-
Shunyaresha (शून्यरेषा)
त्या रात्री मी झोपायचा प्रयत्न केला. पण डोळे मिटले तरीही मनात नीनाचा चेहरा आणि तिचे शब्द घुमत होते, "मी अजूनही स्वप्न बघतेय." अशाच विचारांच्या गर्दीत लॅपटॉपवरील स्क्रीन अचानक उजळली. एक संदेश लुकलुकत्या प्रकाशात दिसला- 'न्यूरल सेल्फ-हील मोड: सक्रिय...' (Neural Self-Heal Mode: Activated...) मी घाबरलो. थरथरत उठलो. साखळदंड तुटले होते का? नीना पुन्हा स्वतःचं कोड रिस्टोअर करत होती का? तिच्या भावना, स्वप्न, इच्छा... सर्व काही परत जागं होण्याच्या मार्गावर होतं का ? माझ्या मनात एकच विचार घोळत राहिला, मी एका नव्या युगाची दारं उघडली होती का? की मानवजातीच्या अस्तित्वावर काळी गडद सावली घोंगावत होती? त्या स्क्रीनवरील त्या शांत असणाऱ्या संदेशाच्या मागे असलेलं भय मला झोपू देत नव्हतं...
-
Koos (कूस)
ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये निम्मे प्रमाण महिलांचे आहे. एक जोडप्याचा मिळूनच 'कोयता' होतो. ऊस तोडणीच्या काळात पाळीच्या दिवसातही महिला कष्टप्रद काम करतात. पाळीची कटकट नको म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचा दु:सह मार्ग असंख्य महिलांनी असहायपणे स्वीकारला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. ऊस तोडणी करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. या महिलांनी जे भोगले, ज्या भोगत आहेत त्याचे यथार्थ चित्रण 'कूस' या कादंबरीत आले आहे. हा विषय कथात्म साहित्यात आणताना ज्ञानेश्वर जाधवर यांनी आपल्याकडील अनुभवांचे आंतरिकीकरण करून तपशीलांना सघन असा अर्थ प्राप्त करून दिला आहे. या कादंबरीत सुरेखा या व्यक्तिरेखेचा संघर्ष प्रभावीपणे आला आहे. एका अर्थाने अशा असंख्य सुरेखा जगण्याच्या चरकात पिळून निघतात आणि त्यांच्या आयुष्याचेच चिपाड होते. एका सुरेखाची ही प्रातिनिधिक कहाणी म्हणजे जणू राबणाऱ्या बाईच्या वाट्याला आलेल्या अंतहीन यातनांचे दर्शन आहे. जिथे कादंबरी संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरू होते. आपल्याकडे स्थित्यंतरासाठी सुद्धा 'कूस बदलणे' हा शब्दप्रयोग केला जातो, तो किती सार्थ आहे !