-
Swatantryasoudamini Maharani Tarabai (स्वातंत्र्यस
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केले, हे मोठे युगकार्यच होते. मराठ्यांची स्वतंत्र व सार्वभौम सत्ता निर्माण झाली खरी, पण महाराजांच्या निधनानंतर लगेचच दिल्लीपती औरंगजेब हा मराठा सत्तेचा घास घेण्यासाठी दक्षिणेत लाखो सैन्यानिशी व प्रचंड साधनसामग्रीनिशी चालून आला आणि मग त्यातून सुरू झाले मराठ्यांचे जीवन-मरणाचे युद्ध, ज्याला इतिहासकार 'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध' असे गौरवाने संबोधतात. या स्वातंत्र्ययुद्धात मराठ्यांचे नेतृत्व शिवपुत्र संभाजी छत्रपती, शिवपुत्र राजाराम छत्रपती व शिवस्नुषा महाराणी ताराबाई या तीन राज्यकर्त्यांनी केले. आशिया खंडातीलच नव्हे तर जगातील एका बलाढ्य सत्ताधीशाशी-मोगल सम्राट औरंगजेब बादशहाशी मराठ्यांनी आपल्या या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली २५-२६ वर्षे लढून त्याला हतबल करून टाकले आणि शेवटी महाराष्ट्राच्या या भूमीतच त्याला आपली दफनभूमी शोधावयास लावले. हा हा म्हणता आपण मराठा सत्ता नष्ट करू अशी जी बादशहास घमेंड होती, ती अस्तास जाऊन त्याच्याच हयातीत मराठ्यांचे सैन्य नर्मदेच्या उत्तरेस असणाऱ्या त्याच्या सुभ्यांत धामधूम करताना त्याला पाहावे लागले. मराठ्यांच्या उपरोक्त तीन राज्यकर्त्यांमध्ये महाराणी ताराबाईंच्या कर्तृत्वाचे एक वेगळेपण आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी, ऐन तारुण्यात वैधव्याची कुऱ्हाड कोसळली असताना या तरुण राणीने आपले वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून हिंदवी स्वराज्याची सर्व सूत्रे हाती घेतली. राज्यकारभारच नव्हे तर लष्करी मोहिमांचे संयोजन ती करू लागली. खाफीखान हा औरंगजेबाचा चरित्रकार, पण त्याने मराठ्यांच्या या राणीबद्दल कौतुकाचे उद्गार काढले आहेत. माझ्या या चरित्रग्रंथात महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धाचा शेवटी धावता आढावा घेतला असला तरी या राणीची स्वातंत्र्ययुद्धातील (सन १७०० ते १७०७) कामगिरी मांडणे, हा माझा प्रमुख उद्देश आहे. ताराबाईंना ८६-८७ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले असले तरी त्यांची खरी तेजस्वी कारकीर्द म्हणजे त्यांनी औरंगजेब बादशहाशी दिलेला सात वर्षांचा लष्करी व राजकीय लढा. या लढ्यातील तिच्या कामगिरीमुळेच तिचा ‘स्वातंत्र्यसौदामिनी' म्हणून गौरव केला जातो. अशा या स्वातंत्र्यसौदामिनीचे चरित्र गावागावांतून, घराघरांतून, शाळाशाळांतून वाचले जावे, अशी माझी अंतरीची इच्छा आहे.
-
Rajmata Jijausaheb (राजमाता जिजाऊसाहेब)
जिजाऊसाहेबांच्या अंगी कार्यक्षम व कणखर प्रशासकाचेही गुण होते. शिवरायांच्या बालपणी त्यांनी पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था ठेवली; शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. शत्रूच्या अत्याचारांनी भयभीत व निराश्रित झालेल्या रयतेस त्यांनी मायेने दिलासा दिला आणि शिवरायांचे भावी स्वराज्य कसे असेल याचे वास्तव दर्शन त्यांनी सर्वांना घडवले. शिवराय वयाने व अनुभवाने मोठे झाल्यावरही जिजाऊसाहेब त्यांच्या प्रमुख सल्लागार होत्या. अत्यंत कठीण संकटाच्या प्रसंगी त्यांना आपल्या मातेचाच आधार वाटत असे. आपल्या गैरहजेरीत मातोश्रींच्या हाती स्वराज्याचा कारभार सोपवून ते जात असत. आग्राभेटीच्या वेळी त्यांच्या मागे जिजाऊसाहेबांनी स्वराज्य सुरक्षित राखले. एकही किल्ला अथवा ठाणे शत्रूला घेऊ दिले नाही. उलट शत्रूचाच एक किल्ला त्यांनी स्वराज्यात आणला. अशा या थोर राजमातेचे हे चरित्र शक्य तितक्या सोप्या भाषेत, कागदपत्रांचे अवडंबर न माजवता मी सादर करत आहे. महाराष्ट्रातील आघाडीचे प्रकाशक, मनोविकास प्रकाशनाचे संचालक श्री. अरविंद पाटकर यांनी जिजाऊचरित्राचा माझ्याकडे आग्रह धरल्याने हे एक प्रकारचे पवित्र कार्य माझ्या हातून पार पडले, असे मी मानते. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
-
Rajashri Shahu Chatrapati : Ek Abhayas (राजर्षी श
तसे पाहिले, तर अगदी सर्वसाधारण माणसाच्या व्यक्तिमत्त्वालाही असंख्य पैलू असतात. मग शाहूंसारख्या क्रियाशील राजाच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू होते, यात आश्चर्य नाही. वसुधा पवार यांनी आपल्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकरणांतून या पैलूंचे दर्शन घडविले आहे. अस्पृश्यतानिवारण, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, वसतिगृहांची स्थापना, दुष्काळावर आणि साथीच्या रोगांवर केलेली मात, आरक्षण, मुलींचे शिक्षण, आंतरजातीय विवाहास मान्यता देण्याचा कायदा, फासेपारधी वगैरेंचे पुनर्वसन, जलसंधारण, चहा-कॉफी लागवड इ. प्रकारे सामाजिक जीवनाच्या असंख्य क्षेत्रांमध्ये ‘राजर्षी शाहूंनी’ काळाच्या पुढे पावले टाकली असे दिसते. काळ राजाला घडवतो की राजा काळाला घडवतो, याचे ‘राजा कालस्य कारणम्’ हे प्राचीन काळी देण्यात आलेले उत्तर भारताच्या इतिहासातील ज्या मोजक्या राजांना यथार्थतेने लागू पडते, त्यांमध्ये शाहू महाराजांचे स्थान फार वरचे आहे, यात शंका नाही. वसुधा पवार यांच्या प्रस्तुत पुस्तकातून हे सर्व उत्तम रीतीने व्यक्त झाले आहे.