-
Mahamaya (महामाया)
महामाया' या पुस्तकात मराठी संतांच्या भारुडांतील कैकाय आणि तंजावरी परंपरेत रचल्या गेलेल्या कुरवंजी नाटकांतील कैकाडीण यांचे आत्मरहस्य सामाजिक दृष्टीने उकलले आहे; तसेच, अभिजनांच्या परंपरेने रंजन आणि प्रबोधन यांसाठी जिचे महामाया-रूप गौरविले आहे, त्या स्त्रीच्या आणि तिच्या प्रजेच्या दीर्घकालीन दुरवस्थेचे भेदक दर्शन घडविले आहे. मराठी संतांची कैकायविषयक भारुडे आणि तंजावरच्या मराठी राजपुरुषांची कुरवंजी नाटके यांच्या सर्वांगीण आकलनाच्या निमित्ताने, संपूर्ण दक्षिण भारतातील समाज, धर्म आणि कला यांच्या परस्परसंबंधांच्या अभ्यासाचा एक वस्तुपाठच या पुस्तकातील शोधसहयोगातून प्रकट झालेला आहे. दक्षिणेतील धर्मेतिहास आणि नाट्येतिहास यांचे अंतःसंबंध हळुवारपणे उलगडताना डॉ. रा. चिं. ढेरे आणि डॉ. तारा भवाळकर या साक्षेपी अभ्यासकांनी, सामाजिक दृष्टीने धर्म-कलादींची समीक्षा करणाऱ्या विचारकांसाठी शोधाच्या कितीतरी नव्या वाटा उजळल्या आहेत; आणि भटक्या-विमुक्तांच्या उत्थानाच्या चळवळीत अग्रेसर होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अस्मितापोषक विचारपाथेय दिले आहे.