-
Ya Saam Ha (या सम हा)
मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा… थोरला बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनांतली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या चार वर्षांतच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ.
-
Na Sangnyajogi Goshta (न सांगण्याजोगी गोष्ट)
१९६२. साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युद्धात आपला दारूण पराभव झाला. जगभर त्यामुळे आपली मानहानी झाली. म्हणून ती ठरली 'न सांगण्याजोगी गोष्ट'! तथापि आपली राष्ट्रीय संरक्षणसिद्धता वाढवायची असेल,तर 'त्या' पराभवाची परखड कारणीमिमांसा करायलाच हवी. 'त्या' शोकांतिकेला कोणकोण जबाबदार होते? चीनवर नको तेव्हडा विश्वास टाकणारे भोळेभाबडे राज्यकर्ते? कि राणा भीमदेवी थाटात 'फॉरवर्ड पॉलिसी' आखणारे सेनाधिकारी? या युद्धात नेमके काय घडले? त्या पराभवाल एखाद दुसरी तरी रुपेरी कडा होती का?या आणि अशा इतरही असंख्य प्रश्नांची साधार,तपशीलवार उत्तरे देणारा ग्रंथ म्हणजे युद्धाशास्त्राविषयक मराठी साहित्यात मोलाची भर आहे. प्रत्यक्ष राणक्षेत्राची व व्युहरचनांची कल्पना देणारे २५ नकाशे हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एक रणझुंजार सेनानीने इतिहासकाराच्या भूमिकेतून लिहिलेला हा ग्रंथ देश्हीताबद्दल कळकळ असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवा.