-
Junglee Kulguruchi Jangi Katha (जंगली कुलगुरूची जं
कोप्पळ जिल्ह्यातल्या अळवंडी या कुग्रामातील यंकप्पा रामोशी यांचा तेजस्वी हा मुलगा. गदगच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळाल्याने, तिथे चोरून वर्षभर रहाणारा, आठवी पास होईपर्यंत म्हशी राखत फिरणारा, शेण गोळा करत, शेंगा चोरत फिरणारा, हा मुलगा इंदिरा गांधी राष्ट्रीय अदिवासी विश्वविद्यालयाचा कुलगुरू होतो, उत्तम बांधणी करत विद्यापीठ प्रगतीपथावर नेतो आणि विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कीर्ती व सन्मान मिळवून देतो. त्या मुलाची आत्मकथा म्हणजेच हे पुस्तक. डॉ. कट्टीमनी यांचं जीवन म्हणजे शून्यातून सिंहासन निर्माण करणाऱ्याच्या कथेचं रूपक आहे. जातीयवादाची बजबजपुरी आणि मुलभूत सुविधांचा अभाव अशा कात्रीत अडकलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अदिवासी विश्वविद्यापीठाला डॉ.कट्टीमनींच्या रुपाने एक भाग्यविधाता लाभला. पदभार स्वीकारताच त्यांनी विद्यापीठातील रुळलेल्या उदासीन वाटा नाकारत कायापालट सुरू केला. आणि अवघ्या काही काळात आपल्या साध्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यांचा हा विलक्षण प्रवास देशातील शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. हा प्रवास या पुस्तकाच्या पानापानातून वाचकांसमोर उलगडत जातो.
-
Udayast (उद्यास्त)
एकीकडे कामाठीपुऱ्यातलं बदनाम वास्तव, तर दुसरीकडं विठोबाची भक्ती. या दोन्हीचा अनोखा संगम साधत रचलेलं दमदार कथानक म्हणजे, उद्यास्त (अवसान) ही कादंबरी. कामाठीपुऱ्यातल्या वेश्येच्या पोटी जन्मलेल्या सत्याची ही कहाणी. सत्याचं भविष्य उज्वल असावं म्हणून त्याची कामाठीपुऱ्यातून एका आश्रमात रवानगी होते. तिथं त्याच्यात विठुभक्तीचे नवे संस्कार रुजतात. सत्याचं आयुष्य नवी उभारी घेतं. पण त्याचं भागदेय तरीही त्याला सुखासीन आयुष्य बहाल करत नाही. तो नोकरी करत असलेल्या कारखान्याच्या मालकाचा मृत्यू होतो आणि त्याच्या आयुष्यात नवं वादळ येतं. मानवी नात्यातली गुंतागुंत आणि नैतिक-अनैतिकाच्या संकल्पनांमध्ये भरडल्या जाणाऱ्या आयुष्यांची ही आगळीवेगळी कहाणी.
-
Ghachar Ghochar (घाचर घोचर)
हातातोंडाशी गाठ असलेल्या पण एका अनामिक धाग्यात बांधलेल्या एका एकत्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एखादा चमत्कार व्हावा तशी बदलते तेव्हा, अनेक जुनीनवी गृहीतं मागे पडतात. इच्छा आणि नाती बदलतात, एक विवाह मोडतो, आणि विनाशक शेवटाकडे जाणारा तणाव निर्माण होतो, जो थोपवणं अशक्य असतं. मुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय सुरक्षित घरात जाणाऱ्या कुटुंबाच्या माध्यमातून सांपत्तिक प्रगतीकडे डोळे लावून बसलेल्या समाजाचं आतलं चित्र, विख्यात कन्नड लेखक विवेक शानभाग यांच्या बदलांचा ठाव घेणाऱ्या या कादंबरीतून स्पष्ट होतं. या कुटुंबाचं विश्वच घाचरगोचर होऊन जातं. इतरांसाठी हा शब्द निरर्थक असला तरी, या कादंबरीच्या अस्वस्थ, निनावी सूत्रधारासाठी ते दुरुस्त करण्यापलिकडचं काहीतरी होऊन जातं. स्पष्ट, वाचत राहावी अशी शैली, त्यासोबतच नर्मविनोदाची पखरण, आणि माणसांमधला ओलावा असलेली ही घाचरगोचर नावाची गोष्ट. सध्याच्या भारतात श्रीमंत होण्याचा अर्थ आणि त्याचे परिणाम यांचे बदलते संदर्भ उलगडून दाखवते. आधुनिक जगण्याच्या या कहाणीचे पडसाद इतरत्रही जाणवतात.