-
Udayast (उद्यास्त)
एकीकडे कामाठीपुऱ्यातलं बदनाम वास्तव, तर दुसरीकडं विठोबाची भक्ती. या दोन्हीचा अनोखा संगम साधत रचलेलं दमदार कथानक म्हणजे, उद्यास्त (अवसान) ही कादंबरी. कामाठीपुऱ्यातल्या वेश्येच्या पोटी जन्मलेल्या सत्याची ही कहाणी. सत्याचं भविष्य उज्वल असावं म्हणून त्याची कामाठीपुऱ्यातून एका आश्रमात रवानगी होते. तिथं त्याच्यात विठुभक्तीचे नवे संस्कार रुजतात. सत्याचं आयुष्य नवी उभारी घेतं. पण त्याचं भागदेय तरीही त्याला सुखासीन आयुष्य बहाल करत नाही. तो नोकरी करत असलेल्या कारखान्याच्या मालकाचा मृत्यू होतो आणि त्याच्या आयुष्यात नवं वादळ येतं. मानवी नात्यातली गुंतागुंत आणि नैतिक-अनैतिकाच्या संकल्पनांमध्ये भरडल्या जाणाऱ्या आयुष्यांची ही आगळीवेगळी कहाणी.
-
Kasheer (कशीर)
काश्मिरच्या धगधगत्या होमकुंडाला कथात्म साहित्यात गुंफत ही कादंबरी देशातला एक महत्त्वाचा विषय कुशलतेने हाताळते. एके काळी भारतीय संस्कृतीचं समृद्ध स्थळ असलेलं काश्मीर तेजोहीन होऊन आज म्लेछ धर्मापुढे का शरणागत झालं आहे, या तपशिलाचा शोध ही कादंबरी घेते. बशीर अहमद, त्यांचा मुलगा अन्वर, ड्रायव्हर सलीम यांसारखी धर्माच्या सीमा ओलांडून पाहणारी पात्रं, पुरातन वेदान्तात आजच्या समस्येवरचं उत्तर शोधणारे हृदयनाथ पंडित; काश्मीर सोडून जम्मूला आलेल्या बांधवांना लुटणारे हिंदू घरमालक, अशा अमानवी परिस्थितीत दांपत्य-जीवनाची फरफट होत असतानाही दांपत्य-जीवनातलं मूल्य जपणारे संजीव आणि आरती कौर अशा पात्रांच्या माध्यमातून काश्मीर नव्याने समजत जातो.