-
Ashish Karve Hatya Prakaran (आशिष कर्वे हत्या प्रकरण)
आशिष कर्वे यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये मुसाइड नोटसह मापडतो, तेव्हा पीएसआय मोटकर यांना ती केस आत्महत्येची आहे असंच वाटतं. परंतु नेहमीप्रमाणेच त्यांच्या साहेबांची सीनिअर इन्स्पेक्टर सारळकरांची कल्पनाशक्ती वेगळेच तर्कवितर्क लढवू लागते. जसजसा ते तपास करू लागतात, तसतसे वेगवेगळे तपशील, तथ्यं समोर येऊ लागतात. आशिष यांचा व्यावसायिक भागीदार आणि त्यांचे संबंध ताणलेले असतात, तर बायको, मित्र, मेव्हणा यांना आशिष नकोसे झालेले असतात आणि सख्ख्या भावाशी त्यांचे मालमत्तेवरून हाणामारी करण्यापर्यंत टोकाचे वाद झालेले असतात… पोस्टमॉर्टम अहवालानुसार आत्महत्या नसून तो खून आहे हे सत्य उघड होताच, सारळकरांची विचारशक्ती आणखी वेगाने दौडू लागते. ते तप करून एकेक धागा सोडवू लागतात, तेव्हाच आणखी एक खून होतो ! आणि त्यापाठोपाठ बाहेर येतात अनेक काळी, गडदगहिरी सत्यं… सत्य, अर्धसत्य आणि असत्य यांच्या गुंत्यातून मानवी व्यवहारांच्या अंधाऱ्या बाजू उलगडणारी, उत्कंठावर्धक मर्डर मिस्टरी… आशिष कर्वे हत्या प्रकरण !
-
Vachun Uranari Pustaka (वाचून उरणारी पुस्तक)
वाचून उरणारी पुस्तक लेखक : नीतिन वैद्य खिशा-पाकिटातल्या हिरव्या, निळ्या, गुलाबी कागदांपेक्षा काळी अक्षरे. उमटलेल्या पुस्तकाच्या पांढऱ्या कागदावर जास्त प्रेम करणाऱ्या भाग्यवान माणसांच्या जमातीतला एखादा मान्यवर सरदार म्हणून शोभावा अशा नितीन वैद्य यांनी आयुष्यभर पुस्तकांवर अपार प्रेम केलं आणि या ग्रंथ-मैत्राचा अपार अभिमान बाळगला. या अद्भुत मैत्राच्या रानवाटेवर उमललेली सुंदर रानफुले वाटावी अशी सुरेख टिपणे आणि लेख त्यांनी वेळोवेळी लिहून ठेवले. अशा अपार पुस्तकमैत्राने दरवळणारे मोजके लेख म्हणजे ‘वाचून उरणारी पुस्तकं’. ‘पुस्तक संपतं, पण तिथून ते वाचकांच्या मनात सुरू होतं’ यासारखे विचक्षण भाष्य नीतिन नोंदवतात. त्यांचे वाचन भाषांच्या सीमा किती सहज ओलांडतं, याचं अतिशय विदग्ध दर्शन हिमालयविषयक पुस्तकांवरच्या लेखात घडतं. हिमालय या एकाच विषयावरच्या अनेक हिन्दी पुस्तकांची अतिशय रंजक आणि समृद्ध करणारी ओळख या लेखात करून दिली आहे. हिन्दी पुस्तकांबाबत अजून सांगायचं तर उदयन वाजपेयी यांच्या मुलाखतवजा संवाद ग्रंथांच्या परिचयातून इतक्या ज्ञानी, चिंतनशील, प्रतिभावंत माणसांचे अद्भुत सुंदर दर्शन नीतिन करून देतात की, ती सर्व पुस्तकं वाचल्याबद्दल आपल्याला त्यांचा हेवा तर वाटायला लागतोच, पण आपण स्वतः ती पुस्तकं कधी एकदा वाचतो असं होतं. ही भावना हेच वैद्य यांच्या या पुस्तकाचं सर्वात मोठं यश आहे. नीतिन वैद्य यांचं हे दीर्घकाळ पुरणारं, आपल्याला विविध विषयांवरच्या पुस्तकांपर्यंत पोचवणारं आणि वाचून मनात उरणारं मौलिक पुस्तक आहे. संजय भास्कर जोशी
-
Aakashzep Tarihi Paay Jaminivar (आकाश झेप तरीही पाय जमिनीवर)
आकाश झेप… तरीही पाय जमिनीवर लेखिका : उषा पुरोहित एअरफोर्स ऑफिसरसोबतच्या माझ्या ६४ वर्षांच्या अर्थपूर्ण सहजीवनाची गोष्ट पुरोहित दाम्पत्याशी माझी पहिली भेट झाली तेव्हा उषाताई पाककलानिपुण आणि पाककलेवर लेखन करणाऱ्या गृहिणी होत्या तर, उत्तमराव हे एअर व्हाइस मार्शल अर्थात भारतीय हवाईदलाचे उच्चाधिकारी (निवृत्त) होते. हरहुन्नरी उषाताईंना मी भेटत होतो ते त्यांच्या नव्या पाककृती पुस्तकांसाठी. पण उत्तमरावांच्या उमद्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याशी पहिल्या भेटीतच स्नेह जुळला, तो अगदी अखेरपर्यंत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका बाजूला ‘एअरफोर्स ऑफीसर’चा करारीपणा होता तर, दुसऱ्या बाजूला अविश्वसनीय असा अंगभूत साधेपणा होता. एका एअर व्हाइस ‘मार्शल’ने घरचं ‘मार्शल’ पद पत्नी उषा हिला दिल्याचं पदोपदी जाणवत होतं. लष्करातील उच्चाधिकाऱ्यांचं आयुष्य सुख-सोयींनी संपृक्त असतं, असा एक सर्वसाधारण समज असतो. परंतु त्यांच्या कुंटुंबाला प्रत्यक्षात अनेक ताण-तणाव पेलावे लागतात, आव्हानात्मक प्रसंगाना सामोरं जावं लागतं… त्याचीच झलक या रोचक अशा अनुभवकथनात दिसते. सोबत त्यांच्या अर्थपूर्ण, समृद्ध सहजीवनाचे अनेक कंगोरेही दिसून येतात… आणि तेही खुद्द उषाताईंच्या शब्दांत !
-
Sadetin Khoon (साडेतीन खून)
एक बाई पलंगावर मरून पडलेली… आणि त्याच खोलीत एक पुरुष सीलिंग फॅनला लटकलेला. टेबलावर सुसाइड नोट… कर्जात बुडालेल्या एका पुरुषाने प्रतारणा करणाऱ्या बायकोला मारून टाकत स्वतःलाही संपवलेलं आहे, असं हे प्रकरण वरवर जरी दिसत असलं, तरी तपासातून समोर येणारे धागेदोरे वेगळ्याच बाबींकडे दिशादर्शन करतात. मग सीनिअर इन्स्पेक्टर सारळकर आणि पीएसआय मोटकर या धाग्यांचा कसून माग काढतात. त्यातून उघड होतात निराळ्याच गुंतागुंतीच्या गोष्टी… बंगळुरूतली सात वर्ष जुनी खुनाची केस, लुबाडणुकीचे जमिनीचे व्यवहार, फसवणुकीची कृत्यं, कडवट शत्रुत्व, मृत बाईचं पूर्वजन्म जाणून घेण्याचं वेड आणि रामदेव नामक गूढ बाबाचं गौडबंगाल… अचानक खुनी समोर येतो… आणखी एक जीव घेण्यासाठी… सारळकर आणि मोटकर यांना चौथा खून करण्याआधी त्याला पकडता येईल का? अनपेक्षित वळणं घेणारी, मानवी मनाचे अंधारे कोपरे उजागर करणारी… खिळवून ठेवणारी मर्डर मिस्टरी… साडेतीन खून !
-
Ashwatthama Shapit Yoddhyachi Runamukti (अश्वत्थामा शापित योद्धयाची ऋणमुक्ती)
अश्वत्थामा लेखक : गुंजन पोरवाल अनुवाद : विजय तरवडे अश्वत्थामा : शापित योद्धयाची ऋणमुक्ती महाभारताच्या महासंग्रामानंतर १०० वर्ष लोटली आहेत… आणि पूर्वी नामशेष झालेल्या एका प्राचीन शक्तीकडून असुरांचे भयावह युग स्थापन होतं व त्यामुळे मानवाच्या नव्या संस्कृतीला धोका निर्माण होतो. या शक्तीपुढे एकच अडथळा आहे, तो म्हणजे गुरुदेव द्रोणाचार्याचा पुत्र, महान योद्धा अश्वत्थामा. मात्र श्रीकृष्णाच्या शापामुळे अश्वत्थाम्याने आपल्या सर्व दिव्य शक्ती गमावल्या आहेत. आणि अशा अवस्थेत तो प्रभू रामाचे कोदंड शोधण्याच्या मोहिमेत नकळतपणे ओढला जातो. भूतकाळातील आठवणींची पिशाचे त्याला छळत आहेत. मित्र आणि शत्रू यांतली सीमारेषा धूसर झालेली भासत असते. काही झालं तरी त्याला विजयी होणं क्रमप्राप्त असतं… आणि त्यासाठी अंतरात्म्यातील सैतानावर मात करणं भाग असतं. त्यासाठी तो दीर्घ प्रवासाला निघतो. गंगेच्या खोऱ्यापासून हिमावंताची बर्फाच्छादित शिखरं अशी प्रचंड भ्रमंती करतो… इथले अपयश मृत्यूपेक्षा भीषण आहे. आणि अश्वत्थामा तर मृत्यूच्या वरदानापासून वंचित आहे. ही सारी लीला भगवान श्रीकृष्णाचीच आहे का? अश्वत्थामा आपला गमावलेला लौकिक पुनश्च प्राप्त करू शकेल का? अशी कुतूहलं निर्माण करून ते शमवणारी कादंबरी… अश्वत्थामा: शापित योद्ध्याची ऋणमुक्ती !
-
Anvat Aksharvata (अनवट अक्षरवाटा)
अनवट अक्षरवाटा लेखक : मीना वैशंपायन स्त्री ही खालच्या पायरीवर असलेलीच बरी’ असा एक अघोरी कट जगातल्या तमाम नक्षरवाटा पुरुषमंडळीनी हजारो वर्ष नेटानं चालवला. विसाव्या शतकात स्त्री शिकली नि तिनं तो छान उधळून लावला. हे ‘अनवट अक्षरवाटा’चं मुख्य सूत्र आहे. खरं तर युद्ध, रोगराई, स्थलांतर, नैसर्गिक आपत्ती अशा नानाविध संकटांत भरडून निघाली ती स्त्रीच. आणि तिच्यामुळेच भाषा जगल्या नि भरभराटीस आल्या. मायबोली हे मानवी संस्कृतीतलं एक सुंदर, जिव्हाळ प्रकरण आहे. पुस्तकात मीनाताईंनी एकूण तीस बंडखोर लेखिकांची आणि त्यांच्या पुस्तकांची चर्चा केली आहे. जगभरातल्या या निवडक लेखिकांच्या प्रतिभा आणि प्रेरणांचा धांडोळा घेताना भिन्न भिन्न भाषा नि संस्कृती आणि रुचिवैचित्र्य या भेदांपलीकडे जाऊन मीनाताईंनी स्त्रीशक्तीच्या प्रवासाचं सुंदर आख्यान मांडलंय, मोजक्या शब्दांत आणि रसाळ शैलीत. मीनाताईंच्या लिखाणावर दुर्गाबाईंची (भागवत) स्निग्ध सावली रेंगाळते आहे. पुस्तकात मराठी साहित्य किंवा समाजाचे संदर्भठिकठिकाणी येतात. त्यामुळेही हे ‘अनवट अक्षरवाटा’ ‘आपलं’ वाटू लागतं. -अंबरीश मिश्र
-
Raktaranjit Chandra (रक्तरंजित चंद्र)
रक्तरंजित चंद्र लेखक : सोहम पी. शहा अनुवाद : अमिता नायडू रक्तरंजित स्टेशन चंद्र सुट्टीमध्ये पर्यटकांनी फुलून येणारं माथेरान हे हिल काही काळ एका वेगळ्याच कारणासाठी फेमस होऊ लागतं. तिथल्या स्थानिक लोकांना, घोडेवाल्यांना तिथे झपाटलेले घोडे, पछाडलेल्या वाटा यांचा अनुभव येऊ लागतो. त्याचबरोबर अचानक दिसणारी आणि अदृश्य होणारी स्त्रीची आकृती दिसू लागते… .. आणि मग सुरू होते मृत्यूची मालिका ! मुंबईचा एक तरुण व्यावसायिक आदित्य मल्होत्रा आपली पत्नी, छोटा मुलगा आणि दोन भाच्या यांच्यासह माथेरानला जातो. आदित्यने नुकतीच ‘सेसिल लॉज’ ही एक मोठी प्रॉपर्टी किरकोळ रकमेत विकत घेतलेली असते. कधीकाळी लोकप्रिय असलेल्या या लॉजमध्ये आता काही वर्षांपासून एका आत्म्याने आपलं बस्तान बसवलेलं असतं… …आणि तो आता या मल्होत्रा कुटुंबाला विळख्यात घेतो. आदित्य आणि कियारामधला रोमान्स… निरागस सीडला भुरळ घालणारे पिशाच… या भुलभुलैयातून मल्होत्रांना वाचवू पाहणारे सुरेश आणि मधू… माथेरानमधल्या भुताळीवर रील्स बनवून लाइक्स वाढवायला आलेली झोया आणि तिची दोस्त मंडळी… भूतकाळातल्या प्रेमाची, विरहाची हादरवून टाकणारी सूडकथा… रक्तरंजित चंद्र !
-
Only One Clue (ओन्ली वन क्लू)
सिद्धहस्त अनुभवी पोलीस अधिकारी राजेंद्र मुरलीधर भामरे, यांनी धडाडीने आणि कल्पकतेने केलेल्या तपासाच्या सत्यकथा म्हणजे हे पुस्तक. ते लिहितात, ‘अपराध्याला शोधून काढणं हे जसं तपास अधिकाऱ्याचं काम असतं, तसंच निरपराध्याचं रक्षण करणं हेही त्याचंच काम असतं’ यावरून त्यांचा पोलीस तपासाकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टिकोन दिसून येतो. विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासाच्या ३३ सत्यकथा तपशिलात सांगता सांगता, भामरे गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारी जगतात चोरी, दरोडे ते सायबर गुन्हे असे लक्षणीय बदल कसे होत गेले याचा परामर्श या पुस्तकातून घेतात. तसंच खबरे, इलेक्ट्रॉनिक फूटप्रिंट्स, व्हिसेरा यांसारख्या गोष्टी पोलीस तपासात किती महत्त्वाच्या असतात हे ते विशद करतात. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांनी ‘सायबर साक्षर’ होणं का महत्त्वाचं आहे, हेही ते स्पष्ट करून सांगतात. परिस्थितीचा नेमका अभ्यास, लोकसंपर्क, विश्वास-संपादन, कल्पनाशक्ती, बहुश्रुतता यांच्या साहाय्याने पोलीस अधिकारी तपासाच्या निष्कर्षापर्यंत कसे पोचतात हे पुस्तकातून लक्षात येतं. पोलिसी पंचनाम्यातला कोरडेपणा किंवा रहस्यकथांमधली अतिरंजितता टाळून सांगितलेल्या वास्तववादी सत्यकथा… ओन्ली वन क्लू !
-
Spy Stories-Mi Pakistanatil Bhartacha Her (स्पाय स्टोरीज-मी पाकिस्तानातील भारताचा हेर)
मी पाकिस्तानातील भारताचा हेर | स्पाय स्टोरीज | सत्य घटनांवर आधारित गुप्तचर कथा लेखक : मोहनलाल भास्कर अनुवाद : ऋजुता कर्णिक गुप्ते मोहनलाल भास्कर हे भारतीय हेर… त्यांची ही जीवनकहाणी. ‘हेरगिरी’ या विषयावर विशेष प्रकाश टाकते. या पुस्तकात १९६५च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांचा पाकिस्तानात झालेला प्रवेश, तिथे त्यांचं पकडलं जाणं आणि पर्यायाने त्यांनी भोगलेल्या दीर्घकालीन तुरुंगयातनांचं चित्रण त्यांनी केलं आहे. परंतु ही साहित्यकृती केवळ साहस व दुर्दम्य निग्रह यांचं वर्णन करत नसून ती पाकिस्तानच्या तत्कालीन परिस्थितीचंही विश्लेषण करते. पुस्तकात मोहनलाल पाकिस्तानातलं भुट्टोप्रणित तथाकथित लोकशाही सरकार, निरंतर मजबूत होत जाणारे हुकूमशहा यावर भाष्य करतात, तसेच धार्मिक कट्टरतावाद आणि त्याला विसंगत असणारे सामाजिक-आर्थिक पैलू उलगडून दाखवतात. भारतविरोधी षड्यंत्र रचणाऱ्या पाकिस्तानातल्या विविध आंतरराष्ट्रीय सूत्रांबद्दलही ते इथे विवेचन करतात. मोहनलाल एकीकडे पाकिस्तानी तुरुंगांची नरकप्राय स्थिती, तुरुंग अधिकाऱ्यांचं अमानुष वर्तन यांचं वर्णन करतात तर, दुसरीकडे ते पाकिस्तानी जनता आणि मेजर सिपरा यांच्यासारख्या व्यक्तींची माणुसकीची वागणूक रेखांकित करायलाही विसरत नाहीत. हेरगिरीचं अंतरंग दाखवणारं विश्वासार्ह पुस्तक…
-
Elonvarcha Sangharsh (इलोनवरचा संघर्ष)
सीनीचा मृत्यू झाला आणि सगळं काही बदलून गेलं. कित्येक वर्ष टिकून राहिलेल्या शांततेचा भंग झाला! काही शेकडो वर्ष इलोन या ग्रहावर स्त्री आणि पुरुष आपापल्या सीमारेषा आखून वेगवेगळे राहत होते. पृथ्वीवरचे एकेकाळचे एकमेकांचे साथीदार आता परस्परांचे विरोधक झाले होते. त्यांनी आपापल्या भागात शहरं वसवली होती, अमरत्व प्राप्त केलं होतं आणि मीलनाशिवाय संतती निर्मिती करायचं तंत्रज्ञानही अवगत केलं होतं स्वतंत्रपणे ! पण सीनीच्या मृत्यूनंतर, स्त्री आणि पुरुष पुन्हा युद्धाची – निर्णायक संघर्षाची भाषा बोलू लागले. इतकी वर्षं त्यांच्यात जी शांतता प्रस्थापित झाल्यासारखी वाटत होती, ती खोटी, आभासी तर नव्हती, की तो एक दीर्घ विराम होता? हा संघर्ष किती काळ चालणार होता? या संघर्षाचे परिणाम महाभयानक होते. दोन्ही बाजू संघर्षाच्या टोकावर पोचल्या होत्या. पण प्रत्यक्ष संघर्ष झाला का? विनाश टळला का? फँटसीच्या साहाय्याने विचारही करता येणार नाही अशी सामाजिक रचना उभारून स्त्री-पुरुष संबंधांवर, त्यांच्या सहजीवनावर भाष्य करणारी ‘कल्पित’ कादंबरी इलोनवरचा संघर्ष !
-
Spy Stories-The Silk Route Spy (स्पाय स्टोरीज-द सिल्क रूट स्पाय)
एका भारतीय डबल एजंट ची सत्य कथा लेखक : एनाक्षी सेनगुप्ता अनुवाद : प्रणव सखदेव १९२० सालचा भारत… ब्रिटिश राजवटीविरोधात स्वातंत्र्य चळवळीचं वारं देशभरात जोरात वाहत होतं. त्यामुळे चिंताग्रस्त ब्रिटिशांनी स्थानिक तरुणांना हेर म्हणून कामावर ठेवण्यास सुरुवात केली. त्यांच्यात होता नंदलाल कपूर. हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्यावर तो वेगवेगळ्या मोहिमांकरता देशभर फिरला. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारक गटांशी त्याची भेट झाली. त्यांच्याशी बोलल्यावर, चर्चा केल्यावर त्याने ठरवलं की, आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपणही थोडा हातभार लावावा. आणि तो ‘डबल एजंट’ झाला! मग कलकत्त्यातल्या गल्लीबोळांपासून शांघायमधल्या भयंकर क्रूर ‘ग्रीन गँग’पर्यंत, बर्मातल्या सोनेरी पॅगोडांपासून जपानमधल्या टी-हाऊसपर्यंत, नंदलालच्या जीवन-प्रवासाने अनेक धोकादायक आणि अनिश्चित अशी वळणं घेतली.. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या अनेक नायकांच्या कथा सांगितल्या जातात, पण काही नायक असेही असतात जे दुर्लक्षित राहतात, त्यांचा त्याग विस्मृतीत जातो. अशाच एका नायकाच्या आयुष्याची ही सत्यकथा… द सिल्क रूट स्पाय !
-
Sanvidhan Bhan (संविधान भान)
संविधानकर्त्यांचे शपथपत्र होते मानवी मूल्यांसाठी. नेहरूंनी सांगितलेल्या नियतीच्या काव्यात्म करारासाठी. गांधींच्या 'वैष्णव जन तो तेणे कहिए' म्हणणाऱ्या भारतासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या समताधिष्ठित समाजासाठी. ताठ मानेने जगता येईल, अशा टागोरांच्या भीतिशून्य समाजासाठी. साने गुरुजींच्या प्रेमाचा धर्म सांगणाऱ्या बलशाली भारतासाठी. दाक्षायणी वेलायुधनच्या गावकुसाबाहेरच्या आभाळासाठी. जयपालसिंग मुंडांच्या आदिवासी पाड्यातल्या 'उलगुलान' साठी. मौलाना आझादांच्या 'गंगा जमनी तहजीब' सांगत शिक्षणाची कास धरणाऱ्या इंद्रधनुषी भारतासाठी. सावित्रीबाईंच्या शाळेचा रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी. बुद्धाच्या पिंपळासाठी. माणसातला ईश्वर जागवणाऱ्या गुरू नानकांसाठी. खुल्या दिलाने माफ करणाऱ्या येशूसाठी. बाजाराच्या मधोमध उभं राहून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या कबीरासाठी संत रवीदासांच्या बेगमपुऱ्यासाठी. तुकोबाची गाथा तारणाऱ्या इंद्रायणीसाठी आणि चेतना चिंतामणीच्या गावाचा रस्ता सांगणाऱ्या झानोबासाठी या शपथपत्राला जागण्यासाठीचा हा जेंटल रिमांइडर !
-
Mandir Vyavasthapan (मंदिर व्यवस्थापन)
भक्तजनांना उत्तम सेवा देण्यासाठी शास्त्रीय व व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन लेखक : सुरेश हावरे भारताला अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. भारतभरात विखुरलेली ३० लाखांहून अधिक मंदिरं या विविधतेची साक्ष देतात, ‘भाविकांची सेवा’ या पारंपरिक मानसिकतेला व्यवस्थापन कौशल्यातील आधुनिक विज्ञानवादी भूमिकेची जोड देऊन जर मंदिरांकडे बघता आलं, तर भारतामध्ये सामाजिक-आर्थिकदृष्ट्या सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. प्रस्तुत पुस्तक हे, मंदीर व्यवस्थापन यासारख्या अभिनव विषयावरील प्रयत्नांवर प्रकाश टाकण्याचा एक सक्रीय प्रयत्न आहे. डॉ. सुरेश हावरे हे एक वरिष्ठ अणुशास्वज्ञ आणि यशस्वी उद्योजक तर आहेतच परंतु यासोबतच त्यांनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिष्ठित असे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाचे अध्यक्षपदही भूषवलेलं आहे. या पुस्तकात मंदिराच्या निमित्ताने रोजगार निर्मिती, सामाजिक-आर्थिक बदल, आध्यात्मिक संस्कृती, स्मारकांचं संवर्धन, गर्दीचं व्यवस्थापन इ. पासून अत्याधुनिक ‘एआय’च्या वापरापर्यंत अनेक विषयांवर समग्र आणि सखोल विचार मांडलेले आहेत. विविध विषयांतील तज्ज्ञ व्यावसायिक आणि शिक्षणसंस्था यांनी जर मंदिर व्यवस्थापनाचे विशिष्ट असे कोर्सेस आखून अमलात आणले तर मंदिरांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी, सुयोग्य मनुष्यबळ निर्माण होईल. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि वेलिंगकर व्यवस्थापन संशोधन संस्थेने हे कोर्सेस सुरुही केले आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांतील सर्जनशील जनांना, या एका वेगळ्या, नाविन्यपूर्ण विषयात रस निर्माण होईल ही अपेक्षा आहे. अभिनव मंदिर व्यवस्थापनासाठी एक मार्गदर्शक पुस्तक… मंदिर व्यवस्थापन !
-
French Maniac (फ्रेंच मेनिअक)
फ्रेंच मेनिॲक लेखक : पंकज भोसले स्थळकाळाचं भान येण्यासाठी महापुरुषांच्या कथा उपयोगी नाहीत. नगण्य जीवांच्या जगण्यातून, क्षुल्लक जिंकण्यातून, फालतू पराभवांतून समाज नावाची गोणपाटसदृश वस्तू विणली जाते. मुंबई महानगराच्या वेशीवर डोंबिवली-बदलापूरसारखी उपनगरं असतात. त्यात तितकेच सामान्य लोक राहतात. महानगराला हलवून टाकेल इतकं कर्तृत्व त्यांच्यात नसतं, ते अंतर्बाह्य ‘मिडिओकर’ असतात. त्यांच्या आयुष्यावर फ्रेंच पॉर्नस्टारपासून जागतिक सिनेमापर्यंत गोष्टी आदळतात. तेव्हा हे लोकही बदलतात. पण सामान्यांचे असामान्य होत नाहीत. एकटेपणा, समाजात राहून समाजापासून तुटल्याची त्यांची अवस्था तशीच राहते. पंकज भोसलेंनी आपल्या पत्रकारितेत टिपलेल्या व्यक्ती-घटनांवर या कादंबरीचे कथानक बेतलेले आहे. त्यातील दोन प्रमुख व्यक्तिरेखा शेवटी विशिष्ट ठिकाणी जाऊन पोहोचतात. ‘मिडिओकर’ असण्याचा त्यांच्या गंतव्यस्थळाशी संबंध आहे. पण वाचकाला त्यांच्याबद्दल राग येत नाही, कणव येत नाही, आपलेपणाही वाटत नाही. ते तिथे आहेत, आणि त्यांची गोष्ट प्रचंड ऐकण्यासारखी आहे, ही भावना दाटून येते. शिवाय आपलं स्थळकाळाचं भान वाढतं. -आदूबाळ
-
Railway : Bharatachi Jeevanrekha (रेल्वे : भारताची जीवनरेखा)
रेल्वे : भारताची जीवनरेखा भारतीय रेल्वेचे अंतरंग उलगडणारा सर्वांगीण पट डॉ.शिरीष यंदे हेमंत जोगदेव आशिष कुवेलकर रेल्वे प्रवास सर्व स्तरातील भारतीयांच्या सोयीचा आणि जिव्हाळ्याचा. सोयीचा का? तर, सर्वांत जलद, सर्वांत भरवशाचा आणि पर्यायांची मोठी उपलब्धी असलेला... आणि जिव्हाळ्याचा का? तर, तुलनेने स्वस्त प्रवासी भाडं आणि या प्रवासात अंतर्भूत असलेला एक प्रकारचा ओलावा! म्हणूनच या प्रवासाचं कधीकधी 'नॉस्टॅल्जिया'त रूपांतर होतं ! पण असे विविध कंगोरे असलेल्या रेल्वेचा कारभार चालतो कसा? तर त्यामागे असलेली अतिविशाल यंत्रणा आणि त्या यंत्रणेच्या मागे असलेलं भक्कम तंत्रज्ञान. पण या यंत्रणेविषयी काही जाणून घेण्याचं कुतूहल जागृत झालं तरी ती माहिती कुठे मिळणार? हे पुस्तक नेमकी तीच पोकळी भरून काढतं. या पुस्तकाच्या लेखकत्रयीसाठी 'रेल्वे' हा विषय छंदाचा, कुतूहलाचा, ध्यासाचा आणि आयुष्यभराच्या अभ्यासाचा. त्यातूनच त्यांनी रेल्वेशी निगडित जवळजवळ सर्वच विषय ज्ञात करून घेतले... म्हणजे इंजिन्स, कोचेस, ट्रॅक्स, स्लीपर्स, सिग्नल यंत्रणा, तंत्रज्ञान, विद्युत पुरवठा, परिभाषा, यार्ड्स, व्यवस्थापन, आधुनिकीकरण, रेल्वे कार्यान्वित ठेवणारं मनुष्यबळ आणि बरंच काही... हे पुस्तक म्हणजे याच सर्व अभ्यासपूर्ण माहितीचा ऐवज आहे... थोडक्यात सांगायचं तर, आपलं कुतूहल शमवणारा रेल्वे मिनी एन्सायक्लोपीडिया... रेल्वे : भारताची जीवनरेखा
-
Vincent Wine Ani Moksha (विन्सेंट वाईन आणि मोक्ष)
थांका चित्रातल्या सोनेरी तळपत्या तेजोमय बुद्धाकडे आणि निळ्या रंगातल्या नॉर्बुकडे बघताना अमन-निशा एकमेकांतही हरवून गेले. निशाच्या प्रेमात विरघळून गेलेल्या अमनच्या चित्रातले रंगच काय… त्याचं पूर्ण कलर पॅलेटच बदलू लागलं आणि शब्दयात्री निशाची लेखणी एक वेगळा बहर घेत गेली… विन्सेंटच्या निळ्या-पिवळ्या स्ट्रोक्समधली स्टारी नाईट दोघांची चांदणवेळ होऊन गेली… नियती मात्र ही चांदणवेळ वेदनेच्या एका न संपणाऱ्या प्रदेशात घेऊन जाते आणि मग… आसक्तीचे डोह आणि मोक्षाच्या अलिप्त वाटांचा व्याकूळ प्रवास… विन्सेंट, वाइन आणि मोक्ष ही कादंबरी आहे अमन आणि निशा या प्रेमी जीवांची, त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या वेदनेची ! दोन अस्सल कलाकार माणसांच्या अस्सल कलेचा आणि अस्सल प्रेमाचा हा ओहोळ आहे. मला कायम वाटत आलंय की, वेदनेने माणसाला कितीही छिन्नविच्छिन्न करून टाकलं तरी एका बिंदूला ती वेदना संपत जाते. मात्र त्या वेदनेतून जी कलानिर्मिती होते ती कायमसाठी टिकून राहते आणि अनेकांना इन्स्पायर करत राहते. माती, पाणी, उजेड, वारा, अंधार, अग्नी, आकाश… साऱ्यांचा मेळ उतरला की उत्तम चित्रपट हाती येतो. तसंच या कादंबरीचं झालंय…!
-
Ek Kali Don Pane (एक कळी दोन पानं)
जगातील दोन नंबरचं पेव... पहिला नंबर अर्थात पाण्याचा. पावणे पाच हजार वर्षापासून मानवजात चहा पितेय, त्याच्या लागवडीसाठी अनेक भूखंड बळकावतेय, अनेक युद्ध लढतेय... अशा या चहाच्या मळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगवलेली ही कादंबरी. ही कहाणी आहे एका संघर्षाची, स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या मजुरांच्या लख्याची! स्वतःच्या देशात मजूर म्हणून राबणारा गौरा साब क्रेग ब्रोडी भारतात येऊन एका चहाच्या मळ्याचा मालक बनतो आणि त्याचबरोबर वेठबिगार म्हणून राबणाऱ्या शेकडो जीवांचाही। कथानक फिरतं ते दोन प्रमुख पात्रांभोवती- ब्रोडीचा औरस मुलगा जेम्स आणि ब्रोडीलाही अज्ञात असलेला त्याचा अनौरस मुलगा जॉर्ज... एक असतो वसाहतवादी 'गोरा साहेब' आणि एक स्वतंत्र भारतातला 'काळा साहेब'. पिचलेले साचे मजूर बिरजू, भोला, सावित्री, गंगा, चंपा, मौनिमौसी एकीकडे आणि त्यांचे प्रश्न समजून घेणारी, त्यांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणारी मिसेस ब्रोडी म्हणजेच जेन दुसरीकडे. ही सगळीच पात्रं चहाच्या मळ्यातील हा संघर्ष जिवंत करतात. कथानकाच्या ओघाने मजुरांना सोसावे लागणारे अन्याय, मानहानी, अपार कष्ट चहाच्या शेतीतील शोषणाचा इतिहास सांगून जातात.
-
Gypsy (जिप्सी)
ही गोष्ट आहे एका फिरस्त्याची… दिशाहीन झालेल्या भटक्याची… स्वतःचा शोध घेत निघालेल्या एका तरुणाची… ही गोष्ट आहे एका प्रवासाची… या प्रवासातल्या भल्या-बुऱ्या माणसांची… ही गोष्ट आहे जिवलग मित्रांची… त्यांच्यातल्या अतूट नात्याची… ही गोष्ट आहे हातून निसटून गेलेल्या रिलेशन्सची… आणि पुन्हा नव्याने गवसणाऱ्या प्रेमाची… ही गोष्ट आहे तुमची-आमची… सगळ्यांची… तुमच्या-आमच्या आतल्या वाट चुकलेल्या एका जिप्सीची…!
-
A Life the The Shadows (ए लाइफ इन द शॅडोज)
ए लाइफ इन द शॅडोज वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याच्या जीवनातील स्मृतीचित्र काही झालं तरी आम्ही गुप्तचर अधिकारी संत असण्यापेक्षाही पातक करणारेच अधिक असतो. आम्ही आमच्या मित्रांशी बोलत असतोच, पण त्याहीपेक्षा शत्रूशी अधिक बोलत असतो. गुप्ततेच्या छायेत राहून दीर्घकाळ ‘आय. बी’मध्ये कार्यरत आणि पुढे ‘रॉ’च्या प्रमुखपदाची धुरा वाहणारे अमरजित सिंग दुलत हे सर्वश्रुत आहेत. त्यांचं हे स्मृतिचित्रपर पुस्तक म्हणजे, वाचकांसाठी अनेक अर्थाने वेगळा अनुभव होय. त्यांच्या वरील उद्धरणावरून ते लक्षात येईलच ! ए. एस. दुलत यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातील काही निवडक गोष्टींसह देशात व परदेशात विविध ठिकाणी त्यांना आलेले अनुभव आणि नामांकित नेत्यांबाबतची त्यांची निरीक्षणं असं सर्वच मोठ्या रोचक पद्धतीने कथन केलं आहे. १९८०-९०च्या दशकात काश्मीरमध्ये जहालमतवादाचं राजकारण विकोपाला पोहोचलेलं असताना दुलत यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची ठरली आणि पुढे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात त्यांच्या सल्ल्याने काश्मीर समस्येबाबत वेगळी संवादाधारित नीती अवलंबली गेली. ‘काश्मीर मॅन’ दुलत यांनी कथन केलेले तेव्हाचे अनुभव, तसेच भारत-पाकिस्तान संबंध आणि कलम ३७० यांबाबतचं त्यांचं आगळं विश्लेषण हे सर्वच विचारप्रवृत्त करणारं असं आहे. ते म्हणतात, ‘साध्य-साधनाचा विचार करता, काश्मीरने मला शिकवलेल्या महत्त्वाच्या आणि क्रूरकठोर धड्यांपैकी पहिला धडा म्हणजे, उद्देश साध्य करण्यासाठी बंदूक हे नेमका उलट परिणाम निष्पन्न करणारं साधन ठरतं. एक आगळी जीवनकहाणी वाचण्याचा अनुभव… ए लाइफ इन द शॅडोज.
-
Genius Gem.Dr Gem (जीनियस जेम डॉ. जीएम)
सूक्ष्मजीवशास्त्र त्याचबरोबर उद्योजकीय कौशल्य आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदान अशा विविध व्यापक स्तरांवर डॉ. जी. एम. वारके यांचे कार्यचरित्र महत्त्वाचे आहे. साइटोफागा जिवाणूंच्या विविध प्रजातींची ओळख तसेच त्यांचे विलगीकरण यामधील त्यांच्या मूलभूत संशोधनाने सूक्ष्मजीवशास्त्राच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या जिवाणूंच्या प्रजार्तीच्या लक्षणांचे तपशीलवार वर्णन आणि त्यांच्या विलगीकरणासाठी आवश्यक विशेष मीडिया निर्मितीद्वारे त्यांच्यातील वैज्ञानिकाने आपल्या समर्पित वृत्तीचेच दर्शन घडवले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या या पायाभूत संशोधनाने भविष्यातील संशोधनाचा आणि औद्योगिक क्षेत्रातील उपयोजनांचा मार्गच प्रशस्त केला. डॉ. वारके यांच्या या कार्यामुळे औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर विज्ञानाच्या व्यावहारिक उपयोजनाच्या क्षेत्रातदेखील नव्या संधींची दालने खुली झाली आहेत. त्यांच्या सर्वस्वी नव्या दृष्टिकोनामुळे अनेक औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सुलभता आल्याने त्याचा आर्थिकदृष्ट्या व्यापक परिणाम दिसून आला आहे. त्यांचे औद्योगिक संशोधन आणि त्याद्वारे निर्मिती झालेले उत्पादन तंत्रज्ञान आजही उद्योजक तसेच उद्योगांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे हे चरित्र त्यांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक यशाचे गमक सांगतानाच भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याचेही काम करते. सूक्ष्मजीवशास्त्र आणि उद्योगविश्वात त्यांनी निर्माण केलेल्या समृद्ध वारशाचा फायदा जागतिक आरोग्य, विज्ञान आणि उद्योग क्षेत्राला झाला असून त्याबद्दल सर्वत्र त्यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त केली जाते. देशाला, समाजाला आपले अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. जी. एम. वारके यांचे चरित्र तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अवश्य वाचावे. त्यातून प्रेरणा घेत नवनिर्मिती करत देशाच्या समृद्धीला आपलाही हातभार लावावा, असे यानिमित्ताने मी सुचवू इच्छितो.
-
Neurosurgerychya Paulkhuna (न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा)
मेंदू आणि त्याला जोडून असलेला मणका हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे; तितकेच नाजूक अवयव. पण त्यांच्या आजारांबद्दल, त्यावरील उपचारांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रदीर्घ अनुभव असलेले न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ते या पुस्तकातून मेंदू व मणक्याशी संबंधित आजार, त्यांची लक्षणं, कारणं आणि त्यावरील योग्य उपचार यांची ओळख सहजसोप्या भाषेत करून देतात. पुस्तकातले काही महत्त्वाचे विषय – ब्रेन ट्यूमर चेहऱ्याची असह्य वेदना (ट्रायजेमिनल न्यूराल्जिया) डोळा मारण्याचा आजार व त्यावरील उपचार वरदान ठरलेली एमव्हीडी शस्त्रक्रिया एमआरआयचं तंत्रज्ञान स्लिप डिस्क मेंदूचं कामशास्त्र साठीनंतरची मणक्याची शस्त्रक्रिया इत्यादी…. मेंदू आणि मणका यांची कार्य, त्यांचे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया यांबद्दल तसेच त्या अनुषंगाने रंजक, उद्बोधक आणि उपयुक्त माहिती देणारं पुस्तक न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा….