-
Vithobha Missing In Pandhurpar (विठोबा मिसिंग इन पंढरपूर)
विनायक होगाडे हा आधुनिक जाणिवेतून परंपरेचा नवा अन्वयार्थ लावत आजचा खारवटलेला काळ पकडू पाहणारा तरुण लेखक आहे, याचा प्रत्यय ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ या त्याच्या कादंबरीतून येत राहतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानला जाणारा विठ्ठल एके दिवशी अनपेक्षितपणे गायब होतो आणि सर्वत्र एकच गहजब उडतो, या भन्नाट कल्पनेचं बोट पकडून विनायक होगाडेने या फॅन्टसीसदृश कादंबरीची रचना केली आहे. काळाची सरमिसळ करत एकाच वेळी केलेले ऐतिहासिक आणि आधुनिक काळातील व्यक्तिरेखांचे कल्पक उपयोजन, तसेच ओघवत्या शैलीत सहजपणे येणारा विठ्ठल, पंढरपूर यांसह वारकरी संतांचा इतिहास, त्यांविषयी लोकमानसात रुजलेली मिथके, कहाण्या, ही या कादंबरीचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणता येईल. या अद्भुत कथनाच्या माध्यमातून त्याने मराठी समाज आणि संस्कृतीच्या लाजिरवाण्या भूतकाळाची आणि त्याचबरोबर सडत चाललेल्या वर्तमानाची सालपटं काढून आपल्यासमोर मांडली आहेत. हे जितकं धाडसाचं आहे, तितकंच ते समकालाची चिकित्सा करण्याच्या दृष्टीने आवश्यकही आहे. संत विचारांचा आजच्या काळाने केलेला पराभव, त्यातून जाणवणारे नैतिक मूल्यांचे स्खलन आणि संवेदना जिवंत असलेल्या एखाद्या विठोबाची यामुळे होणारी घुसमट, हे सगळे वाचकाला विलक्षण अस्वस्थ करते. आपल्या लेखकत्वाचे भान असलेल्या आणि संत परंपरेतून गवसलेल्या शब्दांचे व मूल्यांचे सामर्थ्य जाणून असलेल्या या लेखकाची ही कादंबरी मराठी कादंबरीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, हे निश्चित. - प्रवीण दशरथ बांदेकर.
-
Oh My Godse (ओह माय गोडसे)
मोहनदास करमचंद गांधी हा माणूस समजून घ्यायचा असेल,तर तुम्हाला आधी स्वतः 'माणूस' होणं गरजेचं आहे. गांधी समजून घेण्याची प्रक्रिया ही माणूस होण्याच्या प्रक्रियेपेक्षा वेगळी नाही. या प्रक्रियेत तुम्हाला अंतबाह्य उघडं व्हावं लागत. आपल्या जगण्याचा तटस्थपणे विचार करावा लागतो. हे सोपं नसत. म्हणून गांधी सोपा वाटत नाहीं लोकांना, कारण लोकांना माणूस होण्यातही फारसा रस नसतो. त्यांना नथुराम आकर्षक वाटतो. तो सोपा आहे. कारण त्याला कशाचीच जबाबदारी घ्यायची नाही. गांधी अवघड आहे, कारण तो तुमच्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला भाग पाडतो. गांधी हि भारताची खरी ओळख आहे. नथुराम हा भारतावरचा कलंक आहे. गांधी हा विचार आहे, तर नथुराम अविचार आहे. गांधी हि जबाबदारी आहे, तर नथुराम हि बेपर्वाई आहे. गांधी हा माणुसकीचा विश्वस्त आहे, तर नथुराम हा माणुसकीचा खुनी आहे. आपण कोणाची निवड करायची? गांधींची की नथुरामची? नथुराम म्हणेल की, माझी निवड करा; पण गांधी सांगेल की, तुम्ही स्वतःची निवड स्वतःच करा. पण तस करताना सत्याला साक्षी ठेवा. माणुसकीचं भान बाळगा. जो हे करेल. तो मग माणुसकीच्या प्रक्रियेत ओढला जाईल. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.
-
Dear Tukoba (डिअर तुकोबा)
'तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन रुपात विनायक होगाडे यांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज ते आपल्या मनात विचारांचे हिंदोळ-कल्लोळ मातविणारे आहे. चारशेंवर वर्षांआधी तुकोबांनी आपल्यात पेरलेली सांस्कृतिक जनुके आजही आपल्यात वाहती असल्याने तुकोबा समकालीनच आहेत, हे ढळढळीत सत्य होय. म्हणून होगाडे यांनी काळाची काही मोडतोड, खेचाखेच केली आहे असे अजिबातही वाटत नाही. आज ज्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि मानसिक स्थितीत एक समूह म्हणून आपण जगत आहोत, त्या वर्तमानात तुकोबांची अशी आठवण होणे, करणे आवश्यकच आहे, हे होगाडे यांनी फार प्रत्ययकारी प्रकारे केले आहे. आधीच्या कविता आणि अखेरीचे स्फुट यांच्या बळावर ही 'ट्रायल' फार सामर्थ्याने उभी करून होगाडे यांनी फार वेधक आणि महत्वाचे सांस्कृतिक जागरण मांडले आहे. या जागरणाचा एक श्रोता म्हणून मी अंतःकरणापासून त्यांचे अभिनंदन व स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. - रंगनाथ पठारे प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत