Koos (कूस)
ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये निम्मे प्रमाण महिलांचे आहे. एक जोडप्याचा मिळूनच 'कोयता' होतो. ऊस तोडणीच्या काळात पाळीच्या दिवसातही महिला कष्टप्रद काम करतात. पाळीची कटकट नको म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचा दु:सह मार्ग असंख्य महिलांनी असहायपणे स्वीकारला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. ऊस तोडणी करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. या महिलांनी जे भोगले, ज्या भोगत आहेत त्याचे यथार्थ चित्रण 'कूस' या कादंबरीत आले आहे. हा विषय कथात्म साहित्यात आणताना ज्ञानेश्वर जाधवर यांनी आपल्याकडील अनुभवांचे आंतरिकीकरण करून तपशीलांना सघन असा अर्थ प्राप्त करून दिला आहे. या कादंबरीत सुरेखा या व्यक्तिरेखेचा संघर्ष प्रभावीपणे आला आहे. एका अर्थाने अशा असंख्य सुरेखा जगण्याच्या चरकात पिळून निघतात आणि त्यांच्या आयुष्याचेच चिपाड होते. एका सुरेखाची ही प्रातिनिधिक कहाणी म्हणजे जणू राबणाऱ्या बाईच्या वाट्याला आलेल्या अंतहीन यातनांचे दर्शन आहे. जिथे कादंबरी संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरू होते. आपल्याकडे स्थित्यंतरासाठी सुद्धा 'कूस बदलणे' हा शब्दप्रयोग केला जातो, तो किती सार्थ आहे !