Pravah (प्रवाह)
मधुकर कदम हा नवलेखक तरुण कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडतो आणि त्याचं गाव सोडून मोठ्या भावाकडे राहायला जातो. तिथे एका पेढीवर नोकरी करत असताना त्या पेढीच्या शेटजीच्या मुलीच्या, सविताच्या वासनेच्या जाळ्यात मधुकर सापडतो आणि त्याला स्त्री-देहाची चटक लागते. नंतर सविता आत्महत्या करते आणि मधुकर गावी परततो. काही दिवसांनी मेहता नावाचा माणूस त्याला शब्दकोडे स्पर्धेसंबंधित नोकरी देतो. मेहतांच्या ऑफिसमधील जोशी, मधुकरला वेश्यागमनाची दीक्षा देतो. त्याच ऑफिसमधील सुलोचनाशी मधुकरचा शरीरसंबंध येतो. मेहतांची नोकरी सोडून मधुकर, अक्कोळकरांच्या ‘जनता’ नावाच्या साप्ताहिकात नोकरीला लागतो. तिथे अक्कोळकरांची बायको मधुकरशी लगट करायचा प्रयत्न करते; पण गुप्तरोग झाल्याचं सांगून तो तिला टाळतो. त्यानंतर एका दुर्गम गावात त्याला मास्तरची नोकरी मिळते. तिथे शिरमव्वा नावाची एक बेरड मुलगी मधुकरमध्ये मनाने गुंतते; पण तिच्या पवित्रतेमुळे मधुकर तिच्यापासून दूर राहतो. तो गाव सोडायचं ठरवतो आणि शिरमव्वा त्याला भरल्या डोळ्यांनी-मनानी निरोप देते.