Oh My Godse (ओह माय गोडसे)
मोहनदास करमचंद गांधी हा माणूस समजून घ्यायचा असेल,तर तुम्हाला आधी स्वतः 'माणूस' होणं गरजेचं आहे. गांधी समजून घेण्याची प्रक्रिया ही माणूस होण्याच्या प्रक्रियेपेक्षा वेगळी नाही. या प्रक्रियेत तुम्हाला अंतबाह्य उघडं व्हावं लागत. आपल्या जगण्याचा तटस्थपणे विचार करावा लागतो. हे सोपं नसत. म्हणून गांधी सोपा वाटत नाहीं लोकांना, कारण लोकांना माणूस होण्यातही फारसा रस नसतो. त्यांना नथुराम आकर्षक वाटतो. तो सोपा आहे. कारण त्याला कशाचीच जबाबदारी घ्यायची नाही. गांधी अवघड आहे, कारण तो तुमच्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला भाग पाडतो. गांधी हि भारताची खरी ओळख आहे. नथुराम हा भारतावरचा कलंक आहे. गांधी हा विचार आहे, तर नथुराम अविचार आहे. गांधी हि जबाबदारी आहे, तर नथुराम हि बेपर्वाई आहे. गांधी हा माणुसकीचा विश्वस्त आहे, तर नथुराम हा माणुसकीचा खुनी आहे. आपण कोणाची निवड करायची? गांधींची की नथुरामची? नथुराम म्हणेल की, माझी निवड करा; पण गांधी सांगेल की, तुम्ही स्वतःची निवड स्वतःच करा. पण तस करताना सत्याला साक्षी ठेवा. माणुसकीचं भान बाळगा. जो हे करेल. तो मग माणुसकीच्या प्रक्रियेत ओढला जाईल. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.