Swatantryasoudamini Maharani Tarabai (स्वातंत्र्यस

By (author) Vasudha Pawar Publisher Manovikas

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केले, हे मोठे युगकार्यच होते. मराठ्यांची स्वतंत्र व सार्वभौम सत्ता निर्माण झाली खरी, पण महाराजांच्या निधनानंतर लगेचच दिल्लीपती औरंगजेब हा मराठा सत्तेचा घास घेण्यासाठी दक्षिणेत लाखो सैन्यानिशी व प्रचंड साधनसामग्रीनिशी चालून आला आणि मग त्यातून सुरू झाले मराठ्यांचे जीवन-मरणाचे युद्ध, ज्याला इतिहासकार 'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध' असे गौरवाने संबोधतात. या स्वातंत्र्ययुद्धात मराठ्यांचे नेतृत्व शिवपुत्र संभाजी छत्रपती, शिवपुत्र राजाराम छत्रपती व शिवस्नुषा महाराणी ताराबाई या तीन राज्यकर्त्यांनी केले. आशिया खंडातीलच नव्हे तर जगातील एका बलाढ्य सत्ताधीशाशी-मोगल सम्राट औरंगजेब बादशहाशी मराठ्यांनी आपल्या या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली २५-२६ वर्षे लढून त्याला हतबल करून टाकले आणि शेवटी महाराष्ट्राच्या या भूमीतच त्याला आपली दफनभूमी शोधावयास लावले. हा हा म्हणता आपण मराठा सत्ता नष्ट करू अशी जी बादशहास घमेंड होती, ती अस्तास जाऊन त्याच्याच हयातीत मराठ्यांचे सैन्य नर्मदेच्या उत्तरेस असणाऱ्या त्याच्या सुभ्यांत धामधूम करताना त्याला पाहावे लागले. मराठ्यांच्या उपरोक्त तीन राज्यकर्त्यांमध्ये महाराणी ताराबाईंच्या कर्तृत्वाचे एक वेगळेपण आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी, ऐन तारुण्यात वैधव्याची कुऱ्हाड कोसळली असताना या तरुण राणीने आपले वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून हिंदवी स्वराज्याची सर्व सूत्रे हाती घेतली. राज्यकारभारच नव्हे तर लष्करी मोहिमांचे संयोजन ती करू लागली. खाफीखान हा औरंगजेबाचा चरित्रकार, पण त्याने मराठ्यांच्या या राणीबद्दल कौतुकाचे उद्गार काढले आहेत. माझ्या या चरित्रग्रंथात महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धाचा शेवटी धावता आढावा घेतला असला तरी या राणीची स्वातंत्र्ययुद्धातील (सन १७०० ते १७०७) कामगिरी मांडणे, हा माझा प्रमुख उद्देश आहे. ताराबाईंना ८६-८७ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले असले तरी त्यांची खरी तेजस्वी कारकीर्द म्हणजे त्यांनी औरंगजेब बादशहाशी दिलेला सात वर्षांचा लष्करी व राजकीय लढा. या लढ्यातील तिच्या कामगिरीमुळेच तिचा ‘स्वातंत्र्यसौदामिनी' म्हणून गौरव केला जातो. अशा या स्वातंत्र्यसौदामिनीचे चरित्र गावागावांतून, घराघरांतून, शाळाशाळांतून वाचले जावे, अशी माझी अंतरीची इच्छा आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category