Chakra (चक्र)
मध्यमवर्गीय मराठी साहित्याला एका नव्या अनुभवविश्र्वाची जोड सहज, सफाईदार आणि सामर्थ्यशील शैलीने मिळवून देणारी ही कादंबरी. गलिच्छ झोपडपट्टीत, गटाराच्याकडेशी जीवजंतूंप्रमाणे वळवळणार्या मानवांच्या एका पुंजक्यावर इथे प्रकाशझोत टाकला गेला आहे. इथे जीवनाला कसलाच आधार नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पुर्या होण्यापूर्वीच त्या इथे पिळवटून विकृत होतात आणि सफल, सुंदर जीवनाची स्वप्ने प्रत्यक्षात येण्यापूर्वीच परिस्थितीच्या निष्ठूर, अप्रतिहत चक्रात त्यांचा चक्काचूर होतो. जयवंत दळवी यांची ही पहिलीच कादंबरी असली, तरी मराठी वाचकांना ते अपरिचित नाहीत. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रकाशित साहित्यातील खुसखुशीत अनुभवांच्या चुरचुरती चित्रणाने आणि प्रवाही भाषाशैलीने वाचक प्रभावित झाले. परंतु `चक्र’ कादंबरीमुळे गंभीर जीवनदर्शन आणि भेदक शैली हे त्यांचे विशेष जवळजवळ प्रथमच प्रकाशात येत आहेत.