-
Sanwad (संवाद)
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, म्हणूनच इतिहासात डोकावून बघितलं, तर आदिम काळापासून मनुष्य समूहानं किंवा टोळ्यांनी राहत असलेला बघायला मिळतो. अगदी सुरुवातीला माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला असेल? या प्रश्नाच्या कुतूहलातूनच अच्युत गोडबोले यांचं ‘संवाद’ हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. ‘संवाद’ या पुस्तकात चित्रलिपीद्वारा, खाणाखुणा करून, वेगवेगळे आवाज करून आदिमानवाच्या परस्परांतल्या संवादाला कशी सुरुवात झाली याचा इतिहास तर आहेच, पण त्याचबरोबर शेतीमुळे स्थैर्य आल्यानंतर माणसाच्या जगण्यात जे बदल झाले, त्यातच त्यानं लावलेला छपाईयंत्राचा शोध असेल किंवा टपालव्यवस्थेचा शोध असेल, या सगळ्या शोधांनी माणसं एकमेकांशी कसा संवाद साधायला लागली, त्यातून काय गमतीजमती घडत गेल्या, या शोधकर्त्यांना कुठकुठल्या अडचणींना तोंड देत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागलं, त्या त्या काळात तंत्रज्ञान कसं बदलत गेलं, तंत्रज्ञानानं माणसाच्या संवादात काय बदल घडवून आणले, या प्रवासात किती तंत्रज्ञांचा मृत्यू अत्यंत हलाखीत झाला आणि किती जणांचं आयुष्य प्रचंड वैभवात गेलं, हे सगळं या पुस्तकात वाचकांची उत्कंठा वाढवणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक शोधाचा शोधकर्ता, त्या शोधामागचं तंत्रज्ञानदेखील ‘संवाद’मध्ये अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आदिमानवापासून व्हॉट्सअपच्या युगापर्यंत माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला याविषयीची एक रंजक आणि चित्तथरारक कहाणी म्हणजे ‘संवाद’! यामध्ये शिंग, तुतारी, आगीपासून ते भाषेचा आणि लिपीचा उगम, कागद आणि छपाई यांचे शोध, टपालव्यवस्था, वर्तमानपत्र, मोबाइल
-
Ganiti (गणिती)
गणित या विषयाची भीती घालवून त्याची गोडी वाढवणारं, गणिताची मूलतत्त्वं आणि इतिहास अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावून सांगणारं हे पुस्तक आहे. या पुस्तकात प्राचीन संस्कृतीपासून गणिताचा वापर कसा सुरू झाला हे तर आहेच, पण त्याचबरोबर आर्यभट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, पायथागोरस, युक्लिड, आर्किमिडीज, न्यूटन, गाऊस, रीमान, ऑयलर, रामानुजन यांच्यासारखे अनेक महान गणितज्ञ येथे भेटतील. या सगळ्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्यातल्या वादविवादांबद्दल, चढाओढीबद्दल आणि आशा-निराशेबद्दल हे पुस्तक एक अनोखं भावविश्व उभं करतं. एवढंच नाही, तर अंकगणित, भूमिती, बीजगणित, कॅल्क्युलस, ग्राफ थिअरी, वक्र स्पेस, टोपॉलॉजी, चौथी मिती, नॉन-युक्लिडियन जॉमेट्री, सेट थिअरी, ग्रुप थिअरी, मॅट्रिक्स, तर्कशास्त्र, संभाव्यताशास्त्र, शून्य आणि अनंत अशा अनेक कल्पना हे पुस्तक सोप्या भाषेत समजावूनही सांगतं. गणिताची इनसाईट मिळवून देऊन त्याविषयी नवीन वाचण्यासाठी उद्युक्त करणारं ‘गणिती’ कुठल्याही शाखेच्या प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी आणि व्यावसायिक या सगळ्यांनी जरूर वाचायलाच हवं.
-
Musafir (मुसाफिर)
अर्थशात्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र आणि कम्प्युटरसारख्या क्षेत्रात सहजपणे मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले यांच्या कारकिर्दीचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. गोडबोले यांनी अनेक विषयांचा [...]
-
Manat ( मनात )
अच्युत गोडबोले लिखित "मनात' हे मानसशास्त्रावरचं पुस्तक अलीकडंच प्रसिद्ध झालं. केवळ सात आठवड्यांत या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या. शालेय वयात "मनाचे श्लोक' बहुधा प्रत्येकानंच वाचलेले असतात. गोडबोले यांनाही त्या मनाच्या श्लोकांनी मनाविषयी विचार करायला भाग पाडलेलं दिसतं. त्यानंतर पुढच्या आयुष्यभराच्या शालेय, महाविद्यालयीन, चळवळीच्या काळात आणि पुढं विविध महत्त्वाच्या जागतिक कंपन्यांमध्ये काम करतानासुद्धा या मनाच्या प्रकरणानं लेखकाला पछाडलेलं होतं असं दिसतं. व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तोंड देताना या "मन' नावाचं प्रकरण लेखकाच्या मध्ये येतच असे. साहित्य, कलेच्या प्रांतात मुशाफिरी करतानाही लेखकाला जागोजागी या "मनाच्या' दर्शनानं स्तिमित व्हायला व्हायचं. या आणि अशा अनेक गोष्टींनी लेखकाला मनात हे पुस्तक साकारण्याची प्रेरणा आणि बळ दिलेलं दिसतं. अर्थात हे पुस्तक जाणत्या पण सर्वसामान्य वाचकांना कळेल, अशा भाषेत समजवायचं या विचारानं जन्माला आलं. सर्वसामान्य माणसानं ठिकठिकाणी मनाविषयी ऐकलेल्या कथा, संकल्पना, शास्त्रज्ञांची नावं, त्यांचं जे कुतूहल चाळवलं जातं, त्याला शास्त्रीय ज्ञानाचा पाया या ग्रंथाच्या वाचनातून जरूर लाभतो. मन म्हणजे काय, मनाचा शोध घेताना प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास गोडबोले यांनी उलगडून दाखवला आहे. मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत - एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या पुस्तकात आहे. सोपी, सुलभ, सुटसुटीत वाक्यरचना आणि सर्व प्रकारच्या वाचकांना कळेल अशी ओघवती, खुसखुशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. वाचायला सुरवात करताच वाचक त्यात पूर्ण बुडून जातो. पुस्तक हातावेगळं केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. यातल्या प्रकरणांची नावं वाचल्यावरच आपल्याला हव्या असलेल्या माहितीवर ज्ञानाची किल्ली सापडल्याचा आनंद होतो. मन एक शोध, मेंदू : शोध आणि रचना, फ्रॉईडपर्यंतची वाटचाल, फ्रॉईड आणि युंग, एक्सपरिमेंटल सायकॉलॉजी, बिहेविअरिझम, गेस्टाल्ट सायकॉलॉजी, डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी, बुद्धी, व्यक्तिमत्त्व, भावना-प्रेरणा, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, पर्सेप्शन सायकॉलॉजी, तसंच मनोविकार आणि मानसोपचार अशा 17 भागांतून आणि जवळपास 600 पृष्ठांतून हा खजिना वाचकांसमोर गोडबोले यांनी रिता केला आहे. जवळपास 87 संदर्भग्रंथांच्या संदर्भानं "मनात' हा ग्रंथ समृद्ध झाला आहे. आपल्याला हव्या असलेल्या विशिष्ट संकल्पना किंवा शास्त्रज्ञांविषयी जाणून घेण्यासाठी नामसूचीही दिलेली आहे. सर्वसामान्य वाचकांच्या हाती हा ग्रंथ देताना या विविध विभागांची केवळ वरवरची आणि साधी सोपी माहिती न देता तिच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अतिशय गंभीरपणे, पण तरीही अत्यंत उत्कटतेनं लेखकानं केलेला जाणवल्याशिवाय राहत नाही. अनेक पाश्चिमात्य तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ यांचा आधार घेतानाचा पौर्वात्य ज्ञानशाखा आणि तत्त्वज्ञान यांचाही सुरेख मेळ लेखकानं साधला आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानाचा समर्पक संदर्भ देताना लेखकानं आनंदाची गुरुकिल्ली आपल्याला शोधून दिली आहे. लेखक म्हणतो त्याप्रमाणे एखाद्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना मधल्या प्रवासातील, प्रक्रियेतील आनंदही तितक्याच उत्कटतेनं उपभोगला पाहिजे. अंतिम साध्य शेवटी लाभत नाही, तर ते प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यात थोडं थोडं सापडत जातं. त्याचं "सेलिब्रेशन' करतच ही सफर पुढं चालली पाहिजे. प्रसिद्ध सामाजिक विचारवंत आणि संशोधक डॉ. अभय बंग आणि डॉ. प्रकाश आमटे, प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी बापट, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे, समाजाचं मानसशास्त्राबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारे डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. प्रदीप पाटकर, विविध विद्यापीठांतले मानसशास्त्राचे विभागप्रमुख अशा सर्वांनी मन:पूर्वक दिलेल्या अभिप्रायांनी "मनात' या पुस्तकाच्या उपयुक्ततेवर आणि सौंदर्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. तसंच त्यांच्या प्रतिक्रियांमधूनग्रंथाची उंची आणि खोलीही अधोरेखित झाली आहे.
-
Steve Jobs: Ek Zapatlela Tantradnya
स्टीव्ह जॉब्स-तंत्रज्ञानाच्या जगातला सगळ्यात प्रसिद्ध जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले कम्पयुटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक पलेअर्स, टॅब्लेट पीसीज हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील. जगभरातल्या लोकांच्या कल्पनाशक्तीपलीकडची उत्पादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखवली. आपलं आयुष्यच तो एका वेगळ्या विश्वात जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्यांहून वेगळं आणि अगदी सर्वोत्तम असंच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडला. कर्करोगानं जॉब्जचं शरीर पोखरून टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटपर्यंत आपल्या कल्पनांच्या भरा-या मारायचं काम थांबवलं नाही. अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर!
-
Kimayagar (किमयागार )
सुरुवातीलाच एक प्रांजळ कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होती. पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळया विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहे. एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तसं हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. पद्मविभूषण वसंत गोवारीकर विश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दिप्तीमान वारसा आहे. ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात. उदाहरणार्थ, मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या 'मॅक्स्वेल'ची ओळख किती जणांना असेल? विज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्या झगडयाचा आणि त्या घडवणाऱ्या 'किमयागारां'चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे पुस्तक. पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद व या वैचारिक साहसातील थरार! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते. अतीश दाभोलकर, (भटनागर पुरस्कारविजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक) पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08.