Karnik/ Leela Shrivastav/ Manmohanआशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Igin ( ईगीन )
महादेव मोरे यांच्या 'ईगीन' या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखीत करतात. काही गंभीर, तर काही गंमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलित-पददलितांचे, कष्टकर्यांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्ष-खेदाच्या, व्यथा-विवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायव्हींग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणार्या ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणार्या, विचार करायला लावणार्या व काही वेळा त्याच्या गालांवर स्मित हास्याची रेषा फुलविणार्या ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तीचित्रे हेही ह्या कथांचे सामर्थ्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे.