-
Mithak Ani Natak (मिथक आणि नाटक)
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर लिखित ‘मिथक आणि नाटक’ हे महत्त्वपूर्ण वैचारिक पुस्तक आहे. यामध्ये १९२०पर्यंतच्या मराठी पौराणिक नाटकाचा परामर्श घेण्यात आला आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या प्रबंधाचा उत्तरार्ध यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. विष्णुदास भावे यांच्या नाटकांपासून खाडिलकरांच्या पौराणिक नाटकापर्यंतच्या मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण यात स्पष्ट केली आहे. त्यासाठी या ग्रंथात पौराणिक नाटकाची संकल्पना, या नाटकाची आशयवस्तू असलेली पुराणकथा, तिचे स्वरूप, पुराणकथेचा नाटकनिर्मितीशी असलेला अन्योन्य संबंध यांची विस्तृत बैठक उलगडली आहे. प्रारंभीच्या विधिनाट्याकडून नाटकाकडे होत गेलेली ‘नाटक’ या वाङ्मयप्रकाराची वाटचाल लेखिकेने नाट्यवस्तू, नाट्यस्थळ, नट व प्रेक्षक अशा सर्व अंगांनी विशद केली आहे. त्यामुळेच, लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या कक्षा विस्तारणारे हे पुस्तक आहे. मिथकीय समीक्षादृष्टीतून अभिव्यक्त झालेले हे वैचारिक लेखन आहे.
-
Mahamaya (महामाया)
महामाया' या पुस्तकात मराठी संतांच्या भारुडांतील कैकाय आणि तंजावरी परंपरेत रचल्या गेलेल्या कुरवंजी नाटकांतील कैकाडीण यांचे आत्मरहस्य सामाजिक दृष्टीने उकलले आहे; तसेच, अभिजनांच्या परंपरेने रंजन आणि प्रबोधन यांसाठी जिचे महामाया-रूप गौरविले आहे, त्या स्त्रीच्या आणि तिच्या प्रजेच्या दीर्घकालीन दुरवस्थेचे भेदक दर्शन घडविले आहे. मराठी संतांची कैकायविषयक भारुडे आणि तंजावरच्या मराठी राजपुरुषांची कुरवंजी नाटके यांच्या सर्वांगीण आकलनाच्या निमित्ताने, संपूर्ण दक्षिण भारतातील समाज, धर्म आणि कला यांच्या परस्परसंबंधांच्या अभ्यासाचा एक वस्तुपाठच या पुस्तकातील शोधसहयोगातून प्रकट झालेला आहे. दक्षिणेतील धर्मेतिहास आणि नाट्येतिहास यांचे अंतःसंबंध हळुवारपणे उलगडताना डॉ. रा. चिं. ढेरे आणि डॉ. तारा भवाळकर या साक्षेपी अभ्यासकांनी, सामाजिक दृष्टीने धर्म-कलादींची समीक्षा करणाऱ्या विचारकांसाठी शोधाच्या कितीतरी नव्या वाटा उजळल्या आहेत; आणि भटक्या-विमुक्तांच्या उत्थानाच्या चळवळीत अग्रेसर होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अस्मितापोषक विचारपाथेय दिले आहे.
-
Sitayan (सीतायन)
लोकसाहित्याच्या जेष्ठ अभ्यासक डॉ . तारा भवाळकर या नेहमीच लोकसंस्कृतीचा अभ्यास मातृसंस्कृती म्हणून करत आल्या आहेत . एकूणच लोकसाहित्याची स्त्रीवादी अंगाने त्यांनी केलेली मांडणी लक्षणीय आहे . त्याच अनुषंगाने सीतेच्या वेदनेचा विद्रोहाचा जो सूर त्यांना वेगवेगळ्या लोकरामायणांत सापडला ,त्याचा मागोवा म्हणजे हे सीतायन !