Igin ( ईगीन )
महादेव मोरे यांच्या 'ईगीन' या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखीत करतात. काही गंभीर, तर काही गंमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलित-पददलितांचे, कष्टकर्यांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्ष-खेदाच्या, व्यथा-विवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायव्हींग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणार्या ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणार्या, विचार करायला लावणार्या व काही वेळा त्याच्या गालांवर स्मित हास्याची रेषा फुलविणार्या ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तीचित्रे हेही ह्या कथांचे सामर्थ्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे.