-
Washington Diary (वॉशिंग्टन डायरी)
अमेरिकेच्या इतिहासात २०२२ आणि २०२४ या सालांमध्ये सलग दोनवेळा प्रथमच एक मराठमोळी व्यक्ती, मुळची भारतीय, अमेरिकन केंद्र सरकारची खासदार म्हणून निवडून आली. अमेरिकेच्या राजकारणातील हे उच्च पद प्राप्त करणाऱ्या मराठी उद्योजकाचे नाव आहे डॉ. श्री ठाणेदार. अत्यंत बेताच्या परिस्थितीतून आलेला, बेळगावसारख्या छोट्या शहरातील एका सामान्य कुटुंबातील मुलगा; पण त्याची स्वप्ने आकाशाला गवसणी घालणारी होती. अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेणे, त्यानंतर आर्थिक स्थैर्यासाठी चांगली नोकरी करणे, स्वतःचा बिझनेस सुरू करणे आणि प्रचंड मेहनतीने तो यशस्वी करून दाखवणे हा त्याचा प्रवास होता. खरं तर इथेच एखाद्याची गोष्ट संपली असती, पण डॉ. श्री ठाणेदार हे काही वेगळेच रसायन आहे. (त्यांची डॉक्टरेटही रसायनशास्त्रातील आहे !!!) सामान्य माणसाला एका आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याची संधी मिळते. मनस्वी स्वभावाने आणि ठाम ध्येयाने तो ती संधी घेतो आणि त्याचे सोने करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. श्री ठाणेदार. चांगल्या स्थिर असलेल्या बिझनेसवर अचानक प्रचंड आर्थिक संकट आले. पाहता पाहता राजाचा रंक झाला. पण धीर न सोडता श्री ठाणेदार यांनी पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून भरारी घेतली आणि स्वतःला सिद्ध करून दाखवले. त्यानंतर बिझनेसचा अध्याय बंद करून त्यांनी पुढील झेप राजकारणात घेतली. २०२० मध्ये मिशिगन राज्यातील आमदार, तर २०२२ आणि आता २०२४ अशा सलग दोनवेळा डेट्रॉईट, मिशिगन या विभागातून अमेरिकेचे खासदार म्हणून ते निवडून आले. अमेरिकेच्या केंद्रीय संसदेतील एक सक्षम राजकारणी म्हणून ही भूमिका ते आता सर्व शक्तिनिशी सिद्ध करत आहेत. अमेरिकेतील बिझनेस आणि तिथले राजकारण या दोन्ही पटांवर घडलेला नाट्यमय थरार म्हणजे श्री ठाणेदार यांची नवी गोष्टः 'वॉशिंग्टन डायरी.'
-
Hi Shreenchi Ichha (ही'श्रीं' ची इच्छा)
इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि प्रयत्न केले तर माणूस हवं तिथे पोचू शकतो’ याची साक्ष पटवणारी आजच्या घडीची सत्यकथा म्हणजे ‘ही ‘श्री’ची इच्छा!’ श्रीनिवास ठाणेदार किंवा ‘श्री’ हा बेळगावच्या शाळेतून पंचावन्न टक्के मार्ग मिळवून मॅट्रिक पास झालेला एक सर्वसामान्य मुलगा. नंतर मात्र तो एम्एस्सीला फर्स्ट क्लास फर्स्ट काय आला, त्यानं अमेरिकेतली डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी काय मिळवली आणि यशस्वी उद्योगपती म्हणून नावलौकिक काय कमावला, सर्व काही थरारक आणि कौतुकास्पद ! एका बाजूला पैसा, प्रसिद्धी आणि यश; तर दुसऱ्या बाजूला पत्नीनं केलेली आत्महत्या, समाजानं वाळीत टाकणं आणि परक्या देशात दोन लहान मुलांना ‘बाबा आणि आई’ होऊन वाढवणं! यश अपयश, सुख दु:ख, मान अपमान सर्वच काही टोकाचं ! डॉ. श्रीनिवास ठाणेदार या जिद्दी माणसानं परिस्थितीवर केलेली मात म्हणजे ‘ही ‘श्री’ची इच्छा