-
Case 'Atachi' Casechi (केस 'ॲटॅची' केसची)
एक धनाढ्य गृहस्थ कालका मेलने प्रवास करत असताना त्याच्या निळ्या अॅटॅची केसची दुसर्या प्रवाशाच्या केसशी अदलाबदल होते. आपली अॅटॅची परत मिळवून देण्याचं काम तो गृहस्थ फेलूदावर सोपवितो. सुरुवातीला अगदीच किरकोळ वाटणार्या या केसचं फेलूदाच्या अत्यंत रोमांचकारी साहसात रूपांतर होतं. फेलूदा, तोपशे आणि जटायू अॅटॅची केसचा शोध घेत घेत सिमल्याला पोहोचतात. तेथे अनपेक्षित वळणे मिळून त्यांचा प्रवास खडतर बनतो. सिमल्याच्या बर्फाळ उतारावर या कथेचा श्वास रोखून ठेवणारा परमोत्कर्ष म्हणजे ताणलेल्या उत्कंठेची परमावधीच. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे चौथे पुस्तक. विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही. या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
-
Ramachya Pavlanvar Paool (रामाच्या पावलांवर पाऊल)
नवासातल्या वास्तव्यादरम्यान राम ज्या ज्या मार्गावरून पुढे गेले त्या सर्व स्थानांचा शोध घेत प्रवास केला तर…? अशी विलक्षण कल्पना लेखकद्वयीला सुचली आणि लागलीच त्यांनी आखणी करायला घेतली. आणि मग सुरू झाला त्यांचा प्रवास… अयोध्या… दंडकारण्य… पंचवटी… किष्किंधा… रामेश्वरम आणि मग श्रीलंका… या प्रवासात त्यांना स्थानिक लोक, पुजारी, महंत भेटले. सर्वांनी रामायणाशी जोडलेल्या अनेक आख्यायिका, कथा आणि कहाण्या ऐकवल्या. त्यातील अनेक कथा या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासपूर्ण तसंच रंजकही झालं आहे. प्रवासात लेखकद्वयीला असं लक्षात आलं की, या कथांच्या विविध आवृत्त्या असल्या, तरी त्यांना बांधून ठेवणारी नैतिकतेची चौकट एकच आहे ! पिढ्यान् पिढ्यांपासून भारतीय जनमानसात रुजलेल्या; लोकजीवन, सांस्कृतिक-सामाजिक अवकाश आणि भक्ती-परंपरा यांच्या संचिताचा अविभाज्य भाग झालेल्या रामकथेसोबत केलेला अनोखा शोधक प्रवासानुभव… रामाच्या पावलांवर पाऊल !
-
Bharat Chin Sambandhanchi Pradirgh Kheli (भारत चीन
चीनच्या धूर्त धोरणीपणामुळे शिष्टाईच्या प्रांतात भारत चीनकडे – विशेषतः १९६२च्या युद्धानंतर संशयाच्या नजरेने पाहत आला आहे. असं असूनही या उभय देशांच्या संबंधांचं सखोल आकलन फार कमी वेळा मांडण्यात आलं. काही घटना-प्रसंगांमुळे तत्कालीन चर्चा-वादविवाद झाले, अजूनही ते होत असतात, पण त्याच्या खोलात फारसं कुणी जात नाही. भारताचे माजी परराष्ट्र सचिव तसंच चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले यांनी या पुस्तकात उभय देशांमध्ये झालेल्या वाटाघाटींचा, त्यामधील बदलांचा वेध घेतला आहे. भारत-चीन यांच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत सहा महत्त्वाच्या वाटाघाटींच्या खेळ्या झाल्या. या प्रदीर्घ वाटाघाटींच्या परिप्रेक्ष्यातून भारत-चीन संबंधांचा चिकित्सक ऊहापोह ते करतात, तसंच सद्यस्थितीकडेही पाहतात. भारताशी शिष्टाईच्या पातळीवर वाटाघाटी करताना चीन कोणते डावपेच आखतो, कोणत्या क्लृप्त्या लढवतो आणि कोणती साधनं वापरतो, याचा शोध गोखले पुस्तकात घेतात. त्याचा फायदा पुढील काळातील वाटाघाटींमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना व्हावा, तसंच नागरिकांमध्ये या विषयाबद्दल जनजागृती व्हावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. सातत्याने बदलणाऱ्या भारत-चीन संबंधांचा विश्लेषणात्मक मागोवा घेणारं पुस्तक… भारत-चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी
-
Mumbai Gangwar (मुंबई गॅंगवॉर)
ही कथा आहे मुंबईची… मुंबईने पाहिलेल्या एका काव्याची. राक्षसी महत्त्वाकांक्षेची, मुंबईवर राज्य केलेल्या भाईलोकांची, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची… त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्याची, खूनबाजीची आणि हे थांबवण्यासाठी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांची, त्यांचा लगाम हाती धरणाऱ्या राजकारण्यांची… ही गोष्ट आहे सोन्या-चांदीच्या स्मगलिंगची, पाकीटमार- ब्लॅकरवाल्यांची, मटका जुगारवाल्यांची, वेश्याव्यवसाय करणाऱ्या पोरींची, दलालांची, धारावीतल्या चुलीवर रटारटा उकळणाऱ्या हातभट्टीची आणि चामड्याच्या गोदामात लपवलेल्या चरस-गांजाची… ही गोष्ट आहे शॉटकट मारून मोठी स्वप्नं पाहणाऱ्या माणसांची… ही गोष्ट आहे भरडल्या गेलेल्या मुंबईतल्या सामान्य कुटुंबांची… “जगण्याचा संघर्ष ‘खल्लास’ करण्यासाठी पाहिजे पैसा… खूप सारा पैसा आणि तो सरळ मिळत नाही, त्यासाठी पावले वाकडी टाकावी लागतात,” अशा समजुतीतून उभा राहतो काळा धंदा आणि हा धंदा कितीही ‘गंदा’ असला तरी तो करण्याची लत एकदा लागली की त्यातून सुटका नाही ! वरवर फिक्शन वाटणारी, पण नकळतपणे तुम्हाला वास्तवाच्या समोर उभी करणारी कादंबरी… मुंबई गँगवॉर!
-
The Red Haired Woman (दि रेड हेअर्ड वुमन)
पौंगडावस्थेत असताना लाल केसांची एक आकर्षक बाई सेमचं लक्ष वेधून घेते. आणि मग तो तिच्या विचाराने पुरता झपाटला जातो…. मनातल्या विचारचक्रात तीच आणि तीच! सेमचे वडील तत्पूर्वी गुढरित्या परागंदा झालेले असतात. शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी सेम इस्तंबूलजवळ विहीर खणणाऱ्या मास्टर महमूत यांच्या हाताखाली काम करत असतो. सेमच्याच एका चुकीमुळे झालेल्या अपघातात महमूत दगावतो का…? आता कथानक वेगळंच वळण घेतं…. कादंबरीचं कथानक जसजसं पुढे सरकतं, तसतसे नात्यातले गुंते गहन होत जातात. राजा इडिपसची ग्रीक पुराणकथा आणि रुस्तम व सोहराबर पर्शियन पुराणकथा यांची समांतर पातळीवर या गुंत्याशी लेखक सांगड घालत राहतो. त्यामुळे या कादंबरीला वेगळे आयाम प्राप्त होतात….. वाचकांची उत्कंठा पानागणिक वाढत जाते. पुराणकथांची सांगड घालण्याचं प्रयोजन त्यांचं कुतूहल वाढवत जातं….. कोण होती ती लाल केसांची बाई? महमूतविषयीचं वास्तव काय होतं ? ग्रीक पुराणकथा पेरण्याचं प्रयोजन कोणतं? नोबल राजकारणविजेते लेखक ओरहान पामुक यांची बेस्टसेलर कादंबरी…
-
Maza Brand Aazadi (माझा ब्रँड आज़ादी)
परंपरांची ओझी वाहणाऱ्या हरयाणा प्रदेशातली एक मुलगी…अनुराधा. एका क्षणी तिचं मन ‘आज़ादी’ मिळवण्याचा अनुभव घेण्यासाठी बंड करून उठतं आणि ती स्वतःतला एकांत सोबत घेऊन बाहेरच्या जगात प्रवासासाठी निघते… हा प्रवास ती करते, ते ज्ञानप्राप्तीसाठी नव्हे की डोक्यात माहितीची खोगीरभरती करण्यासाठी! तिच्या भ्रमंतीमागे कोणताही विशिष्ट उद्देश नाही. बस, आपल्या आतल्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाता जाता मिळतात का, यासाठीचा हा शोध होऊन जातो. या प्रवासादरम्यान आपल्या आत दडलेल्या अनेक ‘स्थळांना’ ती भेट देत जाते. आपली संस्कृती, समाज आणि आध्यात्मिकता याबाबत स्वतःला प्रश्न विचारत राहते. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे “कोणतीही भारतीय मुलगी ‘चांगली शहाणी मुलगी’ ही साचेबंद चौकट तोडू शकेल का?” प्रश्नांच्या शृंखलेची उत्तरं शोधत आयुष्याचे आनंदी पैलू अनुभवत ती प्रवास करते…. ‘व्यक्तिगत स्पेस’ची अनुभूती घेते, जी या देशात तिने कधी अनुभवली नसते. बाहेरच्या देशांत हे फिरून हे अनुभव उत्सवासारखे ती साजरे करते. तेच हे अनुभव…. तुम्हालाही आपल्या सभोवतालच्या ‘हिपोक्रसी ला सामोरं जाण्यासाठी हे अनुभव बळ देतील आणि मग तुम्हीही म्हणाल…माझा ब्रँड… आज़ादी !
-
Mansamazavan (मनसमझावन)
या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात. एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. ती वाचताना उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसतो आहोत, याचं भान वाचकाला येतं.. ‘हिंदू’, ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक, सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’ चा शोध ही कादंबरी घेते. हिंदू-मुस्लिम सहजीवनाची कल्पना मूळच्या सोशिक, उदार, सहिष्णु अशा पारंपरिक लोकधर्माला अनुसरल्याने प्रत्यक्षात येईल की त्यासाठी आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, असा कळीचा प्रश्न लेखकाने या कादंबरीत उपस्थित केला आहे.
-
Socretis Kadhi Marat Nasato (सॉक्रेटिस कधी मरत नसत
हिंदी साहित्यविश्वातील आणि विशेषतः काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे नाव म्हणून माधव कौशिक यांच्याकडे पाहिलं जातं. गझल, भावकविता, खंडकाव्य इत्यादी काव्यप्रकारांत त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे मानले जाते. जवळ जवळ पंचवीस कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. पौराणिक कथानकांतून समकालीन वास्तवाचे आणि भावभावनांचे चित्रण करण्याचे त्यांचे कसब निश्चितच अव्वल असे आहे. कविता या वाङ्मयप्रकारासोबतच त्यांच्या गद्यलेखनाचा आणि बालसाहित्याचाही विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. कथाकार म्हणून त्यांनी मोजके लेखन केले असले तरी त्यांच्या कथा या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या आहेत. त्या लघुकथा या प्रकारात मोडणाऱ्या कथा आहेत. जगण्यातील सामान्य घटना, सामान्य माणसांच्या जीवनातील अनवट प्रसंगातून, घटनांतून उभे राहणारे पेचप्रसंग आणि त्यातून जीवन समजून घेण्याचा माधव कौशिकांचा प्रयत्न अधिक आश्वासक आणि अर्थपूर्ण वाटतो. मराठीतील प्रथितयश कथाकार, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी या कथांचा केलेला मराठी भावानुवाद भाषिक अडसरांना बाजूला सारत मानवी जीवनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालेला आहे. मराठी वाचकांना वेगळी अनुभूती देणारा कथासंग्रह….
-
Barik Barik Awaj Vadhat Chalalet (बारीक बारीक आवाज
बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथासंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात. कुठे काका-पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वतःच्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबुतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणाऱ्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्र सासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वतःशीच नातं जोडणारी ‘मी’. नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली असणार नाहीत, हे समजून घेते तर एखादी रश्मी काही नाती निर्घृणपणे तोडावी लागतात, याचं भान ठेवून ईश्वरबरोबरच आपलं नातं मर्यादित अंतरावर राखण्याची शहाणीव दाखवते. एकीकडे युनियनद्वारे संपूर्ण भारतातल्या रेडिओ स्टेशन्सवर काम करणाऱ्या स्टाफशी नातं जोडू पाहणारी राधिका तर दुसरीकडे रेडिओतल्या आपल्या सहकाऱ्याबरोबर निर्माण झालेलं अबोल, अस्फुट नातं मनातच ठेवत त्याच्यापासून दूर होणारी इशा …. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उमलणाऱ्या आणि मिटणाऱ्या…. अशा या तरल नात्यांच्या कथा वाचकांच्या मनात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या स्मृती जाग्या करतील. सुबोध जावडेकर