-
Chakra (चक्र)
मध्यमवर्गीय मराठी साहित्याला एका नव्या अनुभवविश्र्वाची जोड सहज, सफाईदार आणि सामर्थ्यशील शैलीने मिळवून देणारी ही कादंबरी. गलिच्छ झोपडपट्टीत, गटाराच्याकडेशी जीवजंतूंप्रमाणे वळवळणार्या मानवांच्या एका पुंजक्यावर इथे प्रकाशझोत टाकला गेला आहे. इथे जीवनाला कसलाच आधार नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पुर्या होण्यापूर्वीच त्या इथे पिळवटून विकृत होतात आणि सफल, सुंदर जीवनाची स्वप्ने प्रत्यक्षात येण्यापूर्वीच परिस्थितीच्या निष्ठूर, अप्रतिहत चक्रात त्यांचा चक्काचूर होतो. जयवंत दळवी यांची ही पहिलीच कादंबरी असली, तरी मराठी वाचकांना ते अपरिचित नाहीत. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रकाशित साहित्यातील खुसखुशीत अनुभवांच्या चुरचुरती चित्रणाने आणि प्रवाही भाषाशैलीने वाचक प्रभावित झाले. परंतु `चक्र’ कादंबरीमुळे गंभीर जीवनदर्शन आणि भेदक शैली हे त्यांचे विशेष जवळजवळ प्रथमच प्रकाशात येत आहेत.
-
Swa-gat(स्व-गत)
नाना तर्हेच्या लोकांची विविध आयुष्यं कधी एकमेकांत गुंतत, तर कधी सुटीसुटी धावत असतात. त्यांतलंच नशिबी आलेलं एक आयुष्य पकडून धावणार्या आणि वाटेत भेटणार्या इतर आयुष्यांविषयी मनात असंख्य प्रश्न मांडणार्या आणि त्यांची उत्तरं हरवून बसणार्या शिवनाथ हरबा ओटवणे याचं हे स्व-गत.
-
Pradashin( प्रदक्षिणा)
व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेणं हा दळवींच्या एकूण साहित्याचा केंद्रबिंदू. माणसाच्या आयुष्यातील आत्यंतिक दु:खाचा संबंध बहुतेक वेळा दळवींनी स्त्री-पुरुष संबंधांशी जोडलेला आहे. लैंगिकता, वेड आणि वेदनेची विविध रूपं दळवी कादंबर्यांतून न्याहाळतात. दळवींच्या बर्याच कथा-कादंबर्यांतून दिसणारं विजोड संसाराचं चित्र हे त्यांच्या ऐकीव अनुभवांतून उभं राहिलेलं आहे. या संसारचित्रांतील स्त्री-पुरुष संबांधाचा विशेष हा की हे संबंधसुखाचे नाहीत, सुरळीत नाहीत, कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे. मग ते संबंध विवाहपूर्व असोत; विवाहोत्तर असोत किंवा वैधव्यदशा वा विधुरावस्थेतले असोत! दोघांपैकी एकानं पुरतं उद्ध्वस्त व्हावं, दुसर्यानं ते उद्ध्वस्त होणं सुन्न मनाने बघावं, आणि बघताबघता अखेर त्या नजरेतील ओळख हरवून जावं, असेच या अनुभवांचे स्वरूप असतं. ‘प्रदक्षिणा’ या दळवींच्या कादंबरीतूनही मानवी नातेसंबंधातल्या गुंतागुंतीविषयी दळवी आपले निरीक्षण मांडतात. एका नाटककाराच्या आयुष्याविषयी- त्याचा कलंदरपणा आणि शेवटी त्याची झालेली शोकात्मिका याचे प्रभावी चित्रण या कादंबरीतून दळवींनी केले आहे. नाटककार आणि त्यांची पत्नी – त्यांच्यातील ताणतणाव, नाटककाराच्या मुलींच्या आयुष्याची झालेली परवड याचे सुन्न करणारे दर्शन इथे घडते. आणि हे सर्व घडत असताना अवतीभवतीचा समाज, त्यातल्या व्यक्ती, त्यांचे अंतर्गत ताणतणाव यांबद्दलचे दळवींचे भान कधी सुटत नाही, याचा प्रत्यय त्यांच्या ‘प्रदक्षिणा’ या कादंबरीतूनही येतो.