-
First Person
कॉलेजमध्ये असताना काही कामाच्या निमित्ताने दोन-तीन वेळा विजय तेंडुलकर यांच्या घरी जाणे झाले. तेव्हा कधी वाटलेही नव्हते, की त्यांच्या मुलीशी-प्रियाशी - पुढे माझी इतकी दाट मैत्री होईल! 'रजनी'च्या रुपात एक अभिनेत्री म्हणून अल्पावधीत लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारी प्रिया मला मात्र जास्त भावली, ती एक लेखिका म्हणून! पण, 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या 'बॉम्बे टाइम्स' पुरवणीतील प्रियाचे 'फर्स्ट पर्सन' नावाचे इंग्रजी सदर वाचताना कधी कल्पनाही केली नव्हती, की याचा मराठी अनुवाद करायची जबाबदारी माझ्यावर येणार आहे आणि तीसुध्दा प्रियाच्या पश्चात् ! प्रियाची धाकटी बहीण तनुजा हिच्या आग्रहामुळेच मी प्रियाच्या 'फर्स्ट पर्सन'चा अनुवाद केलाय. प्रियाच्या मूळ लेखनशैलीला धक्का लागून न देण्याचा माझ्याकडून तरी मी प्रामाणिक प्रयत्न केलाय.
-
Jave Tichya Vansha
मराठीतील जुन्या नव्या कथाकारांच्या गर्दीत काही नावे आरंभापासूनच वेगळी उमटून पडली, त्यात प्रिया तेंडुलकर हे नाव येते. हा त्यांचा तिसरा कथा-संग्रह. ज्याचा त्याचा प्रश्न, जन्मलेल्या प्रत्येकाला हे आधीचे. सहसा पांढरपेशा वाचकाला न भेटणारे अनुभव, त्यांची थेट व आरपार हाताळणी, कथेतील रौद्र नाट्य हेरून ते साक्षात समोर उभे करण्याचे सामर्थ्य आणि मानवी मनातला हळवा गुंता हळुवार हाताने सोडवून तो नेमका मांडण्याचे कौशल्य ही या कथांची वैशिष्ट्ये. मात्र जीवनाकडे - यात स्त्री-जीवन आले - पाहण्याची स्वत:ची एक स्वतंत्र दृष्टी हे या लेखनाचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या कथांहून उजव्या कथा मराठीत भेटतील. या कथांहून डाव्या कथांचीही उणीव नाही. मात्र या कथांसारख्या कथा मराठीत फक्त प्रिया तेंडुलकर याच लिहू शकतात म्हणून या कथा-संग्रहाचे महत्त्व.
-
Asahi (असंही)
प्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत लेखनाचे सर्व प्रकार हाताळले.यात वृत्तपत्रातले हुकमे हुकूम सदर-लेखनही होते. अनुभव घेण्याच्या व त्यांवर सवेदनशील चिंतन करण्याच्या तिच्या सवयीमुळे सदर-लेखनातही तिला रस लागला होता आणि तिच्या इतर व्यापातही ती असे लेखन अंगावर घेऊन ते नियमितपणे करीत असे. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह. आणखी बरेच सदर-लेखन तिने केले, ते संग्रहित नाही. या संग्रहातील काही लेखनात कथेच्या शक्यता जाणवतील. कथा माध्यमाची तिची आवड आणि या माध्यमावरील तिची पकड लक्षात घेता हे साहजिक होते. परंतु हे लेखन केवळ ललित नाही. त्यात सामाजिकतचे गंभीर भान आहे. यामुळे ते नेहमीच्या ललित सदर-लेखनापुढे अजून एक पाऊल गेले आहे.
-
Janmalelya Pratyekala
गाडगीळ - गोखल्यांची नव-कथाही जुनी वाटावी इतक्या नव्या आणि अनपेक्षित वाटांनी मराठी कथा गेल्या काही वर्षात पुढे निघाली आहे. हे नावीन्य घाटाचे, तंत्राचे किंवा शैलीचे म्हणजे वरवरचे नसून गाभ्यातले, अनुभवाचे आणि त्या अनुभवाकडे बघण्याच्या निडर दृष्टीचे आहे. मराठी साहित्यात आजवर अ-स्पर्शित असे हे जीवनानुभव ही ज्यांच्या लेखनाची खासियत त्या कथाकारात प्रिया तेंडुलकर यांचा समावेश केला जातो. त्यांच्या एका कथा-संग्रहाची ही नवी आवृत्ती.
-
Panchatarankit
तिनं पाहिलं आहे! ’पंचतारांकित’ उपाहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप बालिकेपर्यंतचे सगळे जग... हे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील तर कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली तिच्यापाशी आहे. सत्यशोधकाची तत्त्वचिंतक बैठक बालपणापासूनच साहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे. अन्यायाकरिता झगडणारी ’रजनी’ तर ती आहेच! पण खरी आहे ती हे जग सुंदर कधी होईल म्हणून आपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली स्वप्नवेडी प्रिया तेंडुलकर...